आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘साइड स्टँड’चे अपघात रोखा अवघ्या 20 रुपयांत!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - ‘साइड स्टँड’ लावलेले असताना दुचाकी चालवल्याने अनेक अपघात होतात आणि काहींना जीवदेखील गमवावा लागतो. यावर उपाय म्हणून आठवीत शिकणार्‍या आदित्य उबाळेने स्टँडलाच 20 रुपये किमतीची लोखंडी पट्टी वेल्डिंग करून लावली आणि ‘साइड स्टँड’ काढत नाही तोपर्यंत ‘गिअर लॉक’ राहण्याची सोय झाली.

घाई गडबडीत, अनवधानाने साइड स्टँड न काढताच दुचाकी सुसाट पळवण्याचा बहुतेकांचा शिरस्ता असतो. मात्र, जेव्हा डावीकडे एखादा अडथळा येतो तेव्हा स्टँड अडकते आणि दुचाकीला झटका बसतो. अशा वेळी अपघात होऊ शकतो किंवा डाव्या बाजूला एखादी व्यक्ती असल्यास गंभीर इजाही होऊ शकते. त्याहीपेक्षा धोकादायक स्थिती तेव्हा निर्माण होते जेव्हा साइड स्टँड लटकत असते आणि डावीकडे वळायचे असते. अशा वेळी दुचाकी उलटून हमखास गंभीर अपघात होण्याची दाट शक्यता असते. असे सगळे अपघात टाळण्यासाठी साइड स्टँड काढूनच दुचाकी चालवणे महत्त्वाचे असते. मात्र, सद्य:स्थितीत बहुतांश कंपन्यांच्या दुचाकींचे साइड स्टँड लावलेले असतानाही दुचाकीस्वाराला सावध करण्यासाठी उपाययोजना केलेली नाही. अगदी तुरळक दुचाकींमध्ये बझरची सोय करण्यात आली आहे. मात्र, बहुतेक दुचाकींना ही सोय नाही. त्यामुळे अनेक अपघात होतात. यावर उपाय म्हणून आदित्यने बनवलेली ही पट्टी अवघ्या 20 ते 25 रुपयांत मोटारसायकलला बसवल्यास साइड स्टँडमुळे तरी अपघात होणार नाहीत, याची शाश्वती झाली आहे.

गिअर पुढे असले तरी प्रयोग उपयुक्त : बाईकचे गिअर मागे असल्यास पट्टीमुळे गिअर लॉक होतात. मात्र, पुढे गिअर असलेल्या दुचाकींसाठी ‘सी’ आकाराची पट्टी करून साइड स्टँडलाच थोडीशी वेगळी लावावी लागते. त्यामुळे दुचाकीचे गिअर मागे असो वा पुढे, हा प्रयोग उपयुक्त ठरत असल्याचा आदित्यचा दावा आहे. सेंट जॉन इंग्लिश हायस्कूलचा विद्यार्थी असलेला आदित्य इयत्ता नववीत गेला आहे. दरम्यान, गेल्या महिन्यात वाळूज परिसरात साइड स्टँड लावलेले असताना वाहन चालवताना वडगावच्या एका तरुणाचा मृत्यू झाला होता. तर मागचा दुचाकीस्वारही जखमी झाला.


शाळकरी मुलाने सोडवला कायमचा प्रश्न
रामचंद्र उबाळे यांच्या दुचाकीचे साइड स्टँड खुले राहिल्याने त्यांचा तीन वेळा अपघात झाला. वडिलांच्या अपघातापासून रामचंद्र यांचा मुलगा आदित्यने धडा घेतला व एक साधी ‘एल’ आकाराची लोखंडी पट्टी साइड स्टँडला वेल्डिंग केली. त्यामुळे स्टँड लावल्यास ती पट्टी बरोबर खालून गिअरपर्यंत पोहोचते आणि गिअरची हालचाल रोखते.