आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादेत ८१ कोटींचे सुसज्ज ऑटोक्लस्टर उभे, मार्चमध्ये उद्घाटनाची शक्यता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - औरंगाबादच्या वाळूज औद्योगिक वसाहतीत एक लाख चौरस फुटांवर भव्य मराठवाडा ऑटोक्लस्टर उभारण्यात आले असून, तेथे उत्पादन प्रक्रियाही सुरू झाली आहे. उद्योजकांच्या सहभागातून उभारलेले ८१ कोटी खर्चाचे हे केंद्र देशातील पहिलेच ठरले आहे.
अत्यंत अद्ययावत रीतीने बांधलेल्या या क्लस्टरच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण पाठवले असून, येत्या मार्चमध्ये हा सोहळा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

तत्कालीन उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या हस्ते जून २०१२ मध्ये या ऑटोक्लस्टरचे भूमिपूजन झाले. दोन भागांत हे क्लस्टर उभे राहिले आहे. ५० हजार चौरस फुटांच्या जागेत यांत्रिक विभाग आहे. या ठिकाणी महागडी मशिनरी असून, उद्योजकांना त्यांच्या गरजेनुसार ऑटोपार्ट किंवा मशिनिंगचे काम करून मिळत आहे. दुसऱ्या भागात ५० हजार चौरस फुटांवर एक्झिबिशन सेंटर तयार झाले आहे.
उद्योजकांचे प्रदर्शन, चर्चासत्रे यासाठी येथे जागतिक दर्जाच्या सुविधा आहेत. तसेच आपल्या कंपनीतील उत्पादनांचा डिस्प्ले करण्याची सुविधाही आहे. क्लस्टरच्या संचालक मंडळावर १० उद्योजक असून, प्रसिद्ध उद्योजक राम भोगले त्याचे अध्यक्ष आहेत.{ ऑटोमोबाईल, प्लास्टीक पार्ट, प्रोसेसिंग मशिनवरून ऑर्डरनुसार हवे ते मिळले.
३० उद्योजकांनी उचलला खर्चाचा १० टक्के वाटा

केंद्र व राज्याच्या सहभागाने राज्यात याआधी दोन क्लस्टर उभे ठाकले. ते पुणे व नाशिक येथे आहेत. तेथे उद्योजकांचा गुंतवणुकीत सहभाग नाही. मराठवाडा ऑटोक्लस्टरमध्ये मात्र सीएमआयएच्या ३० उद्योजकांनी गुंतवणूक केली आहे. केंद्र ७० टक्के, राज्य २०, तर उद्योजकांचा १० टक्के वाटा खर्चाच्या रकमेत आहे.
ऑटोक्लस्टर नेमके काय?

- औरंगाबादेतील कोणती कंपनी काय उत्पादन करते याची माहिती देश-विदेशातून येणाऱ्या उद्योजकाला एकाच ठिकाणी मिळेल.

- उद्योजकाला महागडी मशिनरी घेणे परवडत नाही. शुल्क आकारून क्लस्टरमधून ते काम करून मिळू शकेल.
- अवघड स्वरूपाचे पार्टही क्लस्टरमध्ये तयार करून मिळतील. यामुळे मुंबई, पुण्याचा हेलपाटा, वेळ व पैसा वाचेल.

- उत्पादन हा क्लस्टरचा उद्देश नसून, स्पेशलाइज जॉबवर्क उद्योजकांना तयार करून देणे आहे.
- शिटमेटल प्रोसेसिंग, लेझर कटींग, कॉईल प्रोसेसिंग याची सुविधा या ठिकाणी आहे.
- लेझर कटिंगचे पाच कोटींचे मशिन काही क्षणांत ते लोखंड कट करते. यासाठी आधी पुण्याला जावे लागे.
- ऑटो ब्लॅकिंग हे १० कोटींचे मशीन तत्काळ पत्र्याचे रोल शीट कट करते. मराठवाड्यातील हे पहिलेच मशिन.
मोदींना आमंत्रण देणार
- उदयोजकांच्यासहभागाचे देशातील हे पहिले क्लस्टर आहे. मेक इन इंडिया या पंतप्रधानांच्या संकल्पनेनुसार ते तयार झाल्याने उद्घाटनही त्यांच्या हस्ते व्हावे अशी इच्छा आहे. मार्चमध्ये उद्घाटनाची योजना असून, मोदी यांना तसे निमंत्रण देणार आहोत. -राम भोगले,अध्यक्ष,संचालक मंडळ, ऑटोक्लस्टर
१५० उद्योजकांनी घेतला लाभ

महिना १६ लाखांचे जॉबवर्क : क्लस्टर२५ टक्के कार्यान्वीत झाले असून, दीडशेहून जास्त उद्योजकांनी या सुविधेचा फायदा घेतला. गेल्या तीन महिन्यापासून दरमहा १६ लाखांचे जॉबवर्क क्लस्टरने स्थानिक उदयोजकांना करून दिले आहे.