आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ठेकेदाराच्या हालचालींवर लक्ष ठेवून बॅग केली लंपास!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- बाबा पेट्रोल पंप चौकात सोमवारी (11 फेब्रुवारी) सव्वा लाख रुपयांची बॅग हिसकावून पळ काढणार्‍या भामट्यांनी ठेकेदार संजय देसले जिल्हा बँकेत पैसे काढण्यासाठी गेल्यापासून त्यांच्यावर पाळत ठेवली होती, अशी माहिती पोलिस तपासात आढळून आली आहे. बँकेतूनच बॅग लंपास करण्याचा त्यांचा इरादा असावा. मात्र, तो अयशस्वी ठरल्याने दुचाकीने पाठलाग करून त्यांनी अदालत रोडवर त्यांना गाठले व बॅग पळवली, असा निष्कर्ष पोलिसांनी काढला आहे.

या प्रकरणाचा तपास करणारे क्रांती चौक पोलिस ठाण्याचे निरीक्षक अशोक सोनवणे यांनी दोन दिवसांपूर्वीच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतून सोमवारचे फुटेज मागावून घेतले होते. या फुटेजची बारकाईने पाहणी केल्यानंतर त्यांनी हा निष्कर्ष काढला. सोमवारी सकाळी 11.30 वाजता देसले पैसे काढण्यासाठी बँकेत आले. त्यांच्यापाठोपाठच 11.37 वाजता फिकट पिवळय़ा रंगाचा शर्ट घातलेला एक भामटा बँकेत आला. मोबाइलवर बोलण्याचे नाटक करत त्याने पाच मिनिटे प्रवेशद्वारावरच घालवली. नंतर तो दुसर्‍या मजल्यावर गेला. देसले पैसे काढण्यासाठी रांगेत उभे असताना तो भामटा इकडून तिकडे चकरा मारत होता. देसलेंनी पैसे काढले आणि 11.45 वाजता ते बँकेतच एकाशी गप्पा मारत बसले. 12 वाजता गळय़ात काळय़ा रंगाची बॅग अडकवलेला दुसरा भामटा दुचाकीवर बँक परिसरात आला. तेथेच दोन्ही भामटे एकमेकांना भेटले. दुचाकीवर आलेला तेथेच थांबला, तर पहिला भामटा पुन्हा बँकेत गेला व देसलेंपासून काही अंतरावर असलेल्या बाकड्यावर बसला. 12 वाजून 2 मिनिटांनी देसले बँकेतून बाहेर पडले. त्यांच्यापाठोपाठ भामटाही बाहेर आला. बँकेबाहेर असलेल्या साथीदाराला दुचाकीवर बसवले आणि देसलेंचा पाठलाग सुरू केला. 12 वाजून 4 मिनिटांनी या भामट्यांनी पोलिस महानिरीक्षक कार्यालयासमोर जोरात हॉर्न वाजवला. त्यामुळे देसलेंनी त्यांच्या दुचाकीची गती कमी केली. याच वेळी एकाने देसलेंची पिशवी हिसकावून त्यांना दुचाकीवरून ढकलून दिले आणि अवघ्या काहीच सेकंदांत ते पसार झाले. 12 वाजून 5 मिनिटांनी ‘चोर-चोर’ ओरडत देसले बाबा पेट्रोल पंपासमोरील वाहतूक पोलिस चौकीत पोहोचले. चौकीजवळचे फुटेज पोलिसांनी मिळवले असून बँकेतील फुटेज स्पष्ट करण्यासाठी तज्ज्ञांची मदत घेतली जाणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक सोनवणे यांनी दिली.