आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

खैरे-दर्डांनी दिली टाळी, रंगली 'सुभेदारी'वर होळी!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळवडीच्या पूर्वसंध्येलाच औरंगाबाद शहरात रंगांची उधळण सुरू झाली. लहान मुलांपासून ते आबालवृद्धापर्यंत सारेच रंगांत न्हाऊन निघू लागले. पाणीटंचाईच्या संकटामुळे अनेकांनी कोरड्या रंगांचा वापरही केला. कोरड्या आश्वासनात तमाम जनतेला गेली कित्येक वर्षे चिंब भिजवणारे, वर्षभर एकमेकांची राजकीय धुलाई करणारे नेतेही सुभेदारीवर एकत्र आले. त्यामुळे रंगोत्सवाची रंगत आणखीनच वाढली. त्याचा हा वृत्तांत.वेळ : संध्याकाळी सहा
खासदार चंद्रकांत खैरे नेहमीप्रमाणे दिल्ली, चेन्नई, कोलकाता, बंगळुरू येथे देशभरातील कामाच्या निमित्ताने संपर्क साधत असतानाच आमदार किशनचंद तनवाणी, संजय शिरसाट, प्रदीप जैस्वाल, राजेंद्र दर्डा, डॉ. कल्याण काळे, विक्रम काळे, सतीश चव्हाण, एम. एम. शेख आणि त्यांचे चाहते सुभेदारीवर पोहोचले. एकमेकांना शुभेच्छा देत ते विसावले. तेवढय़ात अंबादास दानवे, मनमोहनसिंग ओबेरॉय, मुश्ताक अहेमद, सय्यद अक्रम, एकनाथ जाधव, अमित भुईगळही पोहोचले.

अंबादास : (खैरेंना उद्देशून) साहेब, मी आत्ताच वरती साहेबांशी बोललो. त्यांनी तुम्हाला शुभेच्छा दिल्या आहेत. आता या शुभेच्छाचे काय करायचे, ते तुम्हीच ठरवा.

खैरे : अरे, तू कसा काय बोललास साहेबांशी आणि साहेब माझ्या शुभेच्छा तुझ्याजवळ कशाला देतील. उगाच काहीतरी फेकू नकोस अंबा..

अंबादास : खरं तेच सांगतोय, साहेब. तुमच्याशी, तुमच्याविषयी मी कधीच खोटं बोलत नाही.

खैरे : अरे, मी खरा शिवसैनिक. साहेबांचा, आई तुळजाभवानीचा, छत्रपती शिवरायांचा, संत महात्म्यांचा आणि जनतेचा आशीर्वाद फक्त मलाच आहे.

तनवाणी (ग्लास उंचावत) : ओ, खैरेसाहेब..तुमची भांडणं आता तरी थांबवा हो. आमचं ठीक आहे. पण आता लोकसभा तोंडावर आली आहे. आतातरी तुमच्या अंबादासला दुखावू नका.

खैरे : ओह..धन्यवाद किशूजी. तुमची पण स्थानिक स्वराज्यची निवडणूक जवळ आली आहे. तेव्हा तुम्ही पण प्रदीपजी, संजयजी, सतीशजी, शेखजी, विक्रमजी, कल्याणजी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे दर्डाजींशी जमवून घ्या.

सतीश चव्हाण (माणिकचंदची पुडी रिती करत) : तुम्ही त्याची काळजी करू नका. त्यांनी तुमच्याकडूनच धडे घेतले आहेत. दर्डांशी कसे अन् केव्हा जमवून घ्यायचे, हे सगळ्यांना समजू लागले आहे. दर्डाजींची तर त्यात पी.एचडी.च झाली आहे.

दर्डा : (डोळ्यावरचा चष्मा काढून तारस्वरात) हे धादांत खोटे आहे हां. माझा आणि चंद्रकांतचा स्नेह आहे. त्याचे रूपांतर आम्ही मतांमध्ये होऊ देत नाही, पण आता लोकांचा आम्हा दोघांवर स्नेह असेल तर त्याला आम्ही काय करणार.

कल्याण काळे : बाबूजी..बाबूजी..तुम्ही असं ओरडल्याने खर्‍याचं खोटं आणि खोट्याचं खरं होत नाही.

एम. एम. शेख (इकडे तिकडे पाहत) : नाही तर काय. काय हो विक्रमजी.

विक्रम काळे : मी शिक्षक मतदारसंघाचा आहे. त्यामुळे या प्रश्नाचा अभ्यास करूनच उत्तर द्यावे लागेल.

ओबेरॉय, मुश्ताक अहेमद : (एकत्रितपणे) सब मिलीभगत है. दोनो मिलाके ऑपोजिट वालो को गिरा देते. फिर पाच साल एक दुसरे को गालिया देते.

