आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'बाळासाहेबांच्या भेटीने आयुष्यच बदलून गेले'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रमेश आमराव, शिवसेनेचे पहिले शहरप्रमुख
1985 सालची गोष्ट ही. आजही जशीच्या तशी आठवते. मी तेव्हा रिपाइंच्या गवई गटाचे काम करायचो. 1978 पासून नामांतराच्या चळवळीत मी खूप काम केले. गवई मला व्यक्तिगत ओळखायचे. माझे मोठे भाऊ गेल्यावर ते घरीदेखील आले होते. चांगली ओळख होती. पण 1985 मध्ये मी त्यांना भेटायला मुंबईत गेलो. आमदार निवासात 502 क्रमांकाच्या खोलीत ते राहायचे. तेथे गेल्यावर त्यांनी ओळख दाखवली नाही. मी सांगितल्यावर म्हणाले, औरंगाबादहून आला का? मला वाईट वाटले, मी जरा घुश्शातच ‘नाही, पाकिस्तानातून आलो’ असे सांगून निघालो. त्या दिवशी मुंबई मनपा निवडणुकीची शिवसेनेची सभा होती. काही डोक्यात नसताना सभा ऐकायला गेलो. बाळासाहेब ठाकरे हा माणूस त्या दिवशी पहिल्यांदा ऐकला, पाहिला. त्या सभेने मला नखशिखान्त बदलून टाकले. ते त्या दिवसापासून माझे साहेब झाले. आज जी शिवशक्ती-भीमशक्तीवर चर्चा होते ना, त्यावर त्या वेळी साहेब बोलले. मला त्यांचे वाक्य जसेच्या तसे आठवते. ते म्हणाले होते, ‘शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र आली तर महाराष्ट्रात सत्ता येईल.’ त्यांच्या या वाक्याने तत्क्षणी मी शिवसैनिक झालो. आपण शिवसेनेचे काम करायचे या हेतूने पेटूनच उठलो. कल्याणला जाऊन साबीर शेख यांना भेटलो. नंतर मधुकर सरपोतदारांना भेटलो आणि मग मातोर्शीवर जाण्याचा तो योग आला.
मी, सरपोतदार, साबीर शेख, वसंत बावस्कर, जयराज पवार वगैरे होतो आम्ही. कलानगरच्या गेटपासून पायी जात आम्ही ‘मातोर्शी’ गाठले. आत निरोप गेला. थोड्या वेळाने साहेब आले. ज्यांच्या मनात, डोळ्यांत प्रेम असते त्यांना पाहून डोळे दिपतात. माझे डोळे तिथे दिपले. मी ओळख करून दिली. म्हणालो, ‘साहेब, मी रमेश आमराव. औरंगाबादचा आहे. आरपीआयचे काम करायचो. मला शिवसेनेचे काम करायचे आहे.’ हे बोलताना त्यांना मी दलित आहे, हे सांगत जयभीम म्हणताना एक हात वर केला. साहेब म्हणाले, ‘काय दलित? कोण दलित? स्वत:ला दलित म्हणवून घेऊ नका. आणि हे असे हात वर करून जयभीम, जय महाराष्ट्र नको. हात जोडून म्हणा. बाबासाहेब हे वंदनीय आहेत. नमस्कार करून म्हणत जा.’ त्यांची ती वाक्ये आजही माझ्या मनात कोरली गेली आहेत. साहेब कधीच जातीयवादी नव्हते. उलट जातीयतेच्या ते विरोधातच होते. त्यांनी एक गोष्ट सांगितली. ते म्हणाले, लोक पंक्तीला बसतात. अन्नावर माशी बसली तर हात हलवून तिला उडवून तेच अन्न खातात; पण जर दलित समोरून गेला तर पत्रावळी हटवतात. हा मूर्खपणा आहे. ती माणसेच आहेत. त्यांच्यात कसला भेदभाव करता? एवढे त्यांचे स्पष्ट विचार होते.
