औरंगाबाद - काही वृत्तवाहिन्यांनी निवडणुकीच्या अगोदर सर्व्हे करून मनसेला येणाऱ्या विधानसभेत दहा जागा मिळतील, असे भाकीत केले आहे. यास अनेक राजकीय पंडितांनीही मूकसंमती दर्शवली आहे. मात्र, या सर्व्हेवर आमचा विश्वास नाही, अधिक अभ्यास करून अशा प्रकारचा सर्व्हे व्हायला हवा, असे मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस अविनाश अभ्यंकर यांनी व्यक्त केले. शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
राज ठाकरे यांच्या १५ सप्टेंबरच्या दौऱ्याविषयी माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे अायोजन करण्यात आले होते. या वेळी मनसे राज्य उपाध्यक्ष दिलीप चितलांगे, शहराध्यक्ष सुमीत खांबेकर, बाबासाहेब डांगे, राज वानखेडे, भास्कर गाडेकर, ज्ञानेश्वर डांगे, बिपिन नाईक यांची उपस्थिती होती. या वेळी बोलताना अभ्यंकर म्हणाले, नाशिक येथील काँग्रेससोबतची युती म्हणजे स्थानिक राजकारण लक्षात घेऊन उचललेले पाऊल आहे. औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मनसे सदस्य कोणासाेबत जातील याबाबत विचारले असता त्यांनी उत्तर देण्याचे टाळले. मनसे सदस्य तिरुपतीला गेल्याचे मला या ठिकाणी आल्यावर कळाले. त्यांना ताबडतोब परत बोलावले आहे, असेही अभ्यंकर यांनी सांगितले.
२०० उमेदवार इच्छुक
मराठवाड्यातील ४६ मतदारसंघांसाठी २०० उमेदवार इच्छुक आहेत. या सगळ्यांच्या मुलाखती सोमवारी (१५ सप्टेंबर) जालना रोडवरील सागर लॉन येथे सकाळी साडेनऊपासून राज ठाकरे घेणार आहेत. शहरात पूर्व मतदारसंघासाठी सुमीत खांबेकर, मध्यसाठी राज वानखेडे, कन्नडसाठी सुभाष पाटील, पैठणसाठी डॉ. सुनील शिंदे, फुलंब्रीसाठी भास्कर गाडेकर, बाबासाहेब डांगे, गंगापूरसाठी दिलीप बनकर आदी नावे चर्चेत आहेत. याशिवाय इतर पक्षांतील काही नेते मनसेत येण्यास इच्छुक आहेत. त्यांचाही विचार करण्यात येईल, असे अभ्यंकर यांनी सांगितले.