आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ऑटोरिक्षा २५ हजार, तर सिटी बस केवळ २७

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शहरात येणारे लाखो प्रवासी, शालेय-महाविद्यालयांत शिक्षण घेत असलेले विद्यार्थी, चिकलठाणा, वाळूज, शेंद्रा एमआयडीसीत जाणारे शेकडो कामगार व कर्मचारी यांच्या सेवेसाठी एसटीच्या केवळ २७ सिटी बस धावतात. याउलट शहरातील ऑटोरिक्षांची संख्या २४ हजार ७८० आणि खासगी टॅक्सींची संख्या २ हजार २७१ एवढी आहे. प्रवाशांच्या तुलनेत बसची संख्या अत्यल्प असल्याने ऑटोरिक्षा आणि खासगी टॅक्सीवरच शहरातील प्रवासी वाहतुकीची मदार आहे. एसटी महामंडळाच्या नियोजनशून्य कारभारामुळे सिटी बसची संख्या वाढण्याऐवजी ती शंभरवरून सत्तावीसवर खाली आली आहे.

शहरात विभागीय कार्यालय, उच्च शैक्षणिक संस्था, जागतिक दर्जाची पर्यटनस्थळे, औद्योगिक वसाहत, बाजारपेठ, अत्याधुनिक रुग्णालये, मराठवाड्यातील एकमेव प्राणिसंग्रहालय आहे. पर्यटनस्थळांना भेटीसाठी दररोज देश-विदेशातील पर्यटक येतात. तसेच शेतकरी, उद्योजक, व्यापारी, ग्राहक, उत्पादक, साहित्यिक, शास्त्रज्ञ आदी शहराला भेट देतात. शहराची लोकसंख्या १५ लाखांवर पोहोचली आहे. हजारो चाकरमान्यांना ये-जा करावी लागते. प्रवासासाठी शहरात केवळ २७ बस धावत आहेत. बसची संख्या अत्यल्प असल्याने खासगी वाहतुकीला चांगलाच वाव मिळाला असून ऑटोरिक्षा २४ हजार ७८० आणि २ हजार २७१ खासगी टॅक्सीची संख्या पोहोचली आहे. बसची संख्या मात्र १०० वरून २७ वर खाली आली आहे. बहुतांश भागात बस जात नसल्याने खासगी वाहतुकीवरच प्रवाशांची मदार आहे. दुसरीकडे शहर बसची अवस्थाही आणखी बिकट होत आहे. बसला प्रवासी मिळत नाहीत. रिक्षाद्वारे अवैध प्रवासी वाहतूक होत आहे. महामंडळ मात्र प्रवाशांच्या सोयीसाठी कोणतेही नियोजन करत नाही. परिणामी महामंडळाचेच लाखो रुपयांचे उत्पन्न बुडत आहे. याकडे नवीन सरकारने लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

बसअभावी दुप्पट भुर्दंड
मध्यवर्ती बसस्थानक ते सिडको बसस्थानक सिटी बसचे भाडे केवळ ११ रुपये आहे, पण सिटी बसची संख्या बोटावर मोजण्याएवढीच असल्याने प्रवाशांना नाइलाजास्तव शेअरिंग रिक्षासाठी २० रुपये मोजावे लागतात. स्वतंत्र रिक्षा केल्यास प्रतिकिमी ११ रुपयेप्रमाणे १०० रुपये द्यावे लागतात. सर्वसामान्य प्रवाशांना स्वतंत्र रिक्षाने प्रवास करणे परवडत नाही. सिटी बस वेळेवर येत नाही. पाच पाठीमागे व चालकाशेजारी दोन असे सात प्रवासी घेऊन तीन आसनी रिक्षा धावत असल्याने मानसिक त्रास होतो तो वेगळाच.

इच्छाशक्तीचा अभाव
शहरातील लोकसंख्या, पर्यटक व प्रवासी, विद्यार्थी, नोकरदारांची संख्या लक्षात घेतली, तर शहरात शंभरपेक्षा अधिक सिटी बसची गरज आहे, पण नियोजनाचा अभाव आणि राजकीय, प्रशासकीय इच्छाशक्तीचा अभाव असल्याने सिटी बसची संख्या १०० वरून २७ वर खाली आली आहे. महामंडळाच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी नवीन सरकारने जागतिक दर्जाच्या शहराकडे तातडीने लक्ष देऊन सिटी बसची संख्या त्वरित वाढवणे नितांत गरजेचे आहे.
वसंतराव शिंदे, ज्येष्ठ नागरिक

विचार केला जाईल
प्रवासी सिटी बसमध्ये बसत नसल्याने बसची संख्या कमी करण्यात आली. प्रवाशांनी मागणी केल्यास त्या विभागात सिटी बस वाढवण्यासंदर्भात विचार केला जाईल.
संजय सुपेकर, विभागीय नियंत्रक.