औरंगाबाद- मागास औद्योगिक सहकारी संस्थांना निधी देण्याची 465 प्रकरणे प्रलंबित असून ते न मिळाल्यास 12 जूनला आत्मदहन केले जाईल, असा इशारा देणार्या मागास औद्योगिक सहकारी संस्था बचाव समितीचे पदाधिकारी जिल्हाधिकारी कचेरीच्या मागील बाजुने पळत आले. सुगावा असलेल्या पोलिसांनी लगेच त्यांना ताब्यात घेतले. तेव्हा त्यांच्याकडे आत्मदहनाचे कोणतेही साहित्य नव्हते. अवघ्या दोन मिनिटांत हे आंदोलन संपले. पोलिसांनी 7 जणांना ताब्यात घेतले.
आंदोलकांमध्ये नगरसेवक मिलिंद दाभाडे, प्रकाश जावळे, गौतम खरात, संजय ठोकळ, रुपचंद वाघमारे यांचा समावेश होता.
दुपारी 12 वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. मागास औद्योगिक सहकारी संस्थांना केंद्राकडून निधी दिला जातो. मात्र 2009 पासून 465 प्रकरणांत हा निधी देण्यात आलेला नाही. यात शासकीय दिरंगाई असल्याचा आरोप बचाव समितीच्या वतीने करण्यात आला होता. जर निधी मंजूर झाला नाही तर 12 जूनला आत्मदहन केले जाईल, असा इशारा देण्यात आला होता. पूर्व कल्पना असल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोलीस तैनात करण्यात आले होते. मात्र आंदोलकांनी कार्यालयाच्या परिसरात असलेल्या विसावा हॉटेलच्या बाजुने आत प्रवेश केला. पोलिसांना अंदाज येण्याच्या आतच त्यांनी घोषणाबाजी सुरू केली.
आम्ही आत्मदहन करतो, असे ते ओरडून सांगत होते. त्यामुळे पुढे उभे असलेले पोलीस वाहनतळाच्या बाजुने धावले आणि त्यांना पुढील सात जणांना ताब्यात घेतले. आमच्याकडे कोठे आत्मदहन करण्याचे साहित्य आहे, असा युक्तिवाद त्यांनी केला मात्र पोलिसांना त्यांचे ऐकले नाही. मोटारीत बसून त्यांना सिटी चौक पोलिसांकडे नेण्यात आले. दुसर्या आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जावून 465 प्रकरणांचा निधी मंजूर करण्यात यावा, अशी मागणी केली. सायंकाळी पोलिसांनी आंदोलकांची मुक्तता केली.