आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केवळ दोघांच्या नियुक्तीसाठी दस्तुरखुद्द कुलगुरूंची धडपड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी जाहिरात देण्यापूर्वीच उमेदवारांना नोकरी देण्याचे नक्की केल्याचा घणाघाती आरोप करण्यात आला आहे. पाली अँड बुद्धिझमचे स्पेशलायजेशन वारंवार बदलत असल्यामुळे हा आरोप होतोय. नागपूर विद्यापीठातून शिक्षण घेतलेल्या दोन उमेदवारांसाठी कुलगुरू सतत स्पेशलायझेशन बदलत आहेत.
येथे कुलगुरू स्वत:च ‘फिक्सिंग’ करताना दिसत असल्याची ओरड केली जात आहे. रिक्त ८५ जागांपैकी ५० टक्के जागाच भराव्यात असे निर्देश जून २०१५ रोजी राज्य सरकारने दिले आहेत. तरीही विद्यापीठाने जुलै २०१६ रोजी सर्वच म्हणजे ८५ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध केल्याचे वृत्त ‘दिव्य मराठी’ने जुलै महिन्यातच प्रसिद्ध केले होते. ८५ पैकी ‘पाली अँड बुद्धिझम’ विभागात सहयोगी प्राध्यापक आणि सहायक प्राध्यापक अशा दोन जागांचा उल्लेख जाहिरातीत प्रसिद्ध केला होता. दरम्यान मे महिन्यात विद्यापीठ निधीतून दोन रिक्त जागा विद्यापीठ निधीतून भरल्या आहेत. त्यामध्ये सहायक प्राध्यापक म्हणून कुणाली बोदेले यांच्या नावाची वर्णी कुलगुरूंनी स्वत:च लावली. विभाग ‘पाली अँड बुद्धिझम’ विषयाचा असून बोदेले यांचे नागपूर विद्यापीठातून पाली आणि प्राकृत विषयात शिक्षण पूर्ण झालेले आहे. थेट मुलाखतीसाठी दिलेल्या जाहिरातीचे निकष पूर्ण करणाऱ्या बोदेले यांनाच कुलगुरूंनी सहायक प्राध्यापक म्हणून नोकरी दिली. त्यामुळे अन्याय झालेल्या सुचिता इंगळे, डॉ. अशोक उके यांच्यासह सहा जणांनी खंडपीठात कुलगुरूंच्या विरोधात याचिका दाखल केली आहे. त्यानंतर जुलै २०१६ रोजी नियमित पूर्ण वेतनाच्या जागेसाठी जाहिरात दिली गेली. त्या वेळी दोन्ही पदांसाठी ‘पाली अँड बुद्धिझम’ असे विषय दिले होते. मिलिंद कला महाविद्यालयातील भदंत डॉ. एम. सत्यपाल यांना सहयोगी प्राध्यापक म्हणून नियुक्ती हवी आहे. त्यांचेही पाली आणि प्राकृत विषयात नागपूर येथे शिक्षण झालेले आहे. बोदेले यांचाही तोच विषय असल्यामुळे कुलगुरूंनी दोघांनाही विभागात नियुक्ती देण्यासाठी दोन वेळा स्पेशलायझेशन बदलले. कुलगुरू डॉ. चोपडे यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी संध्याकाळी ७.५२ वाजता फोन केला होता; पण त्यांनी नेहमीप्रमाणे फोन घेतला नाही.

गुणवंतविद्यार्थी अस्वस्थ : ‘पालीअँड बुद्धिझम’ विषय असताना कुलगुरू प्राकृत म्हणजेच जैन, हिंदू धर्माच्या अभ्यासाचे स्पेशलायझेशन आणू पाहत असल्याचे विभागातील विद्यार्थ्यांचे मत आहे. त्याविरोधात विद्यार्थ्यांनी २५, २६ आणि २७ जुलै रोजी बेमदुत उपोषण केले होते. तीनदिवसीय विद्यार्थिनींच्या आंदोलनापुढे नमते घेत कुलगुरूंनी पूर्ववत पाली अँड बुद्धिझम करण्याचा निर्णय घेतला. थोडा विसर पडल्यानंतर ऑगस्ट रोजी कुलगुरूंनी पुन्हा शुद्धीपत्रक जारी करून “पाली किंवा प्राकृत किंवा बुद्धिस्ट फिलॉसॉफी किंवा बुद्धिस्ट स्टडी” असे स्पेशलायझेशन केले.

मराठवाड्यातील विद्यार्थ्यांची कुलगुरूंना अॅलर्जी का?
^कुलगुरूंनी डॉ.सत्यपाल आणि बोदेले या दोघांना घेण्याचा इरादा पक्का केला आहे. त्यामुळे विभागातील गुणवंत विद्यार्थ्यांनी कुठे जायचे? कुलगुरू फक्त हितसंबंधातील व्यक्तींना नोकरी देण्याचा प्रयत्न करत नाहीत, तर अभ्यासक्रमच प्रतिगामी विचार करणाऱ्यांच्या घशात घालत आहेत. -सुचिता इंगळे, याचिकाकर्त्या
बातम्या आणखी आहेत...