आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाड्यातील साहित्य परंपरेचा सन्मान, साहित्य संस्कृती मंडळ अध्यक्षपदी बाबा भांड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - औरंगाबादच्या ग्रामीण साहित्यकारानंतर आता इथल्याच बाल साहित्यकाराला राज्याच्या साहित्य संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदावर विराजमान होण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे हा मराठवाड्याच्या साहित्यविषयक परंपरेचा सन्मान मानला जातो आहे.

लेखनाबरोबरच प्रकाशन व्यवसायात नाव मिळवलेल्या बालसाहित्यकार बाबा भांड यांची महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या दोन वर्षापासून हे पद रिक्त होते. त्या आधी मधु मंगेश कर्णिक आणि त्यांच्याही आधी औरंगाबादचेच ग्रामीण कथाकार रा.रं. बोराडे या मंडळाच्या अध्यक्षपदी विराजमान होते. त्यामुळे दुसऱ्यांदा हे पद मराठवाड्याकडे आले आहे. या निवडीनंतर ‘दिव्य मराठी’ने बाबा भांड यांच्याशी संवाद साधला. नवोदितांमधूनही अनेक उत्तामोत्म लेखक समोर यावेत यासाठी विभागीय पातळीवर लेखन कार्यशाळा घेण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला. साहित्य अकादमी, नॅशनल बुक ट्रस्ट या साहित्य क्षेत्रात काम करणाऱ्या शासनाच्या संस्थांसोबत त्यांना बरोबर घेऊन सामंजस्याने लेखन वाचन प्रकल्प राबविण्याचा विचारही त्यांनी जाहीर केला. अनेक जुनी वाचनालये आपल्याकडे आहेत. त्यांच्या सहकार्याने वाचन संस्कृती कशी वाढेल याचा देखील प्रयत्न करता येईल, असेही ते म्हणाले. विज्ञान साहित्य लोकप्रिय करण्यासाठी कार्यशाळांचे आयोजन व्हायला हवे.
प्राप्त पुरस्कार
बालसाहित्यासाठीसाहित्य अकादमी पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचे उत्कृष्ट साहित्यनिर्मितीचे अकरा पुरस्कार, महाराष्ट्र फाऊंडेशन, भैरुरतन दमाणी, नरहर कुरुंदकर, बालसाहित्याचा राष्ट्रीय पुरस्कार.
बाबा भांड यांचा अल्प परिचय
आठवीत असताना बालवीर चळवळीत राष्ट्रपती पदकाने सन्मानित. सहावीत असताना लिहीलेली डायरी झाली प्रकाशित. १९७५ मध्ये धारा नंतर साकेत प्रकाशनाची स्थापना. नवसाक्षरांसाठी शब्दसंगत,मुलांसाठी साकेत सवंगडी नियतकालिकांचे दीर्घकाल संपादन, प्रकाशन. नऊ कादंबऱ्या, दोन कथासंग्रह, चार प्रवासवर्णने,चार ललित गद्य,दोन चरित्रे, चार आरोग्य अाणि योग,तीन संपादित,चार अनुवाद ,पंधरा किशोर कादंबऱ्या,अठरा बालकथासंग्रह, तीन एकांकिका संग्रह, सत्तावीस नवसाक्षरांसाठी पुस्तके अशी ग्रंथसंपदा नावावर आहे.
बातम्या आणखी आहेत...