आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pregnant Women In Tension Due To Bunkers On Road In Aurangabad City

आमच्या पोटातील बाळाचा तरी विचार करा; औरंगाबदमधील महिलांची आर्त हाक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
photo - या महिलेने गोंडस बाळाला जन्म दिला. मात्र, गेल्या काही महिन्यांत वेळोवेळी डॉक्टरकडे तपासणीसाठी जाताना झालेला त्रास आठवून त्यांच्या डोळ्यात पाणी येते. असा त्रास रोज किती महिला सहन करत असतील याची कल्पना केलेलीच बरी.
शहरातील रस्त्यांचे तीनतेरा झालेलेच आहेत. त्यातच जागोजागी खड्डे आणि रस्त्याच्या आरपार नाल्या केल्या जात आहेत. त्यामुळे दुष्काळात तेरावा महिना, अशी नागरिकांची स्थिती आहे. प्रवास करताना लागणाऱ्या झटक्यांचा सर्वाधिक त्रास गरोदर महिला आणि ज्येष्ठांना होत आहे. म्हणूनच ‘आमच्या गर्भातील बाळाचा तरी विचार करा’ असा संताप महिलांनी केला आहे, मात्र महिला महापौर आणि त्यांच्या मार्गदर्शकांमध्ये तो समजण्याची संवेदना उरली आहे का, हा प्रश्न उपस्थित होतो.
दरिद्री रस्ते, पैसे लुटण्यासाठी होणारे सुमार पॅचवर्क याबाबत डीबी स्टारने वारंवार बधिर पालिकेला जागे केले. त्यानंतर खासदार, महापौर, पदाधिकारी, अधिकाऱ्यांनी पाहणीचा फार्स केला; पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. सगळ्यात वाईट कोण, अशी स्पर्धा पालिका आणि सा.बां. विभागात लागली आहे. डीबी स्टारने पुन्हा एकदा वृत्त प्रसिद्ध करून पदाधिकारी, नगरसेवकांना जाब विचारला. त्यावर महापौर कला ओझा यांनी शहर अिभयंता सखाराम पानझडे यांच्याकडे बोट दाखवून जबाबदारी झटकली आहे, तर खासदार चंद्रकांत खैरे पुन्हा पाहणी करणार आहेत.
गावांप्रमाणेच शहरातील रस्त्यांची अवस्थाही खराब
* वॉर्ड क्रमांक ७० : सेव्हन हिल्स ते गजानन महाराज मंदिर चौक मार्गे सुखहर्ता अपार्टमेंट, जवाहर कॉलनी पोलिस स्टेशन चौक ही रस्त्याची एक बाजू विद्यानगरच्या नगरसेविका तथा महापौर कला ओझा यांच्या वॉर्डात येते.
* दुसरी बाजू वॉर्ड क्रमांक ६९ जवाहर कॉलनीचे नगरसेवक सुरेंद कुलकर्णी यांच्या वॉर्डात येते.
* वॉर्ड क्रमांक ८७ जवाहर कॉलनी पोलिस स्टेशन ते चेतक घोडा या रस्त्याची एक बाजू उपमहापौर संजय जोशी यांच्या वॉर्डात येते, तर दुसरी बाजू नगरसेवक सुरेंद्र कुलकर्णी यांच्या वॉर्डात येते.
*वॉर्ड क्रमांक ८८ चिंतामणी हाउसिंग सोसायटीकडील बाजू ही जयविश्वभारती कॉलनीच्या नगरसेविका तथा माजी उपमहापौर साधना सुरडकर यांच्या वॉर्डात येते, तर दुसरी बाजू वॉर्ड क्रमांक ६६ शिवशंकर कॉलनीचे नगरसेवक त्र्यंबक तुपे यांच्या वॉर्डात येते.
शहर अभियंता नॉट रिचेबल
या प्रकरणी मनपाचे शहर अभियंता सखाराम पानझडे यांच्याशी संपर्क केला; परंतु ते उपलब्ध होऊ शकले नाहीत. त्यामुळे त्यांची बाजू समजू शकली नाही.
