आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयातांना संधी दिल्यास "दिल्ली' करू, भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांचा इशारा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मनपा निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतर करून भाजपमध्ये येणाऱ्या कार्यकर्त्यांना उमेदवारी दिल्यास औरंगाबादेतही दिल्लीसारखी परिस्थिती निर्माण होईल, असा इशाराच भाजपमधील निष्ठावान कार्यकर्त्यांनी दिला आहे.
भाजपमध्ये सध्या सुरू असलेल्या "इनकमिंग'बाबत "दिव्य मराठी'ने पक्षातील काही niष्ठावान कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली असता ऐनवेळी भाजपमध्ये येऊन उमेदवारी पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना आपण तीव्र विरोध करू, असे स्पष्टपणे बोलून दाखवले.
गेल्या पंधरा वर्षांपासून भाजपचे अनेक कार्यकर्ते निष्ठेने काम करत आहेत. मनपात भाजप-सेना युती असल्याने अनेकांना वर्षानुवर्षे काम करूनही म्हणावी तशी संधी मिळाली नाही. या वेळी भाजप पदाधिकारी स्वबळाची भाषा करत असल्याने अनेकांना नगरसेवकपदाची उमेदवारी मिळेल, अशी अपेक्षा आहे. त्यातही आरक्षणही हवे असलेलेच मिळाल्याने योगायोगाने निवडणूक लढण्याची संधी अनेकांना खुणावत आहे. मात्र, याच वेळी इतर पक्षांतील आजी-माजी नगरसेवक तसेच कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. यापैकी अनेकांना भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवायची असूनही पक्षही त्यांना संधी देण्याची शक्यता आहे. त्यामुळे निष्ठावान इच्छुकांना याही वेळेस संधी हातून जाण्याची भीती वाटत आहे.
युती झाली तर लागणार कस

भाजप आणि सेनेने "एकला चलो रे'चा नारा देऊन आपापली बाजू उभारण्याचे काम करण्यात येत असले तरी छावणीच्या धर्तीवर युती झालीच तर ज्या ठिकाणी शिवसेनेचे वर्चस्व आहे, अशा ठिकाणी भाजपच्या इच्छुकांचा दुसरीकडे संधी मिळण्यासाठी कस लागणार आहे. तसेच पक्षातील पदाधिकाऱ्यांनाही तिकीट देताना अग्निपरीक्षा द्यावी लागेल.
निष्ठावंतांवर अन्याय नाही

^जे निष्ठावान सक्षम उमेदवार असतील, त्यांच्यावर कोणत्याही प्रकारे अन्याय होणार नाही याची काळजी घेऊ. तसेच नव्याने येणाऱ्या इच्छुकांनाही वाऱ्यावर सोडणार नाही.
भगवान घडामोडे, शहराध्यक्ष, भाजप
दोन आयात नेत्यांना संधी

दोन जणांना आरक्षणाचा लाभ मिळणार असला तरी संबंधित वॉर्डात भाजपचे काम करणाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आयात उमेदवाराला वॉर्डात उभे केल्यास त्याच्याविरोधात बंडखोरी अथवा विरोधी प्रचार करू, अशा थेट शब्दांत या कार्यकर्त्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. जुन्या कार्यकर्त्यावर अन्याय होणार नसल्याचे वरिष्ठांनी सांगितले असले तरी ऐन वेळी तसे झालेच तर दिल्लीप्रमाणे शहरात भाजपचे पानिपत होईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.