आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद - अदालत रोडवरील अँक्सिस बँक विविध प्रकारच्या गरजांसाठी कर्ज देत असते. कर्ज घेताना बँक ग्राहकांकडून नियमानुसार सर्व कागदपत्रांची पूर्तता करून घेते. कर्जाच्या हप्त्याचा भरणा करण्यासाठी ग्राहक त्याचे खाते असलेल्या बँकेचे पोस्ट डेटेड चेक्स देतो किंवा इलेक्ट्रॉनिक्स क्लिअरिंग सिस्टिम म्हणजेच ईसीएसचा मार्ग स्वीकारतो. ईसीएसमध्ये ठरलेल्या दिवशी बँकेतून आपोआप कर्जाचा हप्ता कापला जातो, पण येथेच बँका घोळ करतात.
आकारला चुकीचा दंड
राजेश नावाच्या एका ग्राहकाने सप्टेंबर महिन्यात या अक्सिस बँकेतून कार लोन घेतले होते. खात्यात पुरेसे पैसे असतानाही त्यांचा हप्ता बाउन्स होत होता. अँक्सिस बँक त्यांना प्रत्येक वेळेस हप्ता बाउन्स झाल्याचा दावा करत 560 रुपये दंड लावत होती. अशा प्रकारे अँक्सिस बँकेने त्यांना आतापर्यंत 2,810 रुपये दंड लावला होता, मात्र आपली चूक नसल्यामुळे हा दंड भरण्यास त्यांनी नकार दिला होता. ही बाब वारंवार लक्षात आणून दिल्यानंतरही बँकेने राजेश यांना दाद दिली नाही. अखेर त्यांनी डीबी स्टारकडे आपली कैफियत मांडली. त्यावर चमूने 6 जानेवारी रोजी खासगी ‘बँकांच्या भांडणात ग्राहकांचे नुकसान’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करून या समस्येला वाचा फोडली. त्याचा अपेक्षित परिणाम झाला आणि बँकेने राजेश यांचा हा दंड माफ केला.
नेमका काय प्रकार झाला
राजेश यांनी आयडीबीआय बँकेच्या जालना रोड शाखेतून ईसीएसद्वारे हप्ते कापण्याचे संमतीपत्र (मंडेट फॉर्म) दिले होते. मात्र, आयडीबीआय बँक हे संमतीपत्र स्वीकारत नसल्याचे अँक्सिस बँकेचे म्हणणे होते. त्यामुळे त्यांचा प्रत्येक हप्ता बाउन्स होत होता. अँक्सिस बँकेने ही आयडीबीआय बँकेची चूक असल्याचे सांगितले. राजेश यांनी आयडीबीआय बँकेत जाऊन माहिती घेतली. तेथे अँक्सिस बँकेने प्रत्यक्षात संमतीपत्र आयडीबीआय बँकेकडे पाठवलेच नसल्याचे सांगण्यात आले. मात्र, हा दोन्ही बँकांचा वाद असल्यामुळे आपला यात काहीच संबंध नसल्याचे राजेश यांनी ठासून सांगितले. तसेच ही बाब अँक्सिस बँकेने योग्य वेळी कळवली असती तर हप्ता भरण्याचा दुसरा मार्ग निवडला असता, असे राजेश यांचे म्हणणे होते. बँकेच्या चुकीमुळेच विनाकारण भुर्दंड बसल्याचेही ते सांगतात.
माफ केला दंड
या संपूर्ण प्रकरणात राजेश यांची काहीच चूक नव्हती. ही बाब लक्षात घेऊन अँक्सिस बँकेने त्यांना लावलेला दंड रद्द केला. चेक बाऊन्सिंग चाज्रेस परत घेत असल्याचे बँकेच्या स्टेटमेंटमध्ये दर्शवण्यात आले आहे. ग्राहकाची चूक नसताना त्यांना विनाकारण आर्थिक भुर्दंड होऊ देत नसल्याचे बँकेने सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.