त्या दिवशी त्यांनी मला औरंगाबाद नाही, खडकी म्हण, असे सांगत शिवसेनेची ध्येयधोरणे असलेला एक कागद हातात दिला आणि म्हणाले, जा, चांगले काम करा. संभाजीनगर नंतर झाले. मांसाहेबांनी बोलावून हातावर पेढा ठेवला. 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण करा, माय-बहिणींच्या रक्षणाकडे डोळ्यात तेल घालून लक्ष द्या, सर्वात महत्त्वाचे म्हणजे वाचा. इतिहास वाचा. त्यातून शिका. महाराजांबाबत वाचा आणि स्वत:ला दलित म्हणवून घेऊ नका, असे सांगत त्यांनी कामाला सुरुवात करण्याचे आदेश दिले. इकडे आलो. आताचे जे अलंकार हॉटेल आहे तेथे पूर्वी गणेश टी हाऊस होते. त्यात आमचे शिवसेनेचे कार्यालय सुरू झाले. 8 जून 1985 रोजी एकनाथ संशोधन मंदिरात शिवसेनेची येथील शाखा स्थापन करणारा मेळावा घेतला आणि पुढे इतिहास झाला..
मी माझ्या आयुष्यात तीनदाच साहेबांना भेटलो. 1985 मध्ये पहिल्यांदा आणि नंतर 1993 आणि 2000 मध्ये. शिवसेनेची स्थापना करून आम्ही इथे काम सुरू केले. साहेबांच्या आदेशानुसार पक्ष वाढवला. पक्षासाठी काम केले. नंतर इतर लोक येत गेले. शिवसेना वाढत गेली; पण साहेबांच्या मी कायम लक्षात होतो. कारण पक्षातील अनेकांजवळ बोलताना त्यांनी माझा उल्लेख केला होता. ती मंडळी सांगायची. 1993 मध्ये प्रदीप जैस्वाल महापौर होते बहुतेक. त्या वेळी साहेब आले होते. रामा इंटरनॅशनलमध्ये उतरले होते. तेव्हा त्यांना भेटायला गेलो. आत जाऊ देत नव्हते. म्हणालो, रमेश आमराव आले आहेत एवढा निरोप पोहोचवा. लगेच बोलावणे आले. त्यांनी खांद्यावर हात ठेवून जवळ घेतले. आस्थेने विचारपूस केली. काय चालले आहे, कसे चालले आहे ते जाणून घेतले. त्यानंतर थेट 2000 मध्येच साहेबांना भेटलो. ते शेवटचे. ते आजारी असताना भेटायला गेलो होतो. त्यानंतर नाही भेट झाली.
साहेबांनी मला काय दिले हे विचारले तर मी अभिमानाने सांगतो, त्यांनी रमेश आमराव या माणसाला ओळख दिली. एका मागासवर्गीयाला शिवसेनेचा पहिला शाखाप्रमुख केले. मी माझ्यावर कधी अन्याय झाला, असे मानतच नाही. संस्थापक आणि माजी शहरप्रमुख ही दोन सर्वोच्च पदे त्यांनी मला दिली. आयुष्यात कसे जगावे याचे शिक्षण दिले. साहेबांचा हात डोक्यावर होता. ज्याच्या डोक्यावर साहेबांचा हात तो मंत्र्यांपेक्षाही मोठा असतो. मी शिवसैनिक होतो आणि आहे. तेच माझ्यासाठी सर्वात मोठे पद आहे. बाबासाहेब माझ्या रक्तात आहेत, तर साहेब माझ्या नसानसांत आहेत. त्यांनी जगण्याची ताकद दिली, बळ दिले, ऊर्जा दिली. संकटाच्या वेळी त्या ताकदीचे, उर्जेचे महत्त्व समजते. आजही मी फोनवर बोलताना त्याच जोशात ‘जय महाराष्ट्र, रमेश आमराव बोलतोय’ हे सांगतो तेव्हा अभिमानाने ऊर भरून येतो. मी साहेबांना सांगितले होते की, मी निळ्यात जन्मलो, पण भगव्यात मरणार आहे!
शब्दांकन : महेश देशमुख

पुढील स्लाइडमध्ये, बाळासाहेबांचे औरंगाबादेतल्या निवासाचे पहिले घर