आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस वसाहतीला अवकळा, मोडलेले दरवाजे, तुटलेल्या खिडक्यांमुळे रहिवासी त्रस्त

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाळूज- अल्प पावसातही गळणारे घरांचे छत, मोडलेले दरवाजे, तुटलेल्या खिडक्या त्याचबरोबर भिंतींना गेलेले तडे ही अवस्था आहे वाळूजच्या पोलिस वसाहतीची. पोलिस कर्मचाऱ्यांसाठी लाखाे रुपये खर्चून बांधलेली ही वसाहत कुलूपबंद अवस्थेत आहे, तर लगतच्या झोपडपट्टीवासीयांनी वसाहतीची संरक्षक भिंत तोडून रस्त्याचा वापर सुरू केल्याने या वसाहतीला अवकळा आली आहे.
वाळूज पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात ४० गावे येतात. त्यातील औरंगपुरा, हर्सुली, तळपिंप्री, शिवपूर, पांढरवळ, मांडवा ही गावे सीमेवर येतात. पांढरवळ हे गाव पोलिस ठाण्यापासून ३५ किलोमीटर अंतरावर आहे. तेथे जाण्यासाठी वळसा घेऊन जाणे भाग पडते. पोलिस कर्मचाऱ्यांसाठी वाळूज ग्रामपंचायतीच्या उत्तरेस पोलिस वसाहत बांधण्यात आली आहे. १५ पोलिस कर्मचारी तेथे राहू शकतील, अशी व्यवस्था आहे. रेकॉर्डप्रमाणे पोलिस ठाण्यात सध्या ८५ पोलिस कर्मचारी आहेत. मात्र, प्रत्यक्षात ६६ पोलिस कर्मचारी संरक्षण यंत्रणा सांभाळतात, तर पोलिस वसाहतीत बोटावर मोजण्याइतकेच कर्मचारी वास्तव्यास आहेत. येथील घरांचे बांधकाम अत्यंत जुने आहे. मध्यंतरी वसाहतीतील घरांची वरवर डागडुजी करण्यात आली. या वसाहतीत जवळपास १५ कुटुंबाच्या राहण्याची व्यवस्था करण्यात अालेली होती. दुरवस्थेमुळे वसाहतीतील काही खोल्यांचा वापर दुचाकी ठेवण्यासाठी केला जात आहे.
सर्रास वावर
संरक्षणाच्या दृष्टीने वसाहतीला चारही बाजूंनी तारेचे कुंपण घालण्यात आले. मात्र, कोणी तरी ते ताेडून टाकले. डागडुजीवेळी संरक्षक भिंत बांधण्यात आली. यामुळे नागरिकांची ये-जा बंद झाली; परंतु काही दिवसांतच ही भिंत तोडून लगतच्या वसाहतीतील नागरिकांचा वावर वाढला.
सर्वत्र घाणीचे साम्राज्य
वसाहतीच्या चारही बाजूंना घाणच घाण आहे. घराच्या खिडक्यांची तावदाने गायब असून त्यांचे गजही कापून लंपास करण्यात आले आहेत. त्यातील काही घरांना कुलपे लावलेली आहेत. इतर घरे तशीच पडून आहेत. दरवाजे तुटल्यामुळे तेथे जनावरांचा वावर आहे. तेथील दुरवस्था पाहून वसाहतीत कोणीही पोलिस कर्मचारी राहण्यासाठी पुढे येत नाही. ठाणे प्रमुखासह अधिकारीवर्ग पोलिस कर्मचारी ये-जा करतात, तर काही कर्मचाऱ्यांनी स्वखर्चाने वसाहतीतील निवासस्थानांची डागडुजी करून राहणे पसंत केले आहे.
नव्या वसाहतीचा प्रस्ताव
- वसाहतीची दुरवस्था, तेथील दुर्गंधी पोलिस कर्मचाऱ्यांच्या वास्तव्यासाठी योग्य नाही. आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. घरे मोडकळीस आलेली आहेत. त्यामुळे नव्याने घरे बांधण्याचा प्रस्ताव लवकरच वरिष्ठ कार्यालयाकडे सादर केला जाणार आहे.
धनंजय येरुळे, पोलिस निरीक्षक, वाळूज
बातम्या आणखी आहेत...