आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Automobile News In Marathi, Cars And Two Wheelers Price Hike

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कार, दुचाकी महागणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरवरील एलबीटी रद्द करण्याची मनपाने तयारी चालवली असून त्यापोटी होणारा तोटा 10 लाखांपर्यंतच्या कार आणि मोटारसायकलींवरील एलबीटी वाढवून भरून काढण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे.
गेल्या स्थायी समितीच्या बैठकीत सभापती नारायण कुचे यांनी मुख्य लेखा परीक्षक मो. रा. थत्ते यांना गॅसवरील एलबीटीसंदर्भात अहवाल सादर करण्यास सांगितले. त्यानुसार आजच्या बैठकीत थत्ते यांनी अहवाल सादर केला. त्यात सिलिंडरवरील एलबीटी रद्द केल्यास किमान दोन कोटी रुपयांचे उत्पन्न घटणार असल्याचे सांगितले. एलबीटी रद्द केल्यास विनासबसिडी सिलिंडर पावणेअकरा रुपयांनी तर सबसिडीचे सिलिंडर 4 रुपयांनी स्वस्त होऊ शकते.
गॅस सिलिंडरवर सर्वाधिक एलबीटी नागपूर, नाशिक मनपात आहे. तेथे हा दर दोन टक्के आहे, तर औरंगाबाद, अहमदनगर, उल्हासनगर आणि चंद्रपूर मनपात 1 टक्का ठाणे व कोल्हापुरात अर्धा टक्का दराने एलबीटी आकारला जातो. पुणे, पिंपरी चिंचवड, जळगाव मनपाने एलबीटी रद्द केला आहे.
2 कोटींची भरपाई दुसरीकडून
मनपाला गेल्या आर्थिक वर्षात गॅसच्या माध्यमातून 1 कोटी 81 लाख 20 हजार 675 रुपये एलबीटी मिळाला होता. यंदा आतापर्यंत हा आकडा 1 कोटी 10 लाख 84 हजार 938 रुपयांपर्यंत पोहोचला. तो मार्चअखेर दोन कोटी रुपयांपर्यंत पोहोचेल. त्यामुळे हा तोटा भरून काढण्यासाठी चार वस्तूंवरील एलबीटी वाढवण्याची सूचना थत्ते यांनी केली. त्यानुसार 10 लाख रुपयांपेक्षा कमी किंमत असलेल्या कारवरील सध्या असलेला दीड टक्का एलबीटी अडीच टक्के तर मोटारसायकलींवरील एलबीटी पाव टक्क्याने वाढवण्याचाही प्रस्ताव आहे. तसेच आयात परफ्यूम, सुगंधी तेल, अत्तरांच्या एलबीटीत अर्धा टक्का, तर आयात टाइल्सवर 1 टक्का एलबीटी वाढवण्याचा प्रस्ताव आहे. यामुळे कार घेऊ इच्छिणार्‍यांना सरासरी 5 ते 10 हजारांचा अधिक भुर्दंड पडेल. या प्रस्तावाला विकास जैन, समीर राजूरकर यांनी दुसर्‍या वस्तूंवर एलबीटी वाढवा असे सांगत प्रारंभी विरोध केला. पण नंतर कुचे यांनी आहे तसा प्रस्ताव मंजूर करीत त्यात लॉटरीवर एलबीटी लावावा असे जोडत सरकारकडे प्रस्ताव पाठवा, असे निर्देश दिले.