आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गारखेड्यातील तरुणाचा इराणमध्ये संशयास्पद मृत्यू, जहाजाला आग लागल्याचे कारण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मर्चंट नेव्हीत कार्यरत गारखेडा परिसरातील तरुणाचा जहाजाला आग लागल्याने इराणमध्ये संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली. पलाश दत्तात्रय बलशेटवार (२१) असे त्याचे नाव असून या घटनेमुळे गारखेडा परिसरातील सुमंगल विहार येथे शोककळा पसरली आहे. दरम्यान, मृतदेह मिळावा यासाठी वारंवार संपर्क साधूनही संबंधित कंपनी तसेच कन्सल्टन्सीकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने पलाशचे कुटुंबीय हवालदिल झाले आहेत.

बारावीपर्यंतचे शिक्षण औरंगाबादेतच पूर्ण करून मुंबईत गेलेल्या पलाशने तेथे सीरॅक कन्सल्टन्सीमध्ये शिपिंग डिप्लोमाचे प्रशिक्षण घेतले. याच कंपनीच्या माध्यमातून त्याला इराणच्या लायन ओनर्स स्टार बुशफोर्ट येथे नोकरीची संधी मिळाली. २४ डिसेंबर २०१५ रोजी इराणला रवाना झालेल्या पलाशचा १५ मार्च रोजी मृत्यू झाल्याची बाब एका मित्राच्या फेसबुक पोस्टमधून स्पष्ट झाली. त्याच्या फ्रेंड्स लिस्टमध्ये असणारा योगेश कवठेकर या पलाशच्या आतेभावाने ही माहिती कुटुंबीयांना देताच त्यांच्यावर आभाळच कोसळले.
या घटनेची शहानिशा करण्यासह पुढील प्रक्रियेबाबत माहिती घेण्यासाठी पलाशच्या कुटुंबीयांची धडपड सुरू होती. त्यांनी सीरॅक कन्सल्टन्सीचे विकास कदम यांच्याशी संपर्क साधूनही माहिती मिळाली नाही. त्यानंतर बलशेटवार कुटुंबीयांनी इराणच्या भारतीय राजदूतांशी संपर्क साधला, मात्र त्याचाही उपयोग झाला नाही. अखेर पलाशच्या इराणमधील मित्रांची मदत घेण्यात आली. यादरम्यान पलाशचा मृतदेह रुग्णालयात ठेवण्यात आला असून इराणमध्ये १० दिवस सुटी असल्यामुळे तो लगेच भारतात पाठवता येणार नाही, ही माहिती हाती आली. तेथे राहणाऱ्या एका महाराष्ट्रीय तरुणाने जहाजास आग लागल्याने पलाशचा मृत्यू झाल्याची माहिती आणि त्याचा फोटो पाठवला. मुलाला परदेशात नोकरीची संधी मिळाल्यामुळे सुखावलेल्या कुटुंबीयांना अवघ्या तीनच महिन्यांत त्याच्या अपघाती मृत्यूची बातमी मिळाल्याने जाेरदार मानसिक धक्का बसला आहे. त्याच्या आईला रुग्णालयात दाखल करावे लागले अाहे. आई-वडील, पलाश आणि मुलगी असे हे कुटुंब असून पलाशचे वडील दत्तात्रय बलशेटवार एका खासगी कंपनीत कार्यरत आहेत.
पुढे वाचा, खासदार खैरेंनी दिली परराष्ट्र मंत्र्यांना माहिती , मोबाइल सुरू कसा ?

खासदार खैरेंनी दिली परराष्ट्रमंत्र्यांना माहिती : खासदार चंद्रकांत खैरे यांनी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना या प्रकरणाची माहिती दिली असून पलाशचा मृतदेह ताब्यात मिळावा यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणीही त्यांनी केली आहे. तसेच पलाशच्या कुटुंबीयांनीही पंतप्रधान आणि परराष्ट्रमंत्री स्वराज यांना ट्विटरद्वारे माहिती दिली आहे.

मोबाइल सुरू कसा ?
जहाजालाआग लागल्याने पलाश मृ़त्यू झाला, असे सांगितले जात आहे. मात्र, त्याचा मोबाइल सुरू असल्याचे दाखवत असून हे कसे शक्य आहे, हा कुटुंबीयांचा प्रश्न अनुत्तरितच आहे. तसेच १५ मार्च रोजी वाजून ३६ मिनिटांनी पलाशने व्हॉट्सअॅप स्टेटस चेक केल्याचे दिसून आल्यामुळे हा घातपात असावा, असे कुटुंबीयांचे म्हणणे आहे.
बातम्या आणखी आहेत...