आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Balasaheb Thorat News In Marathi, Congress, Rahul Gandhi, Divya Marathi

‘ऑपरेशन सक्सीड, पेशंट डेड’ होऊ नये,बाळासाहेब थोरात यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - राहुल गांधी यांच्या देशात झालेल्या टॉप पाच सभांमध्ये औरंगाबादच्या सभेचा समावेश असल्याचा निष्कर्ष पक्ष समितीने काढला आहे. सभेला प्रचंड प्रतिसाद होता. त्याचा परिणाम आता मतदान यंत्रातून दिसला पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत ‘ऑपरेशन सक्सीड अन् पेशंट डेड’ असे होता कामा नये, असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.


औरंगाबाद व जालन्याचे काँग्रेस उमेदवार अनुक्रमे नितीन पाटील व विलास औताडे यांच्या प्रचाराचे नियोजन करण्यासाठी जालना रोडवरील एका हॉटेलमध्ये आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा, डॉ. कल्याण काळे, अब्दुल सत्तार, सुभाष झांबड, जिल्हाध्यक्ष केशवराव औताडे, जालन्याचे जिल्हाध्यक्ष भीमराव डोंगरे, शहराध्यक्ष अँड. सय्यद अक्रम उपस्थित होते.


काँग्रेस सत्तारूढ झाल्यास कार्यकर्त्यांना भवितव्य आहे, अन्यथा तुमचे काही खरे नाही. त्यामुळे आपल्या भल्यासाठी आपण आपले उमेदवार निवडून दिले पाहिजे, यासाठी तुम्हाला हवे ते साहित्य मिळेल, पण येत्या 24 तारखेपर्यंत जोमाने प्रचार केलाच पाहिजे, असे त्यांनी सांगितले. उमेदवारीत काय झाले, यावर चर्चा करण्यात आता अर्थ नाही. यापुढे जो उमेदवार आहे, त्याचा प्रचार करायचा आहे. कार्यकर्त्यांनी मोजकेच बोलावे, असा सल्ला दर्डा यांनी दिला. औरंगाबाद हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. मधल्या लाटेत तो हातून गेला असला तरी आजही तो ताब्यात येऊ शकतो. या वेळी चांगली संधी असल्याचे जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी सांगितले. शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांचे एकेकाळचे निकटवर्तीय जया गुदगे यांनीही पालकमंत्र्यांसोबत येथे हजेरी लावली. निवडणुकीच्या काळात ते पुन्हा खैरेंकडे जातील, अशी अटकळ होती, पण खैरेंना पाडण्यासाठी मी मदत करतो, मला त्यांचे डाव माहिती आहेत, असे गुदगे यांनी सांगितले.


उमेदवार बदलणे अशक्य
काँग्रेसचा उमेदवार अचानक ठरत नसतो. औरंगाबादचाही उमेदवार दिल्ली-मुंबई वार्‍यांनंतरच ठरला. कोणा एकाच्या सांगण्यावरून तिकीट कापले जात नाही. दिल्लीतील थिंक टँकनेही अहवाल घेतला. त्यानंतर झालेला निर्णय कसा मागे घेतला जाईल, असे सांगत उत्तमसिंह पवार यांची उमेदवारी नाकारण्याशी आपला काहीही संबंध नाही, असे स्पष्ट करतानाच आता उमेदवार बदलणे अशक्य असल्याचे संकेत पालकमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले. पवार हे श्रेष्ठींच्या संपर्कात असून तेच त्यांची नाराजी दूर करतील. मी लहान माणूस आहे, असे सांगत अधिक बोलण्यास त्यांनी नकार दिला. थोरात हे पवारांची भेट घेतील, असे अपेक्षित होते, परंतु बैठक आटोपून ते नाशिककडे रवाना झाले.