आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बजाज घेणार औरंगाबादमधली ३७ गावे दत्तक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- जलयुक्तशिवार योजनेअंतर्गत बजाज उद्योग समूहाने औरंगाबाद जिल्ह्यातील ३७ गावे दत्तक घेण्याचा निर्णय घेतला असून तेथे पाण्याचे स्रोत वाढवण्यासाठी कामे केली जातील. त्यासाठी कोट्यवधींचा निधी खर्च केला जाणार असल्याचे जमनालाल बजाज ग्रामविकास संस्थेचे अध्यक्ष सी.पी. त्रिपाठी यांनी दिव्य मराठीला सांगितले.

जलयुक्त शिवारसाठी उद्योजकांचा छदामही नाही या आशयाचे वृत्त दिव्य मराठीने जूनला प्रकाशित केले होते. त्यानंतर प्रशासन तसेच उद्योजकांनीही जलयुक्तशिवार योजनेच्या कामासाठी बैठका घेतल्या होत्या. जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत निधीची कमतरता असल्यामुळे उद्योजकांना सीएसआरच्या माध्यमातून निधी देण्याची मागणीही शासनाने केली होती. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी बैठकही घेतली होती. त्यानंतर बजाजने पुढाकार घेतला आहे.
उद्योगाकडूनमोठा निधी : जलयुक्तशिवार योजनेचे काम करण्यासाठी नोडल एजन्सी म्हणून अफामची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबत त्रिपाठी म्हणाले, जमनालाल बजाज ग्रामविकास प्रतिष्ठान, अफाम आणि जलतज्ज्ञ सुरेश खानापूरकर यांच्या माध्यमातून ही कामे होतील. अफाम २० गावे, जमनालाल बजाज ग्रामविकास संस्था दहा गावे तर उर्वरित गावांत खानापूरकर यांच्या माध्यमातून कामे केली जाणार आहेत.
०४ जूनला प्रकाशित वृत्त.

इतर उद्योजकांनीही प्रेरणा घ्यावी
जलयुक्तशिवार योजनेसाठी बजाजने घेतलेले हे सकारात्मक पाऊल आहे. दुष्काळाची समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी हाच एकमेव पर्याय आहे. प्रशासनाकडून त्यांना सर्व सहकार्य केले जाईल. इतर उद्योजकांनीही यापासून प्रेरणा घेऊन दुष्काळमुक्तीसाठी पुढाकार घ्यावा. डॉ.उमाकांत दांगट, विभागीय आयुक्त औरंगाबाद

गावात पाण्याचे स्रोत वाढवणार
याकामांासाठी कंपनी संचालकाच्या बैठकीत या रकमेसाठीचा प्रस्ताव पाठवण्यात आला असून लवकरच त्याला अंतिम मंजुरी मिळणार आहे. जमनालाल बजाज ग्रामविकास संस्थेचे प्रोजेक्टर मॅनेजर आर.के.पाटील यांनी सांगितले की, ३७ नवीन गावे आम्ही निवडली आहेत. वर्षभरापासून २० गावांत कामे सुरू आहेत. यात आरोग्य, शिक्षण, पर्यावरण, आर्थिक आणि सामाजिक या पाच घटकांच्या आधारे कामे केली जातात. यात औरंगाबाद तालुक्यातल्या रामपूर, रामपूर तांडा, केसापुरी, केसापुरी तांडा तर गंगापूर तालुक्यातील पिंपळगाव, गोकुळवाडी, बोरगाव, मलकापूर, राजुरा,फतियाबाद, शिरोडी,वरझडी आदी ११ गावांत आणि पैठण तालुक्यातील पाच गावांत काम सुरू आहे. यामध्ये आरोग्यविषयक कार्यक्रमाची अंमलबजावणी, लर्निंग तसेच स्वच्छतागृहाच्या उभारणीसाठीही निधी देण्यात आला आहे.

पाहणी करणार
नोडलएजन्सी म्हणून नियुक्ती झालेल्या अफाम संस्थेतर्फे प्रत्येक गावात पाहणी करण्यात येईल. त्यानंतर गावांसाठी काय करणे आवश्यक आहे याची पाहणी करण्यात येईल. लोकांशी संवाददेखील साधला जाईल. गरज पडल्यास इतर स्वयंसेवी संस्थांचीही मदत घेतली जाईल.