आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यापीठात हवी मानवतेसोबत कल्पकता : यूजीसीचे अध्यक्ष वेदप्रकाश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - समाजातील समस्या आणि विविध प्रश्नांची उकल करण्याचे सामर्थ्य फक्त शिक्षणात आहे. शिक्षणातून जीवनमान उंचावते समृद्ध बनते. त्यामुळे विद्यापीठांच्या ठायी मानवता, कल्पकता, सहिष्णुता आणि सत्याचा शोध घेण्याची ऊर्मी असणे गरजेचे असल्याचे मत यूजीसीचे अध्यक्ष प्रोफेसर वेदप्रकाश यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ५८ व्या वर्धापन दिनानिमित्त त्यांच्या हस्ते मंगळवारी (२३ ऑगस्ट) पाच मान्यवरांचा ‘जीवन गौरव’ पुरस्काराने सन्मान करण्यात आला, त्या वेळी ते बोलत होते. कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे अध्यक्षस्थानी होते.

ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी अॅड. भगवानराव देशपांडे (विधी), लातूरच्या विवेकानंद रुग्णालयाचे संस्थापक डॉ. अशोक कुकडे (वैद्यकीय सेवा, संशोधन समाजकार्य), ज्येष्ठ विचारवंत, साहित्यिक डॉ. गंगाधर पानतावणे (साहित्य), माजी कृषी आयुक्त तथा विद्यमान विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट (प्रशासन, कृषी जलसंधारण) यांना पुरस्कार देण्यात आले. यूजीसीचे माजी अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात यांच्या वतीने प्रा. एस. एस. वाल्दे यांनी पुरस्कार स्वीकारला. बीसीयूडी संचालक डॉ. सतीश पाटील, कुलसचिव डॉ. प्रदीप जब्दे, डॉ. सिमला वेदप्रकाश, नलिनी चोपडे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. डॉ. हमीदखान यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. डॉ. बिना सेंगर यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. सुहास मोराळे यांनी सर्वांचे आभार मानले.

वेदप्रकाश यांनी मांडलेले मुद्दे
शिक्षकांसाठी
: वंचितांना उच्च शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे काम शिक्षकांनी करावे. नव्हे तर ती त्यांची नैतिक जबाबदारीच आहे. ज्यांनी संपू्र्ण आयुष्य समाज आणि राष्ट्रासाठी खर्च केले. देशाचे असे महान सुपुत्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव या विद्यापीठाला असल्यामुळे तर शिक्षकांची जबाबदारी अधिक आहे.

विद्यार्थ्यांसाठी : प्रत्येक युवक-युवतींनी वेरूळ, अजिंठा लेणींमध्ये दडलेले ज्ञानाचे संपादन करावे. पायाभूत सुविधांचा पुरेपूर वापर करून विद्यापीठांनी संशोधन, नवोन्मेष करावा. लोकोपयोगी संशोधन करा.

विद्यापीठांसाठी : जगातील विद्यापीठांशी स्पर्धा करावी. नैसर्गिक विकासाचे सूत्र स्वीकारावे. नॅक म्हणजे धावण्याची स्पर्धा नाही. ज्ञानाची निर्मिती, संशोधनातील गुणवत्ता वृद्धिंगत करणे काळाची गरज आहे. शिवाय विद्यापीठे समाजासाठीच आहेत, त्यामुळे समाजाला विद्यापीठांशी जोडून ठेवा.

कुलगुरू डॉ. चोपडे यांना दिल्या टिप्स
पेटंटमिळाले काही फाइल केले असल्याचा कुलगुरूंच्या वक्तव्याचा धागा धरून वेदप्रकाश यांनी खालील टिप्स दिल्या आहेत.
1. विद्यापीठाचा ५८ वर्षांचा प्रवास कमी नाही, अथवा खूप मोठाही नाही. देश, जगातील विद्यापीठांच्या तुलनेत आपले विद्यापीठ कुठे उभे आहे, याचे सिंहावलोकन करावे.
2. शैक्षणिक विभाग, विद्याशाखा तसेच शक्य झाल्यास संपूर्ण विद्यापीठाचे गुणात्मक मूल्यमापन व्हावे.
3. विद्यार्थी, प्राध्यापक, विभागप्रमुख आणि सर्व कर्मचाऱ्यांना उद्दिष्ट देऊन त्यांच्याकडून काम करून घेण्याची हातोटी ठेवा.
4. अभ्यासक्रम,संशोधन, शिक्षकांची प्रगती, विद्यार्थ्यांची नोकरीतील पदस्थापनांच्या पातळीवर सतत आढावा घेण्याची सवय लावा.
5. आगामी काळातील वाटचालीची ब्ल्यू प्रिंट तयार करून घ्या. साधारणत: ३६५ दिवसांनी आपण तो टप्पा गाठतो आहोत की, नाही याचे परीक्षण करा. ३६५ दिवस खूपच कमी कालावधी होत असेल तर पुढील पाच वर्षांचे टार्गेट ठेवा. ६३ व्या वर्धापनदिनी हा टप्पा गाठायचा आहे. याचे टार्गेट आताच ठरवून घ्या.

गुणवत्ता पारितोषिकांचे वितरण
वेदप्रकाश यांच्या हस्ते विविध परीक्षेत यशस्वी १६० जणांना गुणवत्ता पारितोषिक देण्यात येणार आहेत. त्यापैकी ४७ गुणवंतांना या कार्यक्रमात पारितोषिके देण्यात आली. एप्रिल २०१६ मध्ये उत्कृष्ट परीक्षा घेतलेल्या सहा महाविद्यालयांना आदर्श परीक्षा केंद्र म्हणून गौरवण्यात आले.

(विद्यापीठातील लंच होमच्या उद््घाटनानंतर पाहुण्यांसाठी बुफे भोजनाची व्यवस्था होती. तरीही तमाम अधिकारी मंडळी आपल्यासमोर ताट वाढूनच येईल, या अपेक्षेत खुर्च्यांवर बसूनच राहिली. हे लक्षात येताच वेदप्रकाश यांनी चटकन उठत स्वत:चे ताट हातात घेतले. ते पाहताच कुलगुरूंसह सर्वजणांनी रांगा लावत स्वत:चे भोजन वाढून घेतले. छाया : मनोज पराती)
बातम्या आणखी आहेत...