आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विद्यापीठाच्या इंग्रजी विभागप्रमुखांवर विद्यार्थिनींचा छळवादाचा आरोप, कुलगुरूंकडे लेखी तक्रार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - येमेनी विद्यार्थ्याच्या प्री-पीएचडी प्रमाणपत्रात खाडाखोड केल्याचे प्रकरण ताजे असतानाच मंगळवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या इंग्रजी विभागप्रमुख प्रा. डॉ. गीता पाटील यांनी याच विभागातील एका विद्यार्थिनीचा छळवाद केल्याचा प्रकार समोर आला आहे. पाटील यांनी मोबाइल हिसकावून घेतला, मागावर दोन जणांना पाठवले. शारीरिक आणि मानसिक छळही केला, अशा दोन लेखी तक्रारी विद्यार्थिनींनी कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांच्याकडे केल्या आहेत. याप्रकरणी विद्यापीठात न्याय नाही मिळाला तर पोलिस ठाण्यात तक्रार देऊ असे तक्रारीत म्हटले आहे. याबाबत डॉ. पाटील यांनी फोन मेसेजला प्रतिसाद दिला नाही. 

 

तक्रारदार विद्यार्थिनी इंग्रजी विभागात पीएचडी करत आहे. तिने विभागात झालेल्या प्री-पीएचडी कोर्सला प्रवेश घेतला होता. मात्र, तिचे प्रमाणपत्र विभागात प्रलंबित होते. आज ती प्रमाणपत्र घेण्यासाठी विभागप्रमुख प्रा. डाॅ. गीता पाटील यांच्याकडे गेली असता पाटील यांनी मोबाइल हिसकावून घेतला, असा आरोप या विद्यार्थिनीने लेखी तक्रारीत केला आहे. 
याला जोडून दिलेल्या दुसऱ्या तक्रारीत विद्यार्थिनीने आज घडलेल्या प्रकारामुळे खूप नैराश्य आल्याचे म्हटले आहे. माझा रक्तदाब वाढला. गीता पाटील एवढ्यावरच थांबल्या नाहीत तर दोन माणसे मागावर पाठवून मोबाइल हिसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र, आपण त्यांना मोबाइलला हात लावू नका असा दम दिल्याने ते थांबले. तक्रारीत विद्यार्थिनीने मोहम्मद मसोदी आणि दुसऱ्या एकाच्या नावाचा उल्लेख केला आहे. गीता पाटील यांनी माझ्यासह विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र रोखले आहे. त्यांनी माझा शारीरिक, मानसिक छळ केला. याप्रकरणी दाद मिळाल्यास पोलिस ठाण्यात तक्रार करण्याची तयारी विद्यार्थिनी केली आहे. 

 

संपर्कासाठी केलेल्या मेसेज, फोनला उत्तर नाही 
कुलगुरूंनीयाप्रकरणी बुधवारी बैठक घेणार असल्याचे अाश्वासन दिले. दरम्यान, गीता पाटील यांना संध्याकाळी ७:३९ मिनिटांनी मेसेज केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. सायंकाळी ७:४८, ७:५० आणि ७:५१ वाजता केलेल्या कॉलला त्यांनी उत्तर दिले नाही. यामुळे पाटील यांची प्रतिक्रिया समजू शकली नाही. 

 

फाेन हिसकावण्यास पाठलागही केला... 
मला केबिनबाहेर ढकलून दिले, कसेबसे मोबाइल फोन मिळवण्यात यश मिळवले. मात्र, हा फोन परत मिळवण्यासाठी डॉ. पाटील व्हरांड्यापर्यंत माझ्या मागे धावत आल्या. 
- तक्रारदार विद्यार्थिनी 

बातम्या आणखी आहेत...