प्रदीप जैस्वाल : (वातावरण शांत करत) सर्वांनी जिल्ह्यामधी शांतता पाळावी. आपण इथं होळी साजरी करण्यासाठी आलो आहोत. भांडण्यासाठी नाही. काय हो संजयजी.

संजय शिरसाट (सिगारेट खच्चून कश घेत) : हो. पण बाबूजी मला पण पश्चिममध्ये थोडीफार मदत करत असल्याने मला त्यांच्यावर असा थेट आरोप करता येणार नाही आणि खैरेंनी माझ्या पुढच्या तिकिटात अडचण आणू नये म्हणून त्यांच्याबद्दलही आता बोलता येणार नाही. त्यांनी तिकीट मिळू दिलं नाही तरच मी बोलणार आहे. बरोबर आहे ना एकनाथराव.

एकनाथ जाधव (मुंडेंचे मनातल्या मनात स्मरण करत) : मी नुकताच जिल्हाध्यक्ष झालोय. त्यामुळे या विषयी भाजपच्या कार्यकर्त्यांचं एक बौद्धिक शिबिर घेऊनच मला भूमिका स्पष्ट करता येणार आहे.

सतीश चव्हाण (माणिकचंदची पुडी जैस्वालांकडे सरकवत) : हे म्हणजे कोरड्या होळीपेक्षाही कोरडेपणाचे उत्तर झाले हां.

ओबेरॉय : वो, जाने दो. खैरेसाब समांतर का पानी तो नही देरे..कमसे कम यहाँ पानी तो पिलाव.

अक्रम : ओ, खैरेसाहेब काय केलंय तुम्ही समांतरचं. मै वकील हू हां. केस कर दुंगा.

खैरे : या संदर्भात मी नुकताच पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग, नगरविकास मंत्री कमलनाथ, राज्यमंत्री के. अनोप्पम, प्रधान सचिव जे. के. शर्मा, उपप्रधान सचिव के. के. वर्मा, वित्त विभागाचे सचिव जे. एस. रैना आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कृषिमंत्री शरद पवार यांच्याशीही बोललो आहे. ते मला म्हणाले..खैरेजी मी तुमच्या पाठीशी आहे. आपण लोकांना पाणी पाजणारच. माझ्या पाठीशी आई तुळजाभवानी आहे. संत महंतांचे आशीर्वाद आहेत. अरे, कोण आहे रे तिकडे..जरा त्या अशोक गहलोतजींना लाव बरं फोन.

राजेंद्र दर्डा : गहलोतजी..त्यांचे माझे खूप चांगले संबंध आहेत. परवाच्या दिवशी मी सोनियाजी, राहुलजी, मनमोहनजी यांचा एक कटाक्ष पाडून घेण्यासाठी दिल्लीला गेलो होतो. तेव्हा गहलोतजींचाही एक कटाक्ष माझ्या पदरात पडला होता.

खैरे : अरे, तिकडे राजस्थानात खूप म्हणजे खूप पाऊस झालाय. तिकडचं एक्सेस वॉटर आणता येईल आपल्याला. त्याची एक नवी योजना तयार करतोय मी.

अंबादास : पण साहेब, समांतरचे काय झाले. ती कधी सुरू होणार.

खैरे : अरे, ती होणार म्हणजे होणार. महापौर कला ओझांच्याच काळात होणार आहे. आई तुळजाभवानी माझ्या पाठीशी आहे. संत महंताचे आशीर्वाद मला आहेत. तुम्ही काही काळजी करू नका. राजस्थानातून पाणी आणण्याची पाच हजार कोटींची योजना तयार करतोय. ती आपल्याला यशस्वी करायची आहे.

चव्हाण : अहो, पण लोक ओरडतील ना. समांतरच झाली नाही तर ही नवीन काय काढली योजना.

खैरे : काही काळजी करू नका. मी आणि दर्डाजी सगळं सांभाळून घेतो. तुमच्यापैकी काहीजण योजनेच्या बाजूनं आणि काहीजण विरोधात बोलत राहा.

एम.एम. शेख : त्यानं काय होईल.

दर्डा : लोकांचं मनोरंजन. घशाला पडलेली कोरड विसरून लोक आपली लुटुपुटीची लढाई पाहत राहत राहतील. तोपर्यंत आपण आपले वाटे-हिस्से सेटल करून टाकू. योजना होईल तेव्हा होईल. काय कशी आहे आयडिया.

अंबादास : साहेब, तुमचे अन् बाबूजींचे डोके एकदम भन्नाट.

खैरे : मग उगाच का मी आणि बाबूजी नेहमी निवडून येतो. चला सुरू करूयात कोरडी होळी. (सगळे अवाक्.)