आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आक्षेपार्ह व्हाॅट्सअॅप पोस्ट अंगलट; विद्यापीठ पीअारअो शिंदे निलंबित

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रिपाइंने गुरुवारी आंदोलनाचा एक भाग म्हणून कुलगुरुंच्‍या दालनात शिवरायांचा पुतळा बसवला. - Divya Marathi
रिपाइंने गुरुवारी आंदोलनाचा एक भाग म्हणून कुलगुरुंच्‍या दालनात शिवरायांचा पुतळा बसवला.
औरंगाबाद - डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून वातावरण तापले असतानाच विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी संजय शिंदे यांना त्याबाबत ‘व्हाॅट्सअॅप’वर अाक्षेपार्ह पोस्ट केल्यामुळे तत्काळ निलंबित करण्यात आले. माजी राज्यमंत्री तथा पँथर्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष गंगाधर गाडे अाणि स्वाभिमानी ‘मुप्टा’चे अध्यक्ष डाॅ. शंकर अंभोरे यांनी निलंबन अाणि गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्यानंतर कुलगुरू डाॅ. बी. ए. चोपडे यांनी गुरुवारी सायंकाळी साडे सहा वाजता निलंबनाची घोषणा करून विभागीय चौकशी सुरू केली अाहे. 
 
विद्यापीठातील प्रस्तावित छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यावरून दोन मतप्रवाह निर्माण झाले अाहेत. पुतळा उभारण्याऐवजी वसतिगृहे उभारा, यापुढे विद्यापीठात एकही पुतळा होऊ देणार नाही, अशी भूमिका गाडे यांनी घेतली होती. त्यांनी कुलगुरूंना यासंदर्भात निवेदन देऊन विरोधही नोंदवला अाहे. तर शिवाजी महाराजांचा पुतळा उभारून लवकरच अनावरण करण्याची मागणी काही संघटनांनी केली आहे. पदवीधर मतदार संघाचे अामदार सतीश चव्हाण, शिवसंग्रामचे अामदार विनायक मेटे, अामदार सुभाष झांबड यांच्यासह विविध संघटनांनी पुतळ्याचे समर्थन केले होते. रिपाइंचे (ए) बाबूराव कदम, मिलिंद शेळके यांनी देखील पुतळा उभारण्याची मागणी केली अाहे. तर पँथर्स सेनेचे सतीश पट्टेकर, दीपक केदार यांनी पुतळ्याला विरोध केला अाहे. या वाद-विवादाचे पडसाद मागील अाठ दिवसांपासून सोशल मीडियावरून उमटत अाहेत.

त्यातच शिंदे यांनी गंगाधर गाडे, डाॅ. शंकर अंभोरे, प्रभारी अधिकारी डाॅ. वाल्मीक सरवदे यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांविषयी अत्यंत अश्लाघ्य भाषेत ‘व्हाॅट्सअॅप’वर पोस्ट अपलोड केल्याचा अारोप बुधवारी करण्यात आला होता. कुलगुरूंनी स्वतःच निर्देश देऊन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. गाडे, अंभोरे, चित्रकार राजानंद सुरडकर, पंडितभाई नवगिरे, देवानंद वानखेडे, मनोज सरीन यांनी रात्री अाठपर्यंत कुलगुरूंकडे ठिय्या दिला होता. पण प्रभारी कुलसचिव डाॅ. प्रदीप जब्दे नसल्यामुळे बुधवारी पत्राचा ड्राफ्ट करता अाला नव्हता. त्यामुळे कुलगुरूंनी एक दिवसाची वेळ मागवून घेतली होती. त्यानुसार गुरुवारी सायंकाळी ४.१० वाजता गाडे यांचे समर्थक जोरदार घोषणाबाजी करत विद्यापीठात अाले. सर्वांनी कुलगुरूंच्या दालनाचा अक्षरशः ताबा घेऊन निलंबनाची मागणी केली. जोपर्यंत निलंबन केले जात नाही, तोपर्यंत येथून उठणार नसल्याची भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली.
 
त्यामुळे कुलगुरूंना निलंबनाची कारवाई करणे अनिवार्य झाले होते. तत्पूर्वी शिंदे यांना कारणे दाखवा नोटीस देण्यासाठी पत्र तयार करून ठेवले होते. पण कार्यकर्त्यांनी या पत्राचा स्वीकार करण्यास नकार दिला. डाॅ. सिद्धांत गाडे, जिल्हाध्यक्ष किशोर जाधव, सुरडकर, मनोज सरीन, देवानंद वानखेडे, स्वाभिमानी मुप्टाचे डाॅ. किशोर वाघ, अरुण शिरसाट यांच्यासह सुमारे ८० ते ९० कार्यकर्त्यांनी कुलगुरूंच्या दालनात अडीच तास ठिय्या दिला. 
 
