आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रॅली अन् पथनाट्याद्वारे करणार शहरात हेल्मेटची जनजागृती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - नागरिकांमध्ये हेल्मेटविषयी जनजागृती निर्माण व्हावी, यासाठी सोमवारपासून शहरात वाहतूक सप्ताहास राबवला जाणार आहे. मोटारसायकल रॅलीने सप्ताहाला सुरुवात होणार असून यात हेल्मेट घालणाऱ्या वाहनधारकांनाच सहभागी होता येणार आहे. पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांच्या हस्ते पोलिस आयुक्तालय येथून सकाळी ९.३० वाजता रॅली काढण्यात येणार असल्याची माहिती शनिवारी पत्रकार परिषदेत देण्यात आली.

या वेळी उपायुक्त वसंत परदेशी, संदीप आटोळे, खुशालचंद बाहेती, अविनाश आघाव, अशोक मुदीराज आणि डॉ. के. एस दराडे यांची उपस्थिती होती. या सप्ताहात वाहतुकीच्या नियमांबाबत जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत. सोमवारी मोटारसायकल रॅली आयुक्त कार्यालय येथून निघून बाबा पेट्रोलपंपमार्गे क्रांती चौक, सिडको बसस्टँड, हर्सूल टी पॉइंट, दिल्ली गेट, भटकल गेट मार्गे जाऊन पुन्हा पोलिस आयुक्तालय येथे रॅलीचा समारोप होईल. वाहतूक पोलिसांच्या कार्याची माहिती घेण्यासाठी प्रत्यक्ष नागरिकांना त्यांच्यासोबत काम करता येणार आहे. याशिवाय पोस्टर मेकिंग, डॉक्युमेंट्री, पथनाट्याद्वारे वाहतूक नियम अंमलबजावणी याविषयी जनजागृती केली जाणार आहे. १२ जानेवारी रोजी एमजीएम येथील रुख्मिणी सभागृहात विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, शारीरिक शिक्षण विभागाचे प्राध्यापक, सरकारी अधिकारी, एनएसएस, एनसीसी आणि आरएसपीचे विद्यार्थी यांच्यासाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. १६ जानेवारी रोजी पालकमंत्री रामदास कदम यांच्या उपस्थितीत या सप्ताहाचा समारोप करण्यात येणार आहे. सकाळी साडेनऊ वाजता शहरातील विविध शाळांतील एक हजार आर. एस. पी.चे विद्यार्थी या वेळी परेड करणार आहेत. या सप्ताहात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मागील वर्षाची स्थिती
२०१५या वर्षात पोलिस प्रशासनाने वाहतुकीसाठी नवीन ४३ बदल शहरामध्ये केले आहे. मागील वर्षभरात दोन लाख २५ हजार दंडात्मक कारवाया करण्यात आल्या असून दोन कोटी सहा लाख रुपये दंड शासनाच्या तिजोरीत जमा झाला आहे. २०१४ मध्ये लाख १२ हजार कारवाया करण्यात आल्या आहेत. यातून एक कोटी सहा लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. मागील वर्षी शहरातील ३० चौकांत ५० सीसीटीव्ही बसवण्यात आले असल्याची माहिती सहायक आयुक्त खुशालचंद बाहेती यांनी दिली.

नव्यावर्षात, नवे बदल
नवीनवर्षात नवे नियम वाहतूक शाखेने केले आहेत. सिग्नलवर वाहतुकीचे नियम तोडले तर तुम्हाला त्याच ठिकाणी पोलिस पावती देणार नाहीत, तर त्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्हीत तुमच्या गाडीचा नंबर कैद होईल. त्यानंतर तुम्हाला घरपोच दंडाची पावती मिळेल. १२ चौकांत नवीन सिग्नल बसवण्यात येणार आहेत. १५० नव्या ठिकाणी २५० कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. यासाठी १६ कोटी रुपयांचा खर्च प्रस्तावित करण्यात आला आहे. याशिवाय संपूर्ण चौकांतील वाहतुकीचे नियमन एका कंट्रोल रूममध्ये करण्यात येणार आहे. कंट्रोल रूममध्ये बसून दिलेल्या सूचना शहरभर एकाच वेळी ऐकू येण्याची सोयदेखील आहे.

सक्ती म्हणून पाहू नका
^वाहतुकीच्या नियमांचा विचार सक्ती म्हणून करता सुरक्षेच्या दृष्टीने करा. अपघातात कुटुंबातील व्यक्ती जाते तेव्हा घर पोरके होते. याचा विचार गांभीर्याने करायला हवा. - वसंत परदेशी, पोलिसउपायुक्त

कर्मचारी वाढवा
शहरात ३७ ठिकाणी सिग्नल लावण्यात आले आहेत. त्यापैकी १८ ठिकाणांवरील सिग्नल सदोष आहेत. याशिवाय गेल्या अनेक वर्षांपासून पोलिसांच्या वाहतूक शाखेत जवळपास २५० कर्मचारी आहेत. या संख्येत वाढ करणे आवश्यक आहे.