आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जन्मताच ‘त्याने’ अनुभवला कचर्‍याचा स्पर्श!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- नुकत्याच जन्मलेल्या अर्भकाला गावकुसाबाहेरील कचर्‍यात फेकल्याचे विदारक दृश्य आज बघायला मिळाले. जालन्याच्या (ता. भोकरदन) आडगाव भोबे गावात रविवारी नवजात अर्भकाच्या अंगावर पहिल्यांदाच सूर्याची किरणे पडली अन् त्याने डोळे उघडले. त्याला आईच्या कुशीची ‘ऊब’ मिळण्याऐवजी गावकुसाबाहेरील ‘कुपाटी’चा स्पर्श जाणवला. ‘नकोशा’साठी काम करणारी सेवाभावी संस्था धावली अन् घाटीने त्याला चार तासांनी दाखल करून घेतले.

रविवारी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास सुनीता राजू सिसवाल या गावाजवळ असलेल्या ‘गोदरी’ ठिकाणी गेल्या त्यांना एक जिवंत पुरुष जातीचे अर्भक दिसले. त्यांनी लगेच त्याला जवळ घेतले आणि मायेची ऊब दिली. हे चिमुकले सापडल्याची चर्चा गावात पसरली. मात्र, या बाळांचे काय करायचे, असा प्रश्न उभा राहिला. हे अर्भक सापडल्याची माहिती भोकरदन पोलिसांना देण्यात आली. जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे आनंद भिसे आणि बालकल्याण समिती जालना यांना ही माहिती देण्यात आली. त्यांनी ही बाब फारशी गांभीर्याने घेतली नाही. मात्र, प्रकल्पाचे कैलास सोनटक्के, श्याम खोंड, गणपत भोंबे यांनी त्या चिमुकल्याला भोक रदनच्या आरोग्य केंद्रात दाखल केले. रविवारी योगायोगाने आरोग्य केंद्रात पल्स पोलिओ मोहीम चालू होती. तेथील परिचारिकेने त्या चिमुकल्याला स्वच्छ केले व डॉक्टरांनी घाटीत नेण्याचा सल्ला दिला. एका वाहनातून सुनीता व प्रकल्पाचे कार्यकर्ते बाळाला घाटीत आले. डॉक्टरांनी त्याला दाखल करून घेतले नाही. दाखल करताना पोलिस लागतो, असे सीएमओचे म्हणणे होते. बर्‍याच वादानंतर चार वाजता दाखल करून घेतले.

बाळाला संगोपन संस्थेकडे सोपवणार
त्याची प्रकृती सुधारल्यानंतर जालना बालकल्याण समिती त्याच्या संगोपनासाठी शून्य ते 6 वयोगटातील बाळाचा सांभाळ करणार्‍या संस्थेकडे त्याला वर्ग करणार. भोकरदन पोलिस त्या बाळाच्या आईचा शोध घेण्यासाठी प्रयत्न करणार.