आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खदानींच्या जागेवर मुरूम टाकून अतिक्रमणाचा डाव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाळूज - बजाजनगरातील मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या खदानींची जागा बळकावण्याचा प्रयत्न येथील भूमाफियांकडून सुरू आहे. खदान परिसरातील खड्डे असलेल्या मोकळ्या जागेवर रात्रीतून मुरूम, माती, कचरा टाकून खदानीचे सपाटीकरण करण्यात येत आहे. या प्रकाराबाबत परिसरातील उद्योजक, कामगार, व्यापारी नाराजी व्यक्त करत आहेत.
बजाजनगर येथील प्रसिद्ध मोहटादेवी मंदिराच्या मागील बाजूला एमआयडीसी प्रशासनाच्या जागेत अनेक लहान-मोठ्या खदानी आहेत. याच्या चारी बाजूंनी गजबजलेला परिसर आहे. त्यात नामांकित शाळा, महाविद्यालये, हाऊसिंग सोसायट्या, मंदिरे आदींचा समावेश आहे. त्यामुळे या महत्त्वाच्या जागेवर अनेक संस्था माफियांचा डोळा आहे. या खदानीमध्ये परिसरातील अनेक सोसायट्यामधील नागरिकांच्या ड्रेनेजचे पाणी सोडले जाते. त्यामुळे येथील रहिवाशांना दुर्गंधीचा डासांचा त्रास सहन करावा लागतो. ज्येष्ठ नागरिक लहान मुले आजारी पडण्याचे प्रमाणसुद्धा जास्त असल्याचे येथील नागरिक सांगतात.

खदान परिसरातील कचरा दूर करून त्याठिकाणी सुंदर उद्यान उभारण्यात येणार असल्याचे आश्वासन शिवसेनेकडून अनेक वर्षांपासून दिले जात आहे. मागील ग्रामपंचायत निवडणुकीदरम्यानही खासदार चंद्रकांत खैरे यांनी हा मुद्दा उचलला होता. यंदाही त्यांनी नव्याने हे आश्वासन दिले होते. त्यांच्या आश्वासनावर विश्वास ठेवून जनतेने शिवसेनेकडे एक हाती सत्ता सोपवली. यंदा तरी शिवसेना आश्वासन पूर्ण करणार का? असा प्रश्न येथील मतदारांना पडला आहे.

सर्वच अतिक्रमणे पूर्ववत
बजाजनगर परिसरातील वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या तसेच अंतर्गत रस्त्यातील अतिक्रमणांवर एमआयडीसी प्रशासनाने मागील तीन महिन्यांपूर्वी बुलडोझर फिरवला. अनेकांनी स्वत:च अतिक्रमणे काढून घेतली. आता पूर्वीच्याच ठिकाणी मात्र राजकीय पुढाऱ्यांच्या कार्यकर्त्यांकडून सर्रास अतिक्रमणे करण्यात येत आहेत. तसेच अनेक धनदांडग्यांच्या अतिक्रमणाकडे त्या वेळी सुद्धा अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. त्यात लोकमान्य चौकातील दुकानासमोरील अतिक्रमण येथील सर्वसामान्य नागरिकांच्या चर्चेचा विषय बनला होता.

अतिक्रमण काढू
^खदान परिसरात अशा प्रकारचे अतिक्रमण करण्यात येत असेल तर ते लवकरच काढण्यात येईल. वाळूज विभागातील अधिकाऱ्यांना मी याबाबत तत्काळ सूचना देणार आहे. अतिक्रमण काढण्याच्या प्रक्रियेत एवढा वेळ वाया जातो की, विकासकामे करण्यासाठी वेळ मिळत नाही. म्हणून नागरिकांनी असे अतिक्रमण टाळून सहकार्य करावे. राजेंद्र गावडे, कार्यकारीअभियंता, एमआयडीसी