आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्री विठ्ठल नामाच्या जयघोषाने दुमदुमली अवघी बजाजनगरी!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात बाल वारकऱ्यांचा मेळा, शाळांनी काढल्या दिंड्या
आषाढी एकाद शीनिमित्त सिडको ग्रोथ सेंटर येथील किड्स केंब्रिज शाळेतील विद्यार्थ्यांनी दिंडी काढली. पंढरीच्या वारकऱ्यांनी करावे तसे रिंगण बाल वारकऱ्यांनी केले. रिंगणात पावल्या, फुगडी असे खेळ खेळले गेले. या वेळी मुख्याध्यापक नीलेश म्हस्के यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी धोती-कुर्ता, तर विद्यार्थिनी नऊवारी साड्या परिधान करून तसेच डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन दिंडीत सहभागी झाल्या होत्या.
भेटीलागे पंढरीनाथा जीवा लागली तळमळ व्यथा।।
कधी कृपा करशील जेणे। मज दिनाचे धावणे।।

यासंत तुकाराम महाराजांच्या सुरेख अभंगासह विठ्ठल नामाचा जयघोष करत शहीद भगतसिंग शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी शनिवारी बजाजनगर परिसर दणाणून सोडला. शाळेच्या मैदानावरून सुरू करण्यात आलेली दिंडी बजाजनगरातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरापर्यंत काढण्यात आली. दिंडीचा मार्ग हायटेक अभियांत्रिकी महाविद्यालय चौक, सिद्धिविनायक गणपती मंदिर चौक, त्रिमूर्ती चौकमार्गे विठ्ठल मंदिर असा होता.
दिंडीमध्ये सहभागी चिमुकल्या विद्यार्थ्यांनी वारकरी संप्रदायाचा पेहराव परिधान केला होता.
वारकरी पेहरावातील विद्यार्थी हातात टाळ घेऊन विठ्ठल नामाचा गजर करत शिस्तीमध्ये दिंडीत सहभागी झाले होते. विद्यार्थिनींच्या डोक्यावर तुळशी वृंदावन होते. सोबतच विठ्ठल-रुक्मिणीच्या सजीव देखाव्यामुळे शाळेतच पंढरपूर अवतरल्याचा भास होत होता. परिसरातील अनेक पालक नागरिकांनी या चिमुकल्यांचे कौतुक केले. यासाठी शाळेचे मुख्याध्यापक नितीन देशमुख तसेच शिक्षक चक्रधर डाके, शीतल घोडके, राजेंद्र मघाडे, सतीश राठोड, राधा पऱ्हाड, अश्विनी सुरडकर, वर्षा बनकर यांच्यासह राहुल साबळे, भाऊसाहेब कोळी यांनी परिश्रम घेतले.
किड्स केंब्रिज शाळेतील विद्यार्थ्यांनी काढली दिंडी

जयभद्रा प्राथमिक शाळा
रांजणगावशेणपुंजी येथील जयभद्रा प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी गावातून वृक्ष दिंडी काढली. या वेळी विठ्ठलाच्या वेशात साईप्रसाद राऊत, तर रुक्मिणीच्या वेशात नयन सोनवणे उपस्थित होते. सदरील दिंडीचे नेतृत्व मुख्याध्यापक कृष्णा दाभाडे, अंकुश तुपे यांनी केले. या वेळी मोठ्या संख्येत विद्यार्थी तसेच शिक्षक पालक उपस्थित होते.