आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'तुरुंगात असताना बाळासाहेबांच्या पत्रांनी आधार दिला\'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जिल्ह्यात शिवसेनेच्या बांधणीसाठी जिवाचे रान केले, प्रसंगी लाठय़ा-काठय़ा खाल्ल्या, सहा महिने तुरुंगवास भोगला तो केवळ बाळासाहेबांवरील प्रेमामुळे. या सगळ्या आठवणी सांगताना त्या काळचे जिल्हाप्रमुख सुभाष पाटील यांचे डोळे पाणावतात. आज ते शिवसेनेत नाहीत. मात्र, बाळासाहेबांवरील त्यांचे प्रेम आणि श्रद्धा कमी झालेली नाही.
1986 ची दंगल शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी घडवून आणली असा संशय घेऊन शहरातील शिवसेना कार्यकर्त्यांना पोलिसांनी पकडले. सर्वांना अकोला येथील तुरुंगात हलवण्यात आले. विशेष म्हणजे 10 जुलैला सुभाष पाटील यांना मुलगी झाली आणि 11 जुलै रोजी त्यांना पोलिसांनी अटक केली. हा प्रसंग अनेकांच्या डोळ्यांत अर्शू उभा करणारा होता. त्यांची परिस्थितीदेखील अगदी बेताचीच. कन्नडच्या रेल नावडी गावातून हा तरुण कामासाठी औरंगाबादला आला होता. कंपनीत काम करून कसाबसा संसाराचा गाडा ओढत होता. बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडला आणि सुभाष पाटलांसह अविनाश साळुंके, सदानंद शेळके, रमेश आमराव यांच्यासह काही तरुणांनी शिवसेनेत प्रवेश केला. अकोल्यातील जेलमध्ये हलवल्यानंतर सुभाष पाटलांना घरची चिंता सतावत होती. ही सगळी परिस्थिती त्यांनी पत्राद्वारे बाळासाहेब ठाकरेंना कळवली. बाळासाहेबांनी पत्राला तत्काळ उत्तर देत सुभाष पाटलांच्या घरची व्यवस्था केली. मुंबईहून निष्णात वकील पाठवण्याची व्यवस्था केली. तेव्हाचे जिल्हाप्रमुख गुलाबराव गावंडे यांच्या घरून डबा येण्यास सुरुवात झाली. तब्बल सहा महिने सुभाष पाटलांनी अकोल्यातील तुरुंगात घालवले. हे दिवस घालवताना बाळसाहेबांच्या पत्राचा आणि त्यांनी दिलेल्या शब्दांचाच आधार होता. एवढी वर्षे झाली. मात्र, ते पत्र आणि त्यांच्यासोबत घालवलेले क्षण आठवले की स्फूर्ती मिळाल्याचे पाटील सांगतात. शिवसेनेत असताना आणि बाहेर पडल्यानंतरदेखील बाळासाहेबांवरील र्शद्धा आणि प्रेम कधीच कमी झाले नाही. हे सांगताना पाटील एक प्रसंग आवर्जून सांगतात. युती सरकार आले तेव्हा मी शिवसेनेत नव्हतो. याच दरम्यान पुण्याच्या सर्किट हाऊसवर गेलो असता त्या ठिकाणी गजानन कीर्तिकर, सुभाष देसाई आणि राज ठाकरेंची भेट झाली. त्यांनी मला समजावून सांगितले. नंतर मी बाळासाहेबांना भेटायला गेलो. त्या वेळी मातोर्शीचे बांधकाम सुरू होते. ठाकरे कुटुंब तेव्हा अष्टविनायक बिल्डिंगमध्ये राहत होते. मी त्यांना भेटलो आणि चरणस्पर्श केला. मला वाटले, बाळासाहेब रागावतील. मात्र त्यांनी चूक झाली ती विसरून जा आणि कामाला लाग, असे म्हणून माँसाहेबांना आवाज दिला. तेव्हा माँसाहेब म्हणाल्या, का रे सुभाष, कुठे होता इतकी वर्षं? तुझे वाद बाळासाहेबांसोबत झाले होते. माझ्यासोबत नाही. मलाही भेटायला तू आला नाहीस.’ हे ऐकून डोळ्यांत पाणी आले.
शब्दांकन : मंदार जोशी