आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगपुर्‍यात अग्निकल्लोळामुळे काही काळ रस्‍ता बंद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद-औरंगपुर्‍यातील बलवंत वाचनालयाच्या शेजारील नॅशनल इलेक्ट्रॉनिक्सच्या शोरूमला गुरुवारी दुपारी 1.30 वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. तीन मजली इमारत आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. या आगीने दुकानासमोरील अर्धा रस्ता व्यापला होता. रात्री 12 वाजेपर्यंत ही आग आटोक्यात आणली जात होती.
एसी, फ्रिज, वॉशिंग मशीन यात असलेल्या कॉम्प्रेसरमधील गॅसच्या टाक्यांचे भीषण स्फोट झाल्याने ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाला मोठी कसरत करावी लागली. आगीचे कारण स्पष्ट झाले नाही. आगीत अंदाजे सात कोटींचे नुकसान झाल्याचे व्यापारी वतरुळात बोलले जात होते. होतचंद सावनाणी आणि लक्ष्मण सावनाणी यांनी दुकानाचे नूतनीकरण करत 1 मे 2014 रोजी वर्धापनदिन साजरा केला होता. सावनाणी गोदरेज कंपनीचे मराठवाड्यातील अधिकृत विक्रेता आहेत. दोन दिवसांपूर्वीच त्यांनी इलेक्ट्रॉनिक्सची उत्पादने आणली होती. गुरुवारी दुपारी पुण्याहून 46 फ्रिज, वॉशिंग मशीन ट्रकमधून उतरवण्याचे काम सुरू होते. ट्रकचालक भगवान बहुरे यांना तिसर्‍या मजल्यावर लागलेली आग दिसली. त्यांनी सावनाणी यांना सांगत ट्रक दुकानापासून लांब उभा केला. तळमजल्यापर्यंत आग येत असल्याचे पाहून सावनाणी यांच्यासह 10 ते 12 नोकरांनी दुकानाबाहेर पळ काढला. समोरचा भाग सोडता या शोरूमला तिन्ही बाजूंनी तटबंदी आहे. शोरूमशेजारी राहणारे रूपसंगम कापड दुकानाचे मालक विशाल पांडे यांच्या भिंतींमध्ये फक्त आठ फुटांचे अंतर आहे, तर व्हेंटिलेशन, आपत्कालीन मार्ग या शोरूमला नाही. त्यामुळे ही आग आटोक्यात आणण्यासाठी रस्त्यावरून आणि पांडे यांच्या गच्चीवरून पाण्याचा मारा सुरू होता. खालच्या मजल्यापासून तिसर्‍या मजल्यापर्यंत दोन्ही बाजूंनी भिंत फोडून पाण्याचा मारा करावा लागत होता.

मान्यवरांची घटनास्थळी धाव : आगीची माहिती मिळाल्यानंतर आमदार प्रदीप जैस्वाल यांच्यासह नगरसेवक अनिल मकरिये, राजेंद्र जंजाळ, गोपाळ कुलकर्णी, सुरेंद्र कुलकर्णी, सोमनाथ बोंबले यांनी धाव घेत सावनाणी यांना धीर दिला. तसेच दुपारी साडेचारच्या सुमारास खासदार चंद्रकांत खैरे, महापौर कला ओझा आणि महापालिका आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी आगीची माहिती घेत पाहणी केली. सावनाणी यांची निराला बाजार येथे देखील साई इलेक्ट्रिकल्स नावाची आणखी एक दुकान आहे. रौद्ररूप धारण केलेल्या आगीतून दुकानात जाण्यासाठी मार्गच नव्हता. त्यामुळे मनपाच्या जेसीबीने दुकानात जाण्यासाठी मार्ग मोकळा केला. लक्ष्मण सावनाणी दुकानातच ठाण मांडून होते. ते स्वत:च आग विझविण्याचा प्रयत्न करत होते. निकटवर्तीयांनी त्यांना दुकानातून बाहेर आणले.