आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कुलगुरूंना काम करू द्या, प्रख्यात साहित्यिक डॉ. रावसाहेब कसबे यांचे आवाहन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे अत्यंत विद्वान शास्त्रज्ञ आहेत. मराठवाडा ही बाबासाहेबांची कर्मभूमी असल्यामुळे ते चांगले काम करण्यासाठी येथे आले आहेत. त्यामुळे पुढील तीन वर्षे त्यांना चांगले काम करू द्या. जागतिक दर्जाचे विद्यापीठ करण्याचा त्यांचा संकल्प तरच पूर्ण करू शकतील, असे मत प्रख्यात विचारवंत तथा आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार डॉ. रावसाहेब कसबे यांनी व्यक्त केले.
निमित्त शुक्रवारी (१ जुलै) निवृत्त न्यायमूर्ती बी. एन. देशमुख यांच्या हस्ते त्यांचा रुक्मिणी सभागृहात नागरी सत्कार करण्यात आला त्या वेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मौलाना आझाद शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा पद्मश्री फातेमा झकेरिया होत्या.

डॉ. कसबे म्हणाले, समाजासाठी ज्यांना काही द्यायचे आहे, अशा विद्वान व्यक्ती कुलगुरू होण्याच्या फंदात पडत नाहीत. कारण कुलगुरू होण्यासाठी खूप भानगडी कराव्या लागतात. डॉ. चोपडे मात्र अशा काळात कुलगुरू झाले, ज्यावेळी गुणवत्तेच्या अाधारावर निवड होऊ लागली होती. त्यांनी कोणतीही खटपट करता हे पद मिळवले आहे. अर्थात, त्यांनी येथे चांगले काम केले याची साक्ष हा सोहळा देत आहे. त्यांना आता आंतरराष्ट्रीय पातळीवर विद्यापीठाचे नाव घेऊन जायचे आहे. त्यांच्यात क्षमता आहे. त्यामुळे विविध संघटनांनी त्यांना काम करू द्यावे. त्यांच्या कामात कुणीही आडकाठी घालू नये. ज्या व्यक्तीला प्रेम मिळते ती व्यक्ती प्रेम वाटते. या प्रेमाचा समाजात अनेकांना लाभ होतो तेव्हा समाधान मिळते. याच तत्त्वानुसार कुलगुरूंना प्रेम मिळाले. त्यांनी ते वाटलेही आहे. त्यामुळे ते आनंदी आहेत. त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी सर्वांनी साथ द्यावी.

माजी न्यायमूर्ती देशमुख म्हणाले, वंचितांना शिक्षणाची द्वारे खुली झाली पाहिजेत. शिक्षणाच्या माध्यमातून समाजातील तफावत कमी करण्याचाच मार्ग विकासाकडे जाण्याचा आहे. वंचितांना शिक्षण दिले तरच बाबासाहेबांनी पाहिलेले विकसित समाजाचे स्वप्न साकार होईल. माजी मंत्री गंगाधर गाडे, एमजीएम खासगी विद्यापीठाचे कुलगुरू पी. एम. जाधव, विश्वस्त बाबूराव कदम, उद्योजक मुनीश शर्मा, मुकुंद कुलकर्णी, प्राचार्य डॉ. सर्जेराव ठोंबरे, नलिनी चोपडे, डॉ. वाल्मीक सरवदे, डॉ. शंकर अंभोरे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. डॉ. वाल्मीक सरवदे यांनी प्रास्ताविक केले. क्षमा खोब्रागडे यांनी मानपत्राचे वाचन केले. सूत्रसंचालन डॉ. संजय मून यांनी केले. प्राचार्य डॉ. मकदुम फारुकी यांनी आभार मानले. कुलगुरूंच्या गौरवार्थ संपादन केलेल्या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. प्राचार्य राजाराम राठोड, उद्योगपती मिलिंद पाटील, प्राचार्या सूर्यकांता पाटील आदींसह सर्व क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती होती.

विद्यापीठ देशात ट्रेंड सेटर ठरले : कुलगुरू
सत्काराला उत्तर देताना कुलगुरू म्हणाले, विद्यापीठाचे नाव उंचावण्यासाठी सहकार्य करावे. विद्यापीठाला लवकरच केंद्रीय विद्यापीठाचा दर्जा मिळेल. देशात ट्रेंड सेटर युनिव्हर्सिटी म्हणून या विद्यापीठाने नावलौकिक मिळवला आहे. इंडस्ट्री -युनिव्हर्सिटी इंटरअॅक्शन सेलची आपण स्थापना केली. त्यानंतर यूजीसीने सर्व विद्यापीठांसाठी असे सेल निर्माण करण्याचे आदेश काढले. क्रीडामहोत्सव, कम्युनिटी कॉलेज, सेंटर फॉर पोटेन्शियल एक्सलन्स, दीनदयाल उपाध्याय कौशल केंद्र आदी केंद्रांची विद्यापीठाने स्थापना केली. त्यानंतर देशातील विविध शैक्षणिक संस्थांनी त्याचा अमल केला. विद्यापीठाचा सर्वांगीण विकास करण्याची गरजही त्यांनी या वेळी व्यक्त केली.

बातम्या आणखी आहेत...