आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बारकोडिंग उत्तरपत्रिकांच्या खरेदीमध्ये घोटाळा नाहीच

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी नियुक्त केलेल्या विविध अधिकाऱ्यांची निवड योग्य आहे. त्यामुळे आक्षेप नोंदवणारे गौतम आमराव यांच्या तक्रारीत काहीच तथ्य नसल्याचा खुलासा राज्यपाल तथा कुलपती सी. विद्यासागर राव यांच्याकडे केला आहे. स्वत:च्या स्वाक्षरीने (२१ ऑक्टोबर) राजभवनाला पाठवलेल्या पत्रात बारकोडिंग उत्तरपत्रिका खरेदीच्या तक्रारीबद्दलही स्पष्टीकरण दिले असून नियमाला धरूनच खरेदी केल्याचे पत्राद्वारे कुलगुरूंनी स्पष्ट केले आहे.
प्रभारी परीक्षा नियंत्रक डॉ. प्रल्हाद लुलेकर, प्रभारी वित्त लेखाधिकारी डॉ. सय्यद अझरुद्दीन, उत्तरपत्रिकांच्या खरेदीचे प्रकरण, ओएसडी निवृत्ती गजभारे यांच्या नियमबाह्य नियुक्तीसंदर्भात आणि उपकुलसचिव ईश्वरसिंग मंझा यांच्या सेवाकाळात शिक्षण घेतल्याचा आक्षेप नोंदवला होता. मनसेचे शहर उपाध्यक्ष गौतम आमराव यांनी जुलै २०१५ रोजी राज्यपाल तथा कुलपती सी. विद्यासागर राव यांच्याकडे या सर्व प्रकरणांची चौकशी करून कायदेशीर कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर पुढे काहीच हालचाल झाल्यामुळे त्यांनी तीन ते चार वेळा पाठपुरावा करत स्मरणपत्रेही पाठवली. त्यामुळे राज्यपालांचे सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी यांनी (५ ऑक्टोबर) कुलगुरूंना खुलासा मागवणारे पत्र पाठवले होते. कुलगुरूंनी (२१ ऑक्टोबर) राजभवनात पाठवलेले पत्र ‘दिव्य मराठी’च्या हाती लागले असून त्यामध्ये खालीलप्रमाणे स्पष्टीकरण दिले.

तात्पुरत्या स्वरूपात दिला कार्यभार
महाराष्ट्र युनिव्हर्सिटी अॅक्टच्या २० (१) (ब) नुसार व्यवस्थापन परिषदेला प्राप्त अधिकारानुसार २० जुलैची बैठक आणि तहकूब सभा १६ ऑगस्ट २०१४ नुसार वित्त लेखाधिकारी पदाचा कार्यभार डॉ. अझरुद्दीन यांच्याकडे तात्पुरत्या स्वरूपात दिला आहे. त्यात काहीच गैर नसल्याचे खुलाशामध्ये म्हटले आहे.

बेगमपुरा ठाण्यालाही दिले स्पष्टीकरण
उपकुल सचिव मंझा यांनी सेवाकाळात पूर्ण केलेल्या एम. ए. (इंग्रजी) आणि सुरू असलेल्या पीएचडी संशोधनाची तक्रार राज्यपाल तसेच बेगमपुरा पोलिस ठाण्यातदेखील करण्यात आली होती. त्याप्रमाणे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. मंझा यांनी प्रशासनाची पूर्वपरवानगी घेऊनच सेवेदरम्यान एम. ए. केल्याचे म्हटले आहे.

५५ लाख १० हजार ८३० रुपयांची खरेदी
राजभवनाला दिलेल्या पत्रात कुलगुरूंनी पहिल्यांदाच बारकोडिंग उत्तरपत्रिका खरेदीचे स्पष्टीकरण दिले आहे. माहिती तंत्रज्ञान विभागाचे सचिव राजेश अग्रवाल यांच्या नेतृत्वातील समितीच्या शिफारशीनुसार परीक्षांतील गैरप्रकार रोखण्यासाठी बारकोडिंग उत्तरपत्रिका खरेदी केल्या होत्या. इंग्रजी आणि विधी विषयांसाठी ७३ लाख ५२ हजार रुपयांची खरेदी दाखवण्यात आली असली तरी प्रत्यक्षात फक्त ५५ लाख १० हजार ८३० रुपयांचीच खरेदी करण्यात आली होती. त्यामुळे या खरेदी प्रकरणात गैरव्यवहार झाल्याचा मुद्दा गैरलागू स्वरूपाचा असल्याचे नमूद केले आहे.

...मग कुलगुरूंनी श्वेतपत्रिका काढावी
^पुराव्यानुसार आक्षेप नोंदवण्यात आले होते. मी माझ्या तक्रारीवर अद्यापही ठाम आहे. त्यामुळे विद्यापीठाकडे खुलासा करण्यासाठी काहीही पुरावा नाही. त्यांची एवढी भक्कम बाजू असेल तर त्यांनी श्वेतपत्रिका काढावी. कुलपती सी. विद्यासागर राव यांनी राज्यातील सर्व प्रादेशिक विद्यापीठांना श्वेतपत्रिका काढण्याचे आवाहन केले आहे. सर्व आरोप फेटाळायचे असतील तर त्यांनी पुराव्यानुसार श्वेतपत्रिका जारी करून सर्व जनतेला आश्वासित करावे की, ‘ऑल इज वेल’ आहे, एवढेच माझे म्हणणे आहे. -गौतम आमराव, शहर उपाध्यक्ष, मनसे

डॉ. लुलेकर यांच्या निवृत्तीची तारीख ३१ मार्च २०१४ असली तरीही त्यांना राज्य शासनाने नियमानुसार मार्च २०१४ रोजी दोन वर्षांची मुदतवाढ दिलेली आहे. एप्रिल २०१४ ते ३१ मार्च २०१६ पर्यंत त्यांना राज्य शासनाने पूर्णपणे सेवा बहाल केली आहे. शिवाय त्यांना परीक्षा विभागातील कामांचा अनुभव असल्यामुळे त्यांची नियुक्ती प्रभारी परीक्षा नियंत्रक म्हणून केली आहे. डॉ. लुलेकर यांच्या मार्गदर्शनात संशोधन करणाऱ्या लता पवार यांनी गाइड बदलून देण्याची मागणी विद्यापीठाकडे केली होती. त्यामुळे नियमानुसार त्यांना १९ ऑगस्ट रोजी डॉ. लुलेकर यांच्याऐवजी डॉ. भारत हंडीबाग गाइड दिले आहेत. १२ सप्टेंबर रोजी त्यांच्या मौखिक चाचणीचे पत्रही काढले आहे. यामुळे या तक्रारीतही तथ्य नसल्याचा उल्लेख आहे.