आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सामान्यांना चकरा माराव्या लागू नयेत अशी कामे करा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - अन्य खात्यांपेक्षा महसूल विभाग हा अत्यंत महत्त्वाचा आहे, असे सर्वांनाच वाटते. तेव्हा येथे सामान्यांना किरकोळ कामासाठी चकरा माराव्या लागणार नाहीत असे काम करा. महत्त्वाच्या खात्यात आदर्श काम चालते तसा आदर्श निर्माण करा, अशा शब्दांत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी नायब तहसीलदार, तहसीलदारांचे कान टोचले. कर्मचार्‍यांच्या सर्व मागण्या पूर्ण होतील, असे आश्वासनही त्यांनी या वेळी दिले.

महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेचे राज्य अधिवेशन रविवारी येथील महात्मा गांधी मिशन संस्थेच्या परिसरात झाले. अधिवेशनाच्या समारोप समारंभात ते बोलत होते. या वेळी शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा, महसूल राज्यमंत्री सुरेश धस, महसूल खात्याचे अतिरिक्त सचिव स्वाधीन क्षत्रिय, प्रभारी विभागीय आयुक्त गोकुळ मवारे, जिल्हाधिकारी विक्रमकुमार, तहसीलदार संघटनेचे विभागीय अध्यक्ष किरण अंबेकर या वेळी उपस्थित होते.

सरकारी प्रक्रियेत महसूल विभाग हा अत्यंत महत्त्वाचा समजला जातो, असा उल्लेख अधिवेशन सुरू झाल्यापासून वारंवार केला जात होता. सकाळी 11 वाजता अधिवेशन सुरू झाले. थोरात यांचे आगमन झाल्यानंतरही 8 ते 10 वेळा हाच उल्लेख केला गेला. याचाच धागा पकडून थोरात यांनी महत्त्वाच्या खात्यात सामान्यांना चकरा माराव्या लागू नयेत. येथून प्रत्येक माणूस समाधानी होऊन बाहेर पडावा. या खात्याचा आदर्श अन्य खात्यांनी घ्यावा. या खात्यात कसे बदल झाले ते इतरांनी बघतच राहावे, असे काम करण्याचा सल्ला दिला.

महसूल कर्मचारी संघटनेबरोबरच तहसीलदार तसेच नायब तहसीलदारांनी त्यांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्या या वेळी पुन्हा पुढे केल्या. यातील काही मागण्या अंशत: पूर्ण झाल्या असून अन्य मागण्या लवकरच मार्गी लावल्या जातील, असे आश्वासन थोरात यांनी दिले.

उभे डोंगर कसे कापले जातात : राज्यमंत्र्यांचा सवाल
महसूल विभागावर राज्यमंत्री धस यांनीही ताशेरे ओढले. हा विभाग जर सक्षम समजला जात असेल तर शहरालगतचे डोंगर उभ्याने कसे कापले जातात याचाही विचार होण्याची गरज आहे, असे सांगितले. आपण जर नीट काम केले तर कोणी आपल्याकडे बोट दाखवणार नाही. त्यामुळे आपल्या कामाकडे लक्ष देण्याची आपली जबाबदारी आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. महसूल कर्मचार्‍यांच्या मागण्या रास्त असून त्या पूर्ण करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचे दर्डा यांनी या वेळी सांगितले. गेल्या वर्षभरात करण्यात आलेल्या कामाचा आढावा घेण्याबरोबरच आगामी काळात मागण्या मान्य करण्यासाठी काय करावे, यावर चर्चा झाली.