आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यापीठाने बोलावलेल्या सहविचार सभेला प्राचार्यांनी मारली दांडी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी बोलावलेल्या सहविचार सभेला विद्यापीठ कार्यक्षेत्रात येणा-या महाविद्यालयांच्या निम्म्यावर प्राचार्यांनी दांडी मारली. वास्तविक, ही सहविचार सभा महाविद्यालये सुरू होण्यापूर्वी म्हणजे प्रवेश प्रक्रियेच्या आधीच होणे अपेक्षित होते. मात्र, विद्यापीठालाही उशिरा जाग आली. विद्यापीठाच्या वाटचालीत संलग्नित महाविद्यालयांचे योगदान महत्त्वाचे असून विद्यापीठ प्रशासन व महाविद्यालयातील प्राचार्यांनी समन्वयाने काम केल्यास विद्यापीठाचे नाव राष्‍ट्रीय स्तरावर नेण्यात येशस्वी ठरू, असा विश्वास कुलगुरू डॉ. चोपडे आणि कुलसचिव डॉ. धनराज माने यांनी या वेळी व्यक्त केला.

विद्यापीठाच्या नाट्यगृहात प्राचार्यांची सहविचार सभा घेण्यात आली. या वेळी बीसीयूडीचे संचालक डॉ. के. व्ही. काळे, डॉ. अशोक चव्हाण, डॉ. एस. टी. सांगळे, डॉ. चेतना सोनकांबळे, डॉ. राजेश करपे यांची उपस्थिती होती. सभेस व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. अशोक मोहेकर, डॉ. डी. बी. आघाव, डॉ. मेहेर पाथ्रीकर, डॉ. वसंत सानप यांच्यासह 168 प्राचार्यांची उपस्थिती होती. विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांची संख्या ही 319 आहे. त्यापैकी 117 महाविद्यालये अनुदानित आहेत. असे असतानाही सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी बैठकीस उपस्थित राहणे अपेक्षित होते. महाविद्यालयांनी काय करावे आणि काय नाही, याविषयी विद्यापीठातील अधिकारी सांगत असतानाच विद्यापीठ प्रशासनानेही महाविद्यालयांच्या अडचणी समजून घ्याव्यात, अशी गळ घालत विद्यापीठातील काही प्रशाकीय बाबींवरही प्राचार्यांनी आक्षेप नोंदवला. विद्यापीठ आणि महाविद्यालयांमध्ये समन्वय असावा यासाठी वर्षातून चारवेळा सहविचार सभा होणार आहे. केंद्रीय युवक महोत्सव, क्रीडा स्पर्धा व विद्यापीठाच्या प्रत्येक उपक्रमात महाविद्यालयाने हिरीरीने सहभागी व्हावे असे आवाहनही करण्यात आले.

‘नॅक’ करून घ्यावे
प्राचार्यांशी संवाद साधताना कुलगुरूंनी सांगितले की, महाविद्यालयात असलेल्या रिक्त जागा भरण्यात याव्यात. तसेच महाविद्यालयांनी 1 एप्रिल 2015 पूर्वी आपले ‘नॅक’ करून घ्यावे, अन्यथा यूजीसीकडून मिळणारा निधी बंद करण्यात येईल.
विद्यापीठाचा ध्वज लावावा
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा स्थापना दिवस 23 ऑगस्ट 1958 आहे. विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात औरंगाबाद, बीड, जालना आणि उस्मानाबाद हे जिल्हे असून यात 396 महाविद्यालये आहेत. या सर्व महाविद्यालयांनी विद्यापीठाचा वर्धापन दिन ध्वज उभारून साजरा करावा. महाविद्यालयांना पासबुक विद्यापीठाला मिळालेल्या संलग्नीकरण शुल्कातून विद्यापीठाच्या तिजोरीत 7 कोटी 50 लाख रुपये जमा झाले आहेत. काही महाविद्यालये हे शुल्क टप्प्याटप्प्याने जमा करत आहेत. यामुळे विद्यापीठाचे नुकसान होत असून सर्व महाविद्यालयांना आता पासबुक देण्यात येणार आहे.