आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉ. आंबेडकरांचा जोडा शिवून उसवलेल्या आयुष्याचे झाले सार्थक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मिलिंद महाविद्यालयाच्या निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची शहरात नेहमीच ये-जा असे. त्यांच्या आठवणी शहरातील अनेक कुटुंबीयांनी हृदयात साठवल्या आहेत. पानदरिबा येथील चिंचेच्या झाडाखाली बसून चप्पल-बूट शिवून उसवलेले आयुष्य जोडणाऱ्या फुलवाडे यांच्याकडून बाबासाहेबांनी विदेशातून आणलेला बूट २७ डिसेंबर १९५५ मध्ये दुरुस्त करून घेतला आणि या महामानवाच्या दर्शनाने फुलवाडेंचे उभे आयुष्य सार्थक झाले.
किसन ढोकराजी फुलवाडे यांचे पानदरिबा रोड येथे स्वातंत्र्यपूर्व काळापासून दुकान आहे. डॉ. आंबेडकरांनी आपले विदेशातील तीन बुटांचे जोड त्यांच्याकडे दुरुस्त करून घेतले. चॉकलेटी विविध रंगांच्या तीन बुटांचे विदेशी मौल्यवान जोड त्यांनी फुलवाडे यांच्याकडून सैल तसेच दुरुस्त करून घेतले. बुटांचे जोड सैल करून देणारे किसनजी यांचे निधन झाले. त्या प्रसंगांचे साक्षीदार असलेले त्यांचे छोटे बंधू नारायण (७८) हे बाबासाहेबांची ही आठवण अभिमानाने सांगतात. आैरंगाबादेतील सराफा रोडवर असलेली फ्लॅक्स कंपनी किसन फुलवाडे यांच्याकडून बूट दुरुस्तीचे काम करायची. बाबासाहेबांनी विदेशातून आणलेले बूट सैल करणे शक्य नसल्याचे या कंपनीने सांगितले. परंतु आम्ही येथील एका दुकानातून बूट दुरुस्त करून घेतो, असे त्यांनी बाबासाहेबांच्या सहायकांना सांगितले. परंतु विदेशातून आणलेले महागडे बुट इतर कुणाजवळ देता बाबासाहेब स्वत: फुलवाडेंच्या दुकानावर आले. नारायण फुलवाडे यांचा जन्म १०४० चा असून, पंधरा वर्षांचे असताना नारायण आपल्या वडिलांना कामात मदत करायचे. २७ डिसेंबर १९५५ रोजी अम्बॅसॅडर गाडीत बसून बाबासाहेब त्यांचा चालक मिलिंद महाविद्यालयाचे रजिस्टार बी. एच वराळे त्यांच्यासमवेत दुकानात आले होते. गुढग्याच्या थोडे खालपर्यंत असलेले बुट सैल करायचे होते. त्यांनी किसन यांना बुट खूप महागडे आहे. तुमच्याकडून सैल होत असतील तर सांगा, अन्यथा मी परत घेऊन जातो, असे सांगितले. किसन यांनी हे बुट यशस्वीपणे सैल करून दिले.

किसन यांनी बाबासाहेबांकडून बुट सैल करण्याचे पैसे घेतले नव्हते, असेही नारायण यांनी सांगितले. मिलिंद परिसरात फिरताना ठेच लागल्याने बाबासाहेबांना बुट वापरणे शक्य नव्हते म्हणून त्यांना सॅंडल शिवून दिली होती. माईसाहेब आंबेडकरांनीही त्यांच्याकडून कुत्र्याचा बेल्ट बनवूुन घेतल्याचे त्यांनी सांगितले. बाबासाहेबांचा पदस्पर्श लाभलेले नेमिचंद फुटवेअर आजही पानदरिब्यात आहे.

जोहारवर बाबासाहेबांची नाराजी
दुरुस्तबुटांचे जोड किसन यांनी निजाम बंगलो येथे नेले होते. तेथे त्यांनी बाबासाहेबांना जोहार घातल्यावर त्यांनी नाराजी व्यक्त केली. "असले प्रकार बंद करा माझ्यासारखे बना' असे बाबासाहेब म्हणाले होते, असे बंधूंनी आम्हाला सांगितले होते, अशी आठवणही नारायण यांनी सांगितली.