आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Automatic Meteorological Center In Aurangabad District Vaijapur

स्वयंचलित हवामान केंद्रे उभारणीचा मार्ग मोकळा, चार वर्षांपासून रखडलेला होता प्रस्ताव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वैजापूर - चार वर्षांपासून चर्चेत असलेले स्वयंचलित हवामान केंद्र यंदाच्या हंगामात चालू होण्याची आशा निर्माण झाली आहे. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रकल्पासाठी नियोजित जागेची माहिती संकलनाचे काम हाती घेतले आहे. दरम्यान, तालुक्यातील १० महसूल मंडळांसह जिल्ह्यातील ६५ महसूल मंडळांमध्ये स्वयंचलित हवामान केंद्रे उभारण्यात येणार आहेत. या केंद्रांमुळे गावपातळीवर वातावरणातील बदलाची माहिती मिळून उपाययोजना करता येणे आता सोपे होणार आहे.

पाऊस, तापमान, आर्द्रता व वाऱ्याचा वेग याची अचूक माहिती घेऊन त्याचे निष्कर्ष काढून शेतकऱ्यांना योग्य सल्ला देता यावा, यासाठी स्वयंचलित हवामान केंद्रांची स्थापना करण्याचा हेतू सरकारने डोळ्यासमोर ठेवला होता. प्रत्येक दहा किलोमीटरला हवामान बदलते. त्यामुळे वातावरणातील बदलाचा फटका शेतकऱ्यांना बसू नये व हवामानाच्या अचूक अंदाजासाठी राज्यातील महसूल मंडळाच्या गावात हवामानाचे स्वयंचलित केंद्र उभारण्याची घोषणा करण्यात आली होती. यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून यासाठी ५० कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले होते. पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपमधून (पीपीपी) ही केंद्रे सुरू करण्याचे कंत्राट एका खासगी कंपनीला देण्यात आले. त्यासाठी राज्यभरातील महसूल मंडळांत हवामान केंद्रांसाठी जागाही निश्चित करण्यात आल्या होत्या. या योजनेसाठी निधी, मनुष्यबळ व अंमलबजावणीचे स्वातंत्र्य असतानाही गेल्या चार वर्षांपासून ही केंद्रे कागदावरच
राहिली आहेत.

जिल्ह्यात ६५ ठिकाणी केंद्रे
जिल्ह्यातील औरंगाबाद तालुक्यात १० महसुली मंडळे, पैठण १०, फुलंब्री ४, वैजापूर १०, गंगापूर ९, खुलताबाद ३, सोयगाव ३ व सिल्लोड व कन्नड प्रत्येकी ८ अशा एकूण ६५ महसुली मंडळांच्या ठिकाणी हे हवामान केंद्र उभारण्यात येणार आहे. यासाठी २०१२ मध्ये महसूल विभागाने जागा निश्चित केल्या होत्या. मात्र, या निवड केलेल्या जागांची तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी, महसूल मंडलाधिकारी व मंडळ कृषी अधिकारी यांनी पुनर्पाहणी करावी. तसेच त्यांना आवश्यकता वाटल्यास स्थळबदल नमूद करून नवीन अहवाल सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी वीरेंद्रसिंह यांनी दिल्या आहेत. त्यामुळे हवामान केंद्र उभारण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे दिसत आहे.
आपत्तीसह दुर्लक्षही वाढले
हवामान केंद्रांकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याबद्दल शेतकऱ्यांमार्फत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. जिल्ह्यात मंडळ स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्याचा निर्णय कृषी खात्याने घेतला होता. यामध्ये तालुक्यातील वैजापूर, महालगाव, शिऊर, बोरसर, नागमठाण, लासूरगाव, गारज, लोणी खु., लाडगाव व खंडाळा महसूल मंडळाच्या गावांमध्ये हवामान केंद्रे उभारली जाणार आहेत. याबाबत ३१ नोव्हेंबर २०१२ रोजी कृषी आयुक्त कार्यालयास जिल्हाधिकारी कार्यालयाने माहिती तसेच हवामान केंद्र उभारणीचा प्रस्ताव पाठवला होता. जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या सोयीसाठी उभारल्या जाणाऱ्या हवामानावर आधारित स्वयंचलित हवामान केंद्रांचे भिजत घोंगडे मागील चार वर्षांपासून पडून आहे.
उपलब्ध यंत्रणाही कुचकामी
सध्या केंद्र शासनाच्या हवामानशास्त्र विभागामार्फत प्रत्येक जिल्ह्यात एक स्वयंचलित हवामान केंद्र व प्रत्येक जिल्ह्यात दोन याप्रमाणे ६९ स्वयंचलित पर्जन्यमापके कार्यरत आहेत. त्यापैकी बहुतेक केंद्रांची अवस्था दयनीय आहे. गेल्या काही नैसर्गिक आपत्तींचे स्वरूप पाहता गावोगावी हवामान घटकांची स्थिती वेगवेगळी आहे. प्रत्येक गावाची गरज वेगळी असताना प्रत्यक्षात ही यंत्रणा शेतकऱ्यांपासून कोसो दूर फक्त जिल्ह्याच्या ठिकाणी मर्यादित असल्याचे चित्र आहे.
हवामान केंद्रामुळे शेतकऱ्यांचा फायदा
वातावरणातील बदलाची नोंद घेता यावी, याकरिता गावपातळीवर स्वयंचलित हवामान केंद्राची उभारणी करण्यात येणार होती. या केंद्राचा मुख्य उद्देश हा हवामान आधारित पीकविमा योजनेसाठी होता. यामुळे शेतकऱ्यांना मोलाचे मार्गदर्शनही मिळणार होते. त्या अनुषंगाने २ वर्षांपूर्वी माहिती संकलित करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर याचे काय झाले हे सांगता येणार नाही.
चांगदेव जवणे, मंडळ कृषी अधिकारी.