निलंबन नको, बडतर्फीच हवी : शिंदेंनी या पूर्वी माझी तीन वेळा बदनामी केली होती. एकदा तर अामदार संजय शिरसाट यांना ‘रीक्षावाला आमदार’ संबोधत त्यांंच्यासह अनेक प्राध्यापकांच्या जातींचा उल्लेख करून बदनामी केली. त्या वेळीही मी तक्रार केली होती. कुलगुरू डाॅ.चोपडे यांच्याविरोधातही जातीयवादी उल्लेख करून अनेकवेळा फेसबुक व्हाॅट्सअॅपवर पोस्ट केल्या अाहेत. त्यामुळे शिंदेंना निलंबित नाही, तर बडतर्फ केले पाहिजे. त्यांची नियुक्तीही बोगस अाहे. असे स्वाभिमानी मुप्टाचे अध्यक्ष डाॅ. शंकर अंभोरे म्हणाले. 
 
दालनात रिपाइंने बसवला शिवरायांचा पुतळा 
विद्यापीठात छत्रपती शिवरायांचा पुतळा बसविण्यावरून वातावरण सध्या पेटलेले अाहे. विविध पक्ष, संघटनांच्या वतीने वादी-विरोधी आंदोलने सुरू अाहेत. पँथर्स रिपब्लिकन पार्टीचा पुतळ्याला थेट विरोध आहे, तर रिपाइंसह (ए) विविध मराठा संघटनांनी विद्यापीठात विनाविलंब पुतळा बसविण्याची मागणी लावून धरली आहे. दरम्यान, रिपाइंने गुरुवारी आंदोलनाचा एक भाग म्हणून जिल्हाध्यक्ष प्रकाश पारधे, नितीन वाकेकर, नागराज गायकवाड, कुणाल खरात अादींनी दुपारी दोनच्या सुमारास कुलगुरूंची भेट घेतली. त्यांनी सोबत छत्रपती शिवरायांचा अर्धाकृती पुतळा कुलगुरूंना भेट देण्यासाठी आणला होता.
 
कुलगुरूंच्या दालनातच त्यांनी अर्धाकृती पुतळा बसविण्याचा आग्रह धरला. सोबत पुतळा ठेवण्यासाठी स्टूलही आणला होता. कुलगुरूंना यापूर्वी पँथर्स रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष गंगाधर गाडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे म्युरल्स भेट दिलेले अाहे. त्याच्या अगदी शेजारी छत्रपती शिवरायांचा पुतळा बसविला. एक निवेदनही दिले असून त्यात म्हटले आहे की, ‘१९ फेब्रुवारी २०१८ पर्यंत कोणत्याही परिस्थितीत इतिहास वस्तुसंग्रहालयाच्या हिरवळीवर छत्रपती शिवरायांचा पूर्णाकृती अश्वारूढ पुतळा बसवा. पुतळा न बसविल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

कुलगुरूंच्या दालनात 2 तास २० मिनिटे कार्यकर्त्यांचा ठिय्या 
गाडे यांच्या शिष्टमंडळातील सुमारे ६० ते ७० कार्यकर्ते अाणि स्वाभिमानी मुप्टाच्या २० कार्यकर्त्यांनी मिळेल तिथे ठाण मांडले होते. सायंकाळी ४.१० ते ६.३० पर्यंत कुलगुरूंच्या दालनात अक्षरशः गोंधळाची स्थिती होती. शिंदे यांना उद्देशून अर्वाच्य शिवीगाळ केली गेली. कुलगुरूंना उद्देशून कार्यकर्ते अनिल सदाशिवे म्हणाले, ‘तुमच्या काळात विद्यापीठाची वाताहत होत अाहे, तुम्ही बाबासाहेबांच्या नावाच्या विद्यापीठाची बदनामी करत अाहात.’ पंडितभाई नवगिरे म्हणाले ‘गाडेंनी नामांतरासाठी १७ वर्षे संघर्ष केला, त्यांची बदनामी करणाऱ्यांना तुम्ही पाठीशी घालत अाहात. याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील’ त्यानंतर कुलगुरूंनी कारणे दाखवा नोटीस मागे घेत थेट निलंबन करून विभागीय चौकशी करत असल्याचे जाहीर केले. त्याशिवाय शिंदे यांना खंडपीठात स्थगनादेश मिळू नये म्हणून ‘कॅव्हेट’ दाखल करण्याची तयारी केल्याची माहिती अाहे.  
बातम्या आणखी आहेत...