आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुमार शिक्षकांनाच बनवले जाते विषयतज्ज्ञ प्रशिक्षक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी विषयतज्ज्ञ न आल्याने ऐनवेळी पर्यायी व्यवस्था करून प्रशिक्षणाचा सोपस्कार पूर्ण केला जात आहे, तर दुसरीकडे बदललेल्या अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण शैक्षणिक वर्ष सुरू होण्याआधी देणे आवश्यक असताना अद्याप शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आलेले नाही. त्यामुळे गुणवत्तापूर्ण शिक्षण ही घोषणा हवेतच विरल्याचे चित्र आहे.

विद्यार्थाला गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे आणि बदलत्या अभ्यासक्रमांचे शिक्षकांना आकलन व्हावे यासाठी शिक्षण विभागाच्या वतीने शिक्षकांच्या प्रशिक्षण वर्गाचे आयोजन केले जाते. या वर्षी मात्र पहिली ते तिसरी आणि दहावीचा अभ्यासक्रम बदलला असतानाही शिक्षकांना अद्याप प्रशिक्षण मिळालेले नाही. विशेष म्हणजे शासनाच्या वतीने एका शिक्षकामागे दररोज 70 रुपयेप्रमाणे मानधन आणि चहा, नाष्ट्यासाठी स्वतंत्र निधी उपलब्ध करून देण्यात येतो. राज्यभरात शासनाच्या वतीने कोट्यवधी रुपये अशा प्रशिक्षणासाठी खर्च केले जातात.

प्रकरण 1 : विज्ञान प्रशिक्षण
सप्टेंबर महिन्यात विज्ञान विषयाच्या शिक्षकांसाठी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते, परंतु विषयतज्ज्ञाने ऐनवेळी येण्यास नकार दिल्याने विषयाचे जेमतेम ज्ञान असलेल्या शिक्षकांनाच प्रशिक्षक म्हणून उभे करण्यात आले.
'
प्रकरण 2 : गणित प्रशिक्षण
सप्टेंबर महिन्यातच गणित विषयाच्या शिक्षकांसाठीदेखील प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते, परंतु विभागातील आलबेल कारभारामुळे आधी दिलेल्या प्रशिक्षणाचे पैसे न मिळाल्याने विषयतज्ज्ञाने प्रशिक्षणासाठी येण्यास नकार दिला.

अर्धे वर्ष संपल्यावर प्रशिक्षण
यंदा अभ्यासक्रमात बदल झाले आहेत. विज्ञान आणि इंग्रजी या दोन विषयांचे प्रशिक्षण वर्ग 20 नोव्हेंबरला सुरू होणार आहेत. परंतु अर्धे शैक्षणिक वर्ष संपल्यावर त्याचा उपयोग नाही.
वाल्मीक सुरासे, अध्यक्ष, महाराष्‍ट्र राज्य शिक्षकेतर महामंडळ

अधिकचे तास हवेत
हिंदी भाषा विषय महत्त्वाचा आहे, परंतु त्यासाठी दिलेल्या तासिकेत अभ्यासक्रम पूर्ण होऊ शकत नाही. त्यासाठी अधिकच्या तासिका अपेक्षित आहेत. ना प्रशिक्षण वेळेत मिळते ना तासिका वाढवून मिळतात. सर्व बाबतीत शिक्षकांना दोषी ठरवले जाते.
सविता कानडे, शिक्षिका

मराठी विषयाचे प्रशिक्षण नाही
इयत्ता दहावीचा अभ्यासक्रम बदललेला आहे. त्यातील काही कविता आणि धडे अवघड आहेत. त्यासाठी जूनपूर्वीच प्रशिक्षण मिळायला हवे होते. मात्र, अद्याप प्रशिक्षण झालेले नाही.
आशा माल्टे, शिक्षिका