औरंगाबादः डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या बीकॉम तृतीय वर्षाच्या पाचव्या सत्राचा अप्रत्यक्ष कर (इनडायरेक्ट टॅक्स) विषयाचा पेपर बुधवारी रात्री फुटला. त्यामुळे गुरुवारी सकाळी ते ११ च्या सुमारास होणारा हा पेपर एेनवेळी प्रश्नपत्रिका बदलून अर्धा तास उशिराने सुरू करण्यात आला.
बीकॉमच्या परीक्षेस हजार ३३३ विद्यार्थी बसले आहेत. पेपरचा कोड क्रमांक सीओएम-६०४ होता; परंतु हा पेपर बुधवारी रात्री साडेबारानंतर फुटला आणि अनेकांच्या
मोबाइल व्हॉट्सअपवर अन् बाजारातही तो उपलब्ध झाला. विद्यापीठाच्या परीक्षा विभागास गुरुवारी सकाळी हा प्रकार निदर्शनास आला. व्हॉट्सअपवरील प्रश्नपत्रिका आणि विद्यापीठाची प्रश्नपत्रिका सारखीच आहे का याची शहानिशा डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला वाणिज्य महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावरून दूरध्वनीद्वारे करण्यात आली. यात सत्यता आढळून येताच ऐनवेळी परीक्षा होऊ नये यासाठी सर्व केंद्रांना सूचना देऊन तातडीने नवीन प्रश्नपत्रिका पाठवून पेपर ९.३० वाजता सुरू करण्यात आला. दरम्यान, एक प्रश्नपत्रिका पाच हजार ते तीनशे रुपयांपर्यंत विकण्यात आल्याचीही चर्चाही विद्यापीठ वर्तुळात होती.
विद्यापीठाचे हात वर
पेपरफुटलेला नाही, असा दावा उपकुलसचिव डी. पी. नेटके यांनी केला, तर व्हॉट्सअपवर आलेल्या प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्नांचे साम्य आजच्या पेपरमध्ये होते. त्यासंबंधी या विषयाचे डीन आणि पेपर सेटर वाय. बी. डुबाले, एम. एन. आधाटे, एस. एस. जाधव यांच्याशी चर्चा केली असून त्यांनी कोणताही गेस पेपर कुणालाही दिलेला नसल्याचे सांगितले. यासंबंधी १२ एप्रिल रोजी बीओईच्या बैठकीत सर्व बाबी ठेवण्यात येतील. तसेच कुलगुरू दौऱ्यावरून परतल्यानंतर चौकशी करून निर्णय घेण्यात येईल. प्रश्नपत्रिका ताबडतोब बदलून घेण्यात आली, असे परीक्षा नियंत्रक डॉ. वाल्मीक सरवदे यांनी सांगितले.