ग्रामीण भागात प्रसूतीसाठी कुठल्याही सुविधा नसल्याने शहरात यावे लागते. गावापासून तर शहरातल्या रुग्णालयापर्यंत खड्ड्यांनी पिच्छा सोडला नाही. गावापेक्षा शहर बरे, असे वाटले होते, मात्र औरंगाबाद शहर त्याला अपवाद आहे. खड्ड्यांमुळे खूप त्रास झाला. अस्मापठाण, कस्तूरवाडी
महापौर म्हणतात, शहर अभियंता जबाबदार; खैरेंचे पाहणी अस्त्र
शहर अभियंता जबाबदार
गणपतीच्या काळात पॅचवर्क केले होते. त्यानंतर रिलायन्सने खोदकाम केले रस्त्यांवर आडवे बोर मारले. झालेल्या नाल्या बुजवण्याचे सांगितले. याला शहर अभियंता जबाबदार आहेत. त्यांना जाब विचारणार. कलाओझा, महापौर
आजच पाहणी करणार
आजच महापौर, उपमहापौर, सभापती, मनपा आयुक्त आणि इतर अभियंत्यांना सोबत घेऊन रस्त्यांची पाहणी करतो. त्यानंतर रस्त्यांची आवश्यक तेथे तातडीने दुरुस्ती करणार. चंद्रकांतखैरे, खासदार
काय म्हणतात डॉक्टर
बाळ अन् आईला धोका
गर्भावस्थेत महिला तिचे बाळ अशा दोन जिवांचे भवितव्य अवलंबून असते. अशा परिस्थितीत खड्ड्यांमुळे धक्के बसून गर्भावर गर्भवती स्त्रियांवर दुष्परिणाम होण्याची शक्यता असते. पहिल्या तीन महिन्यांमध्ये गर्भ अतिशय नाजूक अवस्थेत असल्याने काळजी घ्यावी लागते. अशा वेळी खड्ड्यातून जाताना गर्भपिशवीला जोराचा धक्का बसल्यास रक्तस्राव गर्भपात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. क्वचित प्रसंगी जास्त रक्तस्रावामुळे बाळ गर्भवती स्त्री या दोघांच्याही जिवाला धाेका संभवतो. याव्यतिरिक्त पाठीचे दुखणे, मानेचा त्रास, स्नायू दुखणे मसल पेन, इत्यादी आजार उद्भवतात. अशा वेळी स्त्रीरोग तज्ज्ञ उपचार करू शकत नाहीत. तेव्हा सोयीच्या जवळच्या रुग्णालयात तपासणी करावी. -डॉ.संगीता चौहान, स्त्रीरोगप्रसूतीशास्त्र तज्ज्ञ
गर्भपातहोऊ शकतो
शहरातील सर्वच रस्त्यांवरील खड्डे खूपच धोकादायक बनले आहेत. या खड्ड्यांमुळे गर्भवती स्त्रियांमध्ये गर्भपात रक्तस्रावाचा धोका संभवतो. ज्या गर्भवती स्त्रियांमध्ये बाळाची वार (प्लासेंटा) गर्भपिशवीच्या तोंडाशी आहे. अशा महिलांना खड्ड्याचा धक्का लागल्यास प्रचंड रक्तस्राव होऊन त्रास होऊ शकतो. खड्ड्याची तीव्रता जास्त असल्यास गर्भपिशवीतंच बाळ दगावू शकते. -नम्रताजैस्वाल, सहसचिव,स्त्रीरोग तज्ज्ञ
काय म्हणतात जबाबदार
तुमचा घरच्यांना काय उत्तर देता
९महिने बाळाला सांभाळणे काय असते हे एक आईच समजू शकते; पण प्रेग्नंट महिलेने या शहरात राहायलाच नको, असे माझे मत झाले आहे. कुणीही, कुठेही कसे काय खोदू शकतो ? या लोकांना त्यांच्या घरचे या भोंगळ कारभाराविषयी विचारत असतील ना.. मग त्यांना काय उत्तर देतात ? -प्रा. आस्मा बासित हुसेन
चांगले रस्ते करा
मी वाळूज येथे हायटेक महाविद्यालयात अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे. या अवस्थेत मी मुकुंदवाडी ते वाळूज मार्गाने दररोज प्रवास करते. संपूर्ण शहरात प्रचंड खड्डे आहेत. मला दोन दिवसांआड वैद्यकीय सल्ला घ्यावा लागतो. शासनाने निदान आमच्या बाळांसाठी तरी चांगले रस्ते करावेत. अनुराधातिरुखे, औरंगाबाद
जीवघेणा त्रास थांबवा..
शहरातील रस्त्यांची अवस्था पाहता गर्भवती महिलांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. मी भीमपुऱ्यात राहते आणि गरोदर आहे. शाहू महाराज पुतळ्याकडून घाटीकडे उपचारासाठी जाताना खड्ड्यांचा त्रास वाचवण्यासाठी मला पायी यावे लागते. याचा कुणी विचार करणारे शहरात आहे की नाही ... -संजीवनी गायकवाड