आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उरीतील बंकरमधून महिनाभर केला पाकिस्तानी सैन्याचा सामना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आैरंगाबाद - भारत-पाकिस्तानसीमेवरील उरी सेक्टरमध्ये १९९२ मध्ये तैनात तत्कालीन सुभेदार मेजर बाजीराव सोनुने यांनी तब्बल महिनाभर पाकिस्तानी सैन्याच्या कुरापतींचा सामना केला. पाकिस्तानने युद्धबंदीचे (सीज फायर) उल्लंघन करत मॉर्टरचे गोळे सोडले. तब्बल महिनाभर सोनुने यांच्यासह त्यांच्या सहकारी जवानांनी हे गोळे झेलत पाकचा धीरोदात्तपणे सामना केला.
शहरातील पडेगाव येथील रहिवासी असलेले सैन्यदलातून निवृत्त झालेले सोनुने यांनी ‘दिव्य मराठी’च्या प्रतिनिधीशी बोलताना भारताच्या सर्जिकल स्ट्राइकबाबत आनंद व्यक्त केला. या वेळी त्यांनी सेवेत असताना तब्बल एक महिना बंकरमध्ये काढल्याचा अनुभव सांगितला. ते म्हणाले, पाकिस्तान केव्हाही सीज फायरचे उल्लंघन करतो. पाकिस्तानचे सैन्य विश्वासास पात्र नाही. एका बाजूने पावसासारखा गोळीबार करायचा आणि दुसरीकडून अतिरेकी घुसवायचे हा पाकचा नित्यनियम आहे.

सोनुने यांनी सांगितले की, १३ महार रेजिमेंटमध्ये १९८० मध्ये दाखल झाल्यानंतर त्यांना १९९२ मध्ये उरी येथे पोस्टिंग मिळाली. उरीमध्ये काही ठिकाणी उंच-सखल भाग तर कुठे सपाट मैदान आहे. दोन्ही भागांमध्ये ३५ ते ५०० मीटर इतके अंतर आहे. दोन्हीकडील सैन्याला एकमेकांचे बंकर्स माहिती असतात. बंकरमध्ये प्रवेश करताना अथवा बाहेर पडताना कितीतरी अंतर सरपटतच जावे लागते. शत्रूला चुकवण्यासाठी दोन ते तीन पर्यायी बंकर तयार असतात. बंकरपासून मुख्यालय पाच कि.मी. मागे असते. एका वेळी तीन ते पाच सैनिक बंकरमध्ये असतात. उरीत असताना एक महिना सतत पाकिस्तान गोळे सोडत होता. आम्ही एलएमजी आणि एमएमजीमधून त्यांच्यावर फायरिंग करत होतो, असेही त्यांनी सांगितले.

महिनाभराचे चरेशन-पाणी : एकमहिन्याचे रेशन -पाणी भरून घेत होतो. पाणी गरम करून वापरले जात असे. आमच्या गोळीबारात पाकिस्तानचे सैनिक मारले जात होते; परंतु त्याची वाच्यचा केली जात नाही. पाक सैनिकांच्या बोलण्यातूनच किती सैनिक टिपले अथवा किती गंभीर झाले याचा अंदाज यायचा. महिनाभर बंकरमध्ये राहावे लागल्याने बऱ्याचदा प्रातर्विधी तेथेच करावा लागायचा, असा वाईट अनुभवही त्यांनी सांगितला.

सोनुने २०१२ मध्ये निवृत्त झाले. ते १९९६ मध्ये नायब सुभेदार झाले. सुभेदार मेजर ते ऑनररी लेफ्टनंटच्या आदेशावर प्रणव मुखर्जी यांची स्वाक्षरी आहे. सोनुने तैलचित्रही उत्कृष्ट काढतात. लढाया आणि निसर्गावर त्यांनी तैलचित्रे काढली आहेत.

देशभक्तात दडला कलावंत
सुभेदार मेजर बाजीराव सोनुने दोन्ही हाताने प्रत्येकी अकरा किलोची एलएमजी रायफल उचलताना दिसत आहे. दोन्ही रायफलीमध्ये गोळ्या भरल्या तर मॅग्झिनसह दोन्हीचे वजन २८ किलोपर्यंत होते.
बातम्या आणखी आहेत...