गारज - वैजापूर तसेच कन्नड तालुक्याच्या सीमेलगत असलेल्या खडकी नदीवरील निझामकालीन पूल ढासळण्यास सुरुवात झाली आहे. नदीच्या दोन्ही बाजूंना सुरक्षित कठडे नसल्याने येथे अनेक अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे.
या पुलाची उंची जमिनीपासून २५ ते ३० फूट एवढी आहे. त्यामुळे पुलावर अपघात झाल्यास झाडेझुडपे तसेच नागमोडी पुलामुळे वाहने चक्काचूर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पुलावर अनेक वेळा झालेल्या मोठ्या अपघातामुळे अनेकांना जीवदेखील गमवावा लागला आहे, तर अनेकांना कायमचे अपंगत्व आले आहे.
खडकी नदीवरील बांधण्यात आलेला पूल निझामकालीन आहे. दहा वर्षांपूर्वी खडकी नदीवर नवीन पुलाच्या कामास सुरुवात करण्यात आली. परंतु संबंधित ठेकेदाराने कन्नड - वैजापूर या दोन तालुक्यांच्या हद्दीच्या वादामुळे काम बंद पाडले होते, परंतु आता या पुलाकडे लक्ष देण्याची मागणी प्रवासी तसेच ग्रामस्थांनी केली आहे.
पुलाकडे दुर्लक्ष
> कन्नड तसेच वैजापूरचे आमदारांनी या पुलाच्या दुरुस्तीकडे लक्ष दिले तर हे काम दोन महिन्यांत पूर्ण होईल. परंतु याकडे कोणत्याही लोकप्रतिनिधींचे लक्ष नसल्याने काम रखडले आहे.
- सुदाम चव्हाण, वाहनधारक, गारज