आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्तरपत्रिकांच्या प्रती मिळेनात, विद्यार्थी संभ्रमावस्थेत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठांतर्गत अभियांत्रिकी व्यवस्थापनशास्त्र शाखेच्या डिसेंबर-जानेवारीत घेतलेल्या परीक्षांचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांनी रिड्रेसलअंतर्गत झेरॉक्स प्रती मागितल्या होत्या. मात्र, झेरॉक्स प्रती मिळत नसल्याने विद्यार्थी संभ्रमावस्थेत आहेत.

यंदा बीए, बीकॉम, विधी अभ्यासक्रमाचा निकाल मुदतीपेक्षा कमी अवधीत लावून परीक्षा विभागाने इतिहास घडवला. मात्र, आता अभियांत्रिकीचा रिड्रेसल प्रोसिजर करण्यात प्रशासनाला अपयश आले आहे.

अभियांत्रिकीच्या निकालानंतर अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनी रिड्रेसलअंतर्गत उत्तरपत्रिकांच्या झेरॉक्स प्रती मिळवण्यासाठी अर्ज केले होते. मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात अभियांत्रिकीच्या परीक्षेस प्रारंभ होत आहे. त्यामुळे झेरॉक्स प्रती संबंधित महाविद्यालयात परीक्षा विभागाने पाठवणे आवश्यक होते. यंदा १० हजारांपेक्षा अधिक उत्तरपत्रिकांच्या झेरॉक्स प्रती मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. परीक्षा विभागात पूर्वीपासूनच अपुरी कर्मचारी संख्या आहे. त्यातच मनपा निवडणुकीत काही कर्मचारी गुंतल्याने विद्यार्थ्यांना वेळेत झेरॉक्स प्रती पाठवता आल्या नाहीत.

नियमानुसार, रिड्रेसलअंतर्गत मागविलेल्या उत्तरपत्रिकेच्या झेरॉक्स प्रती तपासून पुन्हा विद्यापीठाकडे पाच दिवसांच्या आत विद्यार्थ्यांना पाठवायच्या असतात. त्यानंतर गुणपत्रिका तयार होऊन येते. या प्रक्रियेत पुन्हा वेळ लागतो. त्यातच अभियांत्रिकीच्या परीक्षा साधारणपणे १४ मेपासून सुरू होतील, असे विद्यापीठाने जाहीर केले आहे. अगोदरच झेरॉक्स प्रती मिळाल्या नसल्याने अभ्यास करावा की रिड्रेसलची प्रोसिजर करावी, असा पेच विद्यार्थ्यांसमोर आहे.

२-३ दिवसांत झेरॉक्स प्रती मिळतील
विद्यापीठाच्या परीक्षा विभागात आवश्यक मनुष्यबळ नाही. असे असतानाही पदवी-पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे निकाल वेळेत लावण्याचा प्रयत्न केला. रिड्रेसलअंतर्गत झेरॉक्स प्रती मागवणाऱ्यांची संख्या मोठी आहे. सर्वांच्या उत्तरपत्रिकांच्या झेरॉक्स काढण्याचे काम सुरू आहे. बीई प्रथम वर्ष विद्यार्थ्यांच्या झेरॉक्स प्रती महाविद्यालयांत पाठवण्याचे काम बुधवारपासून सुरू झाले. अन्य विद्यार्थ्यांच्या झेरॉक्स प्रती संबंधित महाविद्यालयांमध्ये २-३ दिवसांत पाठवण्यात येतील. डॉ.वाल्मीक सरवदे (परीक्षा नियंत्रक)

रिड्रेसलसाठी १७ हजार अर्ज
बीए,बीकॉम, विधी अभ्यासक्रमाच्या निकालानंतर विद्यापीठाने आठवड्यापूर्वी अभियांत्रिकी शाखेचा निकाल जाहीर केला. त्यानंतर रिड्रेसलअंतर्गत उत्तरपत्रिकांच्या झेरॉक्सप्रती मिळण्यासाठी विद्यार्थ्यांनी अर्ज केले. बीई अभ्यासक्रम प्रथम वर्ष हजार ९३७, द्वितीय वर्ष हजार ३२५, तृतीय वर्ष हजार ४५२, तर अंतिम वर्षातील हजार ५४१ अर्ज परीक्षा विभागाला प्राप्त झाले आहेत. या सर्वांच्या झेरॉक्स प्रती काढण्यातच कर्मचारी व्यग्र आहेत. आलेल्या अर्जांची संख्या जास्त असल्याने झेरॉक्स प्रती मिळण्यास अडचण निर्माण होत असल्याचे विद्यापीठाकडून सांगण्यात येत आहे. तर मे महिन्यात होणाऱ्या परीक्षा रिड्रेसलमुळे पुढे ढकलाव्यात की नाही, यावर कुलगुरू डॉ. बाळू चोपडे यांच्यासोबत चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहे.
बातम्या आणखी आहेत...