आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यापीठातही सामान्य प्रशासन विभाग होणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात सामान्य प्रशासन विभाग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्या अध्यक्षतेत गुरुवारी (२४ सप्टेंबर) व्यवस्थापन परिषदेच्या पदसिद्ध सदस्यांची बैठक झाली, त्या वेळी हा निर्णय घेण्यात आला आहे.

विद्यापीठात होणाऱ्या विविध कार्यक्रमांच्या पूर्वतयारीसाठी, त्यांना सभागृह उपलब्ध करून देणे, बैठकांचे आयोजन करणे, विद्यापीठातील सर्व परिसरांची स्वच्छता सुरक्षितता राखणे आदींसह विविध कामांचे व्यवस्थित नियोजन करण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाची संरचना करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. हा विभाग सांभाळण्यासाठी उपकुलसचिवांची नियुक्ती केली जाणार आहे. त्याशिवाय कुलसचिवपदासाठी रोलिंग जाहिरात काढण्यात येणार आहे. रोलिंग जाहिरातीला २९ ऑगस्टच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. मात्र प्रत्यक्ष जाहिरातीचा मसुदा तयार करण्यात आला नव्हता, आजच्या बैठकीत मसुद्याला मंजुरी देण्यात आल्याची माहिती आहे. लवकरच देशपातळीवरील वृत्तपत्रांमध्ये कुलसचिव निवडीसाठी अर्ज मागवण्यात येणार आहेत.

३१ ऑगस्ट रोजी व्यवस्थापन परिषदेच्या निर्वाचित सदस्यांची मुदत संपली, तत्पूर्वी झालेल्या २९ ऑगस्टच्या बैठकीनंतर आज व्यवस्थापन परिषदेच्या पदसिद्ध सदस्यांची बैठक घेण्यात आली. बीसीयूडी संचालक डॉ. के. व्ही. काळे, प्रभारी कुलसचिव डॉ. महेंद्र सिरसाट, परीक्षा नियंत्रक डॉ. प्रल्हाद लुलेकर आणि वित्त लेखाधिकारी डॉ. सय्यद अझरुद्दीन आदी कायम निमंत्रित सदस्यांची या वेळी उपस्थिती होती.

गणपूर्तीसाठी सात पदसिद्ध सदस्यांची आवश्यकता होती, मात्र तंत्रशिक्षण सहसंचालक आणि उच्चशिक्षण सहसंचालकांची बैठकीला गैरहजरी होती. फक्त पाच सदस्यांमध्ये बैठक आटोपण्यात आली असली, तरीही त्यांनी धोरणात्मक निर्णय घेतला नसल्यामुळे गणपूर्तीचा प्रश्नच येत नसल्याचा मुद्दा एका अधिकाऱ्याने मांडला आहे.