आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BAMU News In Marathi Same Faces Are In Race Of Vice Chancellor, Divya Marathi

चर्चेतील चेहरे पुन्हा कुलगुरू निवडीच्या मैदानात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय पांढरीपांडे यांचा कार्यकाळ 28 मार्चला संपत आहे. त्यांची जागा घेण्यासाठी 65 अर्ज दाखल झाले आहेत. त्यात दरवेळी कुलगुरुपदासाठी चर्चेत असलेले चेहरे पुन्हा स्पर्धेत उतरले आहेत. दरम्यान, मुदतीत नव्या कुलगुरूची निवड शक्य झाली नाही तर विभागीय आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याकडे प्रभारी कार्यभार देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
डॉ. पांढरीपांडे यांनी पाच जानेवारी 2011 रोजी कुलगुरुपदाचा कार्यभार स्वीकारला होता. त्यांचा कार्यकाळ 28 मार्च रोजी पूर्ण होत असल्याने नव्या कुलगुरूंची निवड प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी शासनाने 25 फेब्रुवारीपर्यंत अर्ज मागवले होते. शेवटच्या तारखेपर्यंत एकूण 65 अर्ज आल्याचे शासनाचे नोडल ऑफिसर जगदीशकुमार पराशर यांनी सांगितले. कुलगुरूंच्या निवडीत राज्यपालांची भूमिका सर्वात महत्त्वाची असते. त्यामुळे त्यांच्या कार्यालयात काय हालचाली सुरू आहेत, यासंदर्भात विचारणा करण्यासाठी ‘दिव्य मराठी’ प्रतिनिधीने राज्यपालांचे सचिव विकासचंद्र रस्तोगी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, नव्या कुलगुरूंची निवड होईपर्यंत डॉ. पांढरीपांडे यांना मुदत वाढवून देण्यात येऊ शकते. मात्र, शासनाकडून देण्यात आलेला मुदतवाढीचा प्रस्ताव त्यांनी फेटाळला तर नियमानुसार विभागीय आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याकडे प्रभारी कुलगुरू म्हणून पदभार देण्यात येऊ शकतो. त्यासंबंधीची प्रक्रियादेखील सुरू झाली आहे. यापूर्वी माजी विभागीय आयुक्त कृष्णा भोगे, भास्कर मुंडे यांना प्रभारी पदभार देण्यात आला होता. लोकसभा निवडणुकीच्या व्यापामुळे जयस्वाल यांच्याकडे पदभार दिला नाही तर नांदेड अथवा जळगाव विद्यापीठाच्या कुलगुरूंचादेखील विचार होऊ शकतो, अशी चर्चा विद्यापीठ वर्तुळात होती.
राजकीय पदाधिकार्‍यांना साकडे : बुद्धिवंत वर्गातील आणि प्रशासनाचा अनुभव असलेल्या व्यक्तीचीच कुलगुरू पदासाठी निवड होणे अपेक्षित असते. मात्र, राजकीय पाठबळ असल्याशिवाय नियुक्ती होत नाही, असाच प्रवाह असल्याने सध्या स्पर्धेत उतरलेल्या काही जणांनी राजकीय पक्षांच्या पदाधिकार्‍यांना साकडे घालणे सुरू केले आहे.
केंद्रेकरांना द्यावा पदभार
विद्यापीठातील प्रस्थापितांचे वर्चस्व आणि राजकीय खेळ बंद करून स्वच्छ व्यवस्था आणण्यासाठी काही काळ सिडकोचे मुख्य प्रशासक सुनील केंद्रेकरांसारख्या अधिकार्‍याला हा पदभार द्यावा, अशी चर्चा विद्यार्थ्यांमध्ये सुरू आहे.
माझ्याकडेच पद
4कुलगुरूंच्या कार्यकाळ समाप्तीनंतर नवीन कुलगुरूंची निवड होईपर्यंत माझ्याकडेच नियमाप्रमाणे हे पद प्रभारी म्हणून येईल. त्यामुळे सूचना आल्यावर विचार करू. संजीव जयस्वाल, विभागीय आयुक्त
नेहमीचे चेहरे : विद्यापीठात कुलगुरुपदाची निवड प्रक्रिया सुरू होताच वृत्तपत्रविद्या विभागाचे प्रा. डॉ. सुधीर गव्हाणे, डॉ. वि. ल. धारूरकर, डॉ. मानवेंद्र काचोळे यांची नावे चर्चेत आणि स्पर्धेत असतात. यंदाही या तिघांचे अर्ज आले आहेत. याशिवाय डॉ. बी. एस. वाघमारे, डॉ. व्ही. बी. भिसे, डॉ. महेंद्र शिरसाट, डॉ. देवानंद शिंदे यांचीही नावे चर्चेत आहेत. गव्हाणे यांनी नाशिकच्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कुलगुरुपद भूषवले आहे. सोलापूर, नांदेड, जळगाव विद्यापीठ कुलगुरुपदासाठीही त्यांचा अर्ज होता.