आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यापीठाचा आंबा आला अर्ध्यावर, ५०० पैकी २०० झाडांनाच आंबा लगडला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील आंब्याचा शुक्रवारी (८ मे) लिलाव होत आहे. मार्च, एप्रिलमध्ये झालेल्या गारपीट आणि अवकाळी पावसाने यंदा शेतकर्‍यांसह विद्यापीठाचाही ‘आंबा’ अर्ध्यावर आला आहे. त्यामुळे फळाला आलेल्या ५०० पैकी २०० झाडांचाच लिलाव केला जाणार असून विद्यापीठाला अतिरिक्त उत्पन्न मिळेल. सकाळी ११.३० ते दुपारी दीड पर्यंत लिलावाची प्रक्रिया पूर्ण केली जाईल.

तत्कालीन कुलगुरू डॉ. के. पी. सोनवणे यांच्या कार्यकाळात फळझाडांची लागवड करण्यात आली होती. त्यांच्यानंतर विभागीय आयुक्त तथा प्रभारी कुलगुरू कृष्णा भोगे यांनी अत्यंत अल्पकाळात फळबागांना चालना दिली. १५० एकर परिसरात सर्व प्रकारच्या फळांची लागवड करण्यात आली. त्यापैकी २५ एकरात १३२५ आंब्यांची लागवड केलेली आहे. विद्यार्थी कल्याण विभागांतर्गत ९० झाडांच्या आमराईचाही त्यामध्ये समावेश आहे. उर्वरित १२३५ झाडांची आमराई परिसर विकास समितीअंतर्गत फुलवण्यात आली आहे. त्यापैकी ५२५ झाडांना दरवर्षी अंबेमोहर येतो. शरद पवार केंद्रीय कृषिमंत्री राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत त्यांनी विद्यापीठ फळबागांना २५ लाखांची मदत केली होती. आतापर्यंत पाचवेळा आमराईची विक्री करण्यात आली आहे. यंदा मात्र नैसर्गिक आपत्तीमुळे आमराईचे उत्पन्न घटण्याची शक्यता आहे. मार्च, एप्रिलदरम्यान अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे ५२५ झाडांपैकी २०० झाडांनाच आंबे आले आहेत.

दोन वेगळे लिलाव होतील
विद्यार्थी कल्याण संचालक अंतर्गतची आमराई आणि परिसर विकास समिती आमराई अशा दोन्ही आमराईंचा दोन वेगवेगळा लिलाव केला जाणार आहे. अवकाळी पाऊस आणि गारपीट जर झाली नसती तर यंदा खूप चांगला आंबेमोहर होता. विक्रमी उत्पन्न मिळण्याची शक्यता होती, तरीही बर्‍यापैकी लिलाव होईल, असा विश्वास आहे. -डॉ. गोविंद हुंबे

आमराई आणि आंब्यांचे प्रकार
जनसंवादवृत्तपत्र विद्या विभागाच्या समोरील भागात, विद्यार्थी कल्याण संचालक कार्यालयासमोर आणि विद्या प्रबोधिनीच्या मागील बाजूस अशा तीन ठिकाणी आमराई आहे. केशर, लंगडा, हूर, दणेशान, पायरी, हापूस आदींसह काही गावरान आंब्यांचीही लागवड करण्यात आली आहे.

समितीसमोर होईल लिलाव :कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्या मार्गदर्शनात व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. गणेश शेटकार यांच्या नेतृत्वात समिती तयार करण्यात आली आहे. वित्त लेखाधिकारी डॉ. सय्यद अझरुद्दीन, विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. चेतना सोनकांबळे, उद्यान अधीक्षक डॉ. गोविंद हुंबे यांच्यासह लेखा परीक्षण विभागाचे सहायक कुलसचिवांचाही समितीत समावेश आहे. सर्वांच्या उपस्थितीत डॉ. हुंबे यांच्या आमराई स्थित कार्यालयात लिलावाची प्रक्रिया सकाळी साडे अकरा ते दुपारी दीडपर्यंत पूर्ण केली जाणार आहे.