आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिक्षा भाडे पहिल्या किमीला 18 रुपये करा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - मीटरनुसार भाडे परवडत नसल्याचे सांगत रिक्षाचालक प्रवाशांची लूट करत आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस वाहतूक व्यवस्था कोलमडत आहे. याचा गांभीर्याने विचार करत प्रवाशांची लूट आणि रिक्षाचालकांच्या पोटाची तूट थांबवावी, अशी मागणी सहा सामाजिक संघटनांनी आरटीओ कार्यालयाकडे केली आहे. प्रवासी आणि रिक्षाचालकांमध्ये होणारे वाद टाळण्यासाठी पहिल्या एक किलोमीटरला 12 ऐवजी 18 रुपये भाडे करावे. मीटरनुसारच रिक्षा चालवण्याची सक्ती करावी, असाही उपाय त्यांनी सुचवला आहे.

राज्य शासनाच्या आदेशानुसार औरंगाबादच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयाने मीटर सक्तीचे फर्मान काढले. मात्र, 25 हजारपैकी फक्त तीन हजार रिक्षाचालकांनी मीटरही बसवून घेतले. त्यातही बोटावर मोजण्याइतक्याच रिक्षा मीटरवर धावत आहेत. यासंदर्भात भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन न्यासाचे संघटक रामराव बोर्डे, अर्थक्रांती जनसंसदचे जिल्हा सचिव चंद्रकांत वाजपेयी, दीपशिखा फाउंडेशनच्या अध्यक्ष मनीषा चौधरी, आम आदमी पक्षाचे उदयकुमार सोनोने, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे माजी सचिव मधुर पांडे, इंजिनिअरिंग यूथचे संघटक आकाश शिंदे, अनंत मोताळे, नितीन महाजन यांनी शनिवारी आरटीओ कार्यालयाचे अधीक्षक वि. बा. गांगुर्डे यांची भेट घेतली.

प्रवाशांची लूट : शहरात किमान 300 एसटी बसची गरज असताना फक्त 30 बस धावत आहेत. त्यामुळे लोकांसमोर रिक्षाशिवाय अन्य पर्याय नाही. हे लक्षात आल्याने रिक्षाचालक त्यांची सरळ लूट करत आहेत. बाबा पेट्रोल पंप चौकातून उल्कानगरीत जाण्यासाठी 90 ते 100 रुपये मागितले जातात. मीटरचे भाडे परवडत नाही, असे स्पष्टपणे सांगितले जाते. वस्तुत: एवढय़ा अंतरासाठी मीटरद्वारे 60 रुपये अपेक्षित आहेत. तीन हजारपैकी जेमतेम 100 चालकच मीटरचा वापर करतात. उर्वरितांवर कोणतीही कारवाई होत नाही. अनेक रिक्षांमध्ये आठ-दहा प्रवासी कोंबलेले असतात, असे शिष्टमंडळाने निदर्शनास आणून दिले.

‘नो व्हेइकल डे’
पेट्रोल-डिझेल बचतीसाठी आरटीओ तसेच इतर सर्व सरकारी कार्यालयांनी पुढाकार घेऊन महिन्यातून एक दिवस ‘नो व्हेइकल डे’ आयोजित करावा. प्रदूषण करणार्‍या वाहनांवर कारवाई करावी, अशीही सूचना करण्यात आली. त्यावर वरिष्ठांशी चर्चा करून योग्य तो निर्णय घेऊ, असे आश्वासन गांगुर्डे यांनी दिले.

दरवाढ करावी
पेट्रोलचे दर दरमहा वाढत आहेत. महागाई आकाशाला भिडत आहे. खराब रस्त्यांमुळे वाहनांमध्ये बिघाड होण्याचे प्रमाण वाढले आहे. याचा विचार करून पुणे आरटीओने 16 ऑक्टोबर 2013 पासून रिक्षांचे भाडे पहिल्या एक किलोमीटरला 11 ऐवजी 17 रुपये केले आहे. त्याच धर्तीवर औरंगाबादमध्येही एक रुपया अधिक वाढ केली, तर सर्व रिक्षाचालक मीटरचा वापर करतील. त्यांनाही कुटुंब चालवण्यास मदत होईल.