आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बालनाट्यातून उलगडले पाण्याच्या थेंबाचे भावविश्व

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाविद्यालयीन जीवनापासून नाट्य क्षेत्रात कार्यरत असणा-या अर्चना मंदार देवधर यांनी या ‘नीर’ बालनाट्याचे लेखन व दिग्दर्शन केले आहे. अहमदनगर येथे नुकत्याच झालेल्या कांकरिया करंडक राज्यस्तरीय बाल एकांकिका महोत्सवात या नाटकाचा पहिला प्रयोग झाला. त्यापाठोपाठ ज्योतीनगरमधील कवितेच्या बागेत तसेच काही शाळांमध्येही या नाटकाचे प्रयोग रंगले. प्रत्येक ठिकाणी समाज प्रबोधन करण्याच्या या उपक्रमाला शालेय मुलांसह पालक व शिक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. लहान वयातच मुलांना पाण्याचे महत्त्व समजावे हा उद्देश ठेवूनच मुलांमार्फतच ही बाब पटवून देण्याचा हा चांगला खटाटोप आहे. कारण एरवी मोठमोठी आणि शिकली-सवरलेली माणसेही पाण्याचे मोल न समजता बिनधास्तपणे पाण्याची नासाडी करताना दिसतात. वृत्तपत्रे, दूरचित्रवाणी व अन्य माध्यमांतून जाहिरातींद्वारे पाण्याचे महत्त्व सांगितले जाते; पण तरीही त्याचा परिणाम होताना दिसत नाही. त्यामुळेच निदान बालनाट्यातून आणि तेही चिमुकल्यांच्या तोंडून ही भूमिका मांडली तर त्याचा फायदा होईल असा विचार करूनच देवधर यांनी हे लेखन केले आहे.
काय आहे नाटकात ? - 45 मिनिटांच्या नीर बालनाट्यात एका पाण्याच्या थेंबाच्या शास्त्रीय सूत्रापासून त्याच्या बाष्पीभवनापर्यंतचा प्रवास मांडण्यात आला आहे. एका घरात आई मुलीला गळणारा नळ बंद करायला सांगते. ती नळ बंद करत असताना अचानक एक थेंब प्रगटतो आणि तिच्याशी मैत्री करतो. नंतर आणखी काही थेंबही गोळा होतात. यातूनच मग ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग, जलसाठ्यांचे संवर्धन, प्रदूषण टाळण्याचे उपाय आदी बाबींचे महत्व विशद केले जाते. हे करतानाच घरातील फ्लश व बेसिनमधील नळाचा जपून वापर करणे, नळ गळत असेल तर तत्काळ प्लंबरला बोलावणे, गाड्या धुण्यासाठी पाणी वाया न घालवणे यांसारख्या दैनंदिन बाबीही मांडण्यात आल्या आहेत. थेंबाची वेशभूषा केलेले कलाकार, थेट हिमालयातून घसरणारा थेंबाचा सेट, गीत-संगीत आणि आकर्षक प्रकाश योजनेमुळे नाटक अगदी आबालवृद्धांच्या मनाचा ठाव घेते. विशेष म्हणजे यात पाणी वाचवण्याचा संदेश देताना कोठेही अ‍कॅडमिक्स किंवा ज्ञानाचा ओव्हरडोस दिला गेलेला नाही. हसत-खेळत आणि हलक्या- फुलक्या प्रसंगांतून हे नाटक पुढे जाते.
ज्ञान प्रबोधिनीची कथा - पुण्याच्या ज्ञान प्रबोधिनी संस्थेतर्फे ‘छात्र प्रबोधन’ मासिक चालवले जाते. याच्या ताज्या अंकात ‘एचटूओ टू आय’ हा इंग्रजीतील लेख आला आहे. या लेखावरच देवधर यांनी नीरची पटकथा लिहिली आहे. ज्ञान प्रबोधिनीच्या औरंगाबादच्या समन्वयक भारती कुलकर्णी यांनी त्यासाठी साहाय्य केले. दिग्दर्शन देवधर यांचेच असून रंगमंच साहाय्य करुणा धर्माधिकारी, तर रंगभूषेची जबाबदारी शिल्पा शेपाळ यांनी सांभाळली आहे. फेब्रुवारीत ज्ञान प्रबोधिनीमध्ये पुण्यात याचा प्रयोग होणार आहे.
15 दिवसांत नाटक, एका दिवसात कथा - नाटकात तिसरी ते आठवीच्या वर्गातील मुले आहेत. या सर्वांच्या शाळेच्या वेळा वेगवेगळ्या आहेत. त्या अ‍ॅडजस्ट करत संध्याकाळी 7 ते 10 पर्यंत 15 दिवस सराव केला. देवधर यांनी एका दिवसात पटकथा लिहिली. यापूर्वी त्यांनी ‘ससुल्या चाललाय शेतातून’ या बालनाट्यातून वन्य प्राण्यांची शिकार थांबवणे, पर्यावरणाचे संवर्धन अशा विषयावर प्रकाश टाकला होता.
हे आहेत कलाकार - गायत्री वारके, अपूर्वा कुलकर्णी, अमोल देवधर, जयेश पाटील, अमेय देवधर, दीप सोनवणे, चिराग संचेती, चिरायू संचेती, साक्षी शेपाळ, अमर ठुमणे, साक्षी आणि नवमी धर्माधिकारी.
मुलांमध्ये प्रतिभेचा खजिना - आजकालची मुले खूपच हुशार आहेत. नवीन गोष्टी ते सहजच आत्मसात करतात. पाण्यासारख्या गंभीर विषयाला त्यांनी अगदी सहजपणे नाटकातून सादर केले. या नाटकाचे राज्यभर प्रयोग करून विशेषत: लहान मुलांमध्ये जनजागृती करायची आहे. - अर्चना देवधर, लेखक व दिग्दर्शक