आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद- सिडको येथील के. बी. अग्रवाल या वीज ग्राहकास चोरीच्या प्रकरणात अडकवून जास्तीची रक्कम उकळण्याचा जीटीएल कंपनीचा प्रयत्न विद्युत लोकपालांनी दिलेल्या निर्णयामुळे फसला आहे.
सिडको भागात अग्रवाल यांची फ्लोअर मिल आहे. गेल्या अनेक वर्षापासून ते नियमित वीज बिल भरतात. 28 फेब्रुवारी 2012 रोजी जीटीएलतर्फे त्यांच्या वीज मीटरचे निरीक्षण करण्यात आले. तेव्हा जुने मीटर काढून नवीन मीटर बसवण्यात आले. जुने मीटर 8 टक्के मंद गतीने फिरत असल्याचे दिसून आले. तेव्हा जीटीएलने कलम 126 नुसार 1 लाख 2 हजार 990 रुपयांचे बिल अग्रवाल यांना दिले. अग्रवाल यांनी याबाबत केलेल्या तक्रारीची दखलही घेण्यात आली नाही. सतत पाठपुरावा केल्यानंतर 27 हजार 780 रुपये बिल कमी करून देण्यात आले. या दोन्ही बिलाचे कोणतेही विवरण जीटीएलने दिले नाही. पंधरा दिवसांत अग्रवाल बिल भरू न शकल्यामुळे त्यांचा वीजपुरवठा खंडित करण्याची नोटीस देण्यात आली. या विरोधात अग्रवाल यांनी वीज ग्राहक मंचात तक्रार दाखल केली. वीजग्राहक मंचाने हे प्रकरण वीज कायद्यातील कलम 126 अंतर्गत असून मंचाच्या कार्यक्षेत्राबाहेर असल्याचा निर्वाळा दिला. मंचाच्या या निर्णयाविरोधात अग्रवाल यांनी हेमंत कापडिया यांच्यामार्फत विद्युत लोकपाल यांच्याकडे अपील केले. दरम्यान जीटीएलने गणेश स्थापनेच्या दिवशी कोणतीही पूर्वसूचना न देता अग्रवाल यांचा वीजपुरवठा खंडित केला. जेव्हा थकबाकीच्या पूर्ण रकमेचा भरणा केला तेव्हाच वीजपुरवठा सुरू करण्यात आला.
विद्युत लोकपाल यांच्यासमोर बाजू मांडताना कापडिया यांनी ही बाब निदर्शनास आणून दिली. याचबरोबर कलम 126 अंतर्गत हे प्रकरण येत नसल्याचे निदर्शनास आणून देत जीटीएल कंपनी विनाकारण ग्राहकास वेठीस धरत असल्याचे स्पष्ट केले. विद्युत लोकपाल यांनी दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकल्यानंतर वीज कायद्यातील 126 अंतर्गत प्रकरण येत नसल्याचा निर्णय देऊन जीटीएलने दिलेले बिल रद्द केले. तसेच ग्राहकाने भरलेली रक्कम पुढील वीज बिलातून वजा करण्याचा आदेश दिला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.