आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खरे बोलणेही देशद्रोह ठरत आहे : बी. जी. कोळसे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- आज खरे बोलणे परवडत नाही. खरे बोलले की देशद्रोही ठरवले जात आहे. मात्र, शोषण करणारे लोकच खऱ्या अर्थाने देशद्रोही असल्याची घणाघाती टीका न्या. बी. जी. कोळसे पाटील यांनी केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्ताने संत एकनाथ रंगमंदिरात "भारतीय संविधान आणि आजची वस्तुस्थिती' या विषयावर त्यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाला बँक ऑफ महाराष्ट्रचे निवृत्त सहमहाव्यवस्थापक एम. एच. जाधव, पी. बी. अंभोरे, महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे सरव्यवस्थापक सचिन धर्म यांची प्रमुख उपस्थिती होती.
फुले,शाहू आंबेडकरांच्या काळापेक्षा वाईट काळ : कोळसेपाटील म्हणाले, बाबासाहेबांनी जगाच्या संविधानाचा विचार करून घटना लिहिली. जगातला शोषित समाज शोषणमुक्त व्हावा, असा त्यांचा उद्देश होता. मात्र, आज आपण कबीर, महात्मा फुले आंबेडकरांना जाती-धर्मात अडकवून टाकले आहे. या लोकांनी कधीच तडजोडी केल्या नाहीत. मात्र, आज आम्ही स्वार्थासाठी कुठेही तडजोडी करत आहोत. काळ बदलला असला तरी फुले, शाहू, आंबेडकर यांच्या काळापेक्षाही जास्त ब्राह्मणवाद आज रुजला आहे. सगळ्या जाती-धर्मातले लोक शोषण करत आहेत. आमच्याही ते अंगवळणी पडले अाहे, असेही कोळसे पाटील म्हणाले.

दलित-मुस्लिमांचामानव निर्देशांक सर्वात कमी : कोळसेपाटील पुढे म्हणाले, भारतात सर्वच क्षेत्रांत दलाली वाढली आहे. अमेरिकेसारख्या प्रगत देशात हजार टन सोने आहे, तर भारतात २५ हजार टन सोने आहे. नॅशनल सॅम्पल सर्व्हेनुसार ८० टक्के लोक महिन्याकाठी पाच हजारपेक्षा कमी दरमहा उत्पन्न घेतात. त्यातच दलित आणि मुस्लिम जातीच्या लोकांची स्थिती अतिशय वाईट आहे. त्यांचा मानव निर्देशांक सर्वात कमी आहे. आज शिक्षणावर केला जाणारा खर्च कमी केला जात आहे. संसद भांडवलदारांची बटीक बनेल, असे भाकीत बाबासाहेबांनी केले होते ते आज खरे ठरत आहे. खरे देशासमोर येऊच द्यायचे नाही, असा आक्रमणकर्त्यांचा प्रयत्न असतो. आता आसारामबापूंकडे हजार कोटी, श्रीश्रींकडे त्यापैक्षा अधिक संपत्ती आहे. आजही केवळ मूठभरांच्याच हाती संपत्ती आहे. मात्र, त्याला कोणी विरोध करत नाही. शिकलेले लोक मूळ समस्येकडे जायला तयार नाहीत. त्यामुळे समस्या निर्माण झाली, असेही ते म्हणाले.
भीमजयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना निवृत्त न्यायमूर्ती कोळसे पाटील.