आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संगीताचे संगीत कारगिलमध्ये गुंजणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - कारगिल विजय दिन हा संपूर्ण देशासाठी अभिमानाचा क्षण आहे. ७२४ जवानांनी बलिदान दिलेल्या युद्धाच्या स्मृती भारतीय लष्कर अविस्मरणीय सोहळ्याच्या रूपात जपून आहे. अभिमान, शाैर्य आणि संस्मरणीय अशा या स्मृतिसोहळ्यासाठी औरंगाबादच्या गायिका संगीता भावसार यांना लष्कराने आमंत्रित केले, ही औरंगाबादकरांसाठी गौरवाची गोष्ट आहे.

याविषयी अधिक माहिती देताना, मातृभूमी ट्रस्टचे जसवंतसिंग राजपूत म्हणाले, मातृभूमी ट्रस्टच्या वतीने २००६ पासून आम्ही कारगिल विजय दिनानिमित्त देशभक्तिपर गीतांचा कार्यक्रम करत आहोत. सीमेवर जीव पणाला लावून देशाची रक्षा करणाऱ्या जवानांसमोर सादरीकरणाची संधी मिळावी असा आमचा प्रयत्न होता. मात्र, काही केल्या संधी मिळत नव्हती. कर्नल समीर राऊत आणि ब्रिगेडियर पावामणी यांच्या सहकार्याने आम्हाला २०१३ मध्ये पहिल्यांदा संधी मिळाली. औरंगाबादहून कलावंतांचा ताफा आणि वाद्य, साउंड साहित्य घेऊन आम्ही लेह, द्रास, बटालिक अशा ठिकाणी सादरीकरण केले होते. त्याला भरभरून दाद मिळाली. जवानांमध्ये स्फूरण भरणारा हा कार्यक्रम, त्यांना मित्रांच्या आठवणीने हळवाही करणारा होता. कार्यक्रम त्यांच्या हृदयात घर करून गेला. तेव्हापासून दरवर्षी होणाऱ्या कार्यक्रमात मातृभूमी ट्रस्टतर्फे कलावंत सहभागी होतात. यंदा लष्कराने एक पाऊल पुढे टाकत गायिका संगीता भावसार यांना खास निमंत्रित केले आहे. संगीता यांनी मेरे वतन के लोगो, हे गाणे इतके अप्रतिम सादर केले होते की तेथील सर्व बड्या अधिकाऱ्यांनी याला दाद दिली होती. संगीताला आमंत्रित करणे ही गाण्याप्रती असलेल्या तिच्या गायनाची पावती आहे. औरंगाबादकरांसाठी सन्मानाची बाब आहे.
संगीताविषयी थोडेसे
सुगमगायनाचे धडे पं. विश्वनाथ ओक यांच्याकडे घेतलेल्या संगीता विविध कार्यक्रमांतून औरंगाबादकरांना स्वरांचा आनंद देत असतात. शालेय महाविद्यालयीन जीवनात विविध स्पर्धा गाजवलेली ही गुणी गायिका, राज्यभरात संगीतराज नावाच्या कार्यक्रमातून सादरीकरण करते. आजवर दीड हजारांहून अधिक कार्यक्रम केलेली संगीता अनेक दिग्गजांसोबतही गायली आहे. यामध्ये प्रामुख्याने हृदयनाथ मंगेशकर, सुरेश वाडकर, उपेंद्र भट, उत्तरा केळकर, वैशाली सामंत, अवधूत गुप्ते, अनुप जलोटा, स्वप्निल बांदोडकर यांची नावे सांगता येतील. राजा नं. १, लई भन्नाट, खैरलांजी आणि एक नारी गावाला भारी या चित्रपटांतून तिने पार्श्वगायनही केले आहे. कारगिल दिनानिमित्त गाण्याचे आमंत्रण मिळणे हा आयुष्यातील सर्वात मोठा पुरस्कार असल्याचे संगीताने सांगितले. १८ जुलै रोजी यासाठी ती रवाना होत आहे.
बातम्या आणखी आहेत...