आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता विद्यापीठ होणार बँकेमार्फतच कॅशलेस; ‘लंच होम’जवळ एटीएम, ई-सुविधा केंद्र उभारणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने सर्वच कॅश काउंटर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तत्पूर्वी ‘लंच होम’जवळ महाराष्ट्र बँकेचे दोन ‘बिझनेस करस्पॉडंट’ बसवले जाणार असून तेच विद्यार्थ्यांकडून ऑनलाइन पद्धतीने विविध शुल्क आकारतील. यासाठी बँकेसोबत करार करण्यात आल्याची माहिती आहे. ‘एटीएम’सह ‘लंच होम’ लवकरच सुरू होईल. शिवाय विद्यार्थ्यांसाठी ई-सुविधा केंद्रही येथेच उभारण्यात येणार आहे. 
 
कॅशलेस युनिव्हर्सिटी करण्यासाठी पब्लिकेशन युनिटकडील सर्व प्रकारचे कॅश काउंंटर बंद केले जाणार आहेत. तत्पूर्वी ‘लंच होम’ सुरू करून येथे विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक सेवा उपलब्ध करून देण्याचा उत्तम निर्णय कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे आणि वित्त लेखा अधिकारी शंकर चव्हाण यांनी घेतला आहे. ‘लंच होम’ साठी निविदा काढलेली आहे. ‘लंच होम’ जवळ महाराष्ट्र बँकेचे ‘एटीएम’ आणि ई-सुविधा सुरू करण्यात येणार आहे. येथेच बँकेचे दोन व्यापार प्रतिनिधी विद्यार्थ्यांकडून विविध शुल्क आकारतील. दीड ते दोन महिन्यांत सर्व ‘कॅश काउंटर’ बंद केले जातील. 
 
शैक्षणिक शुल्क, परीक्षा शुल्क, डुप्लिकेट मार्कमेमो, पदवी प्रमाणपत्र, ट्रान्सक्रिप्ट पासिंग सर्टिफिकेट आदींसह विद्यार्थ्यांचे शुल्क कॅशमध्ये घेतले जाते. त्याचे प्रमाण २० टक्क्यांमध्ये असल्याचे लेखा विभागाने सांगितले. विद्यापीठ विविध १२५ प्रकारचे शुल्क आकारत असते. त्यामध्ये सर्वाधिक ५० प्रकारचे संकीर्ण शुल्क अद्यापही कॅशमध्ये घेतले जात आहे. परीक्षा विभागासाठी ३० प्रकारचे शुल्क आकारले जाते. ग्रंथालयासाठी-९, पीएचडी-५, प्रकाशन साहित्य-५, पात्रता शुल्क-४, वसतिगृह-१, विद्यार्थी कल्याण-१ आदी. 
 
‘लंच होम’जवळबँकेचे दोन कर्मचारी बसवून त्यांच्यामार्फतच शुल्क घेतले जाणार आहे. त्याशिवाय ई-सुविधा केंद्र, एटीएमही विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. लवकरच ‘लंच होम’ येथे अशा पद्धतीची रचना करण्यात येईल. त्यानंतर आगामी शैक्षणिक सत्रापासून विद्यार्थ्यांना चांगली सोय उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे - शंकर चव्हाण, वित्त लेखाधिकारी, विद्यापीठ.  
बातम्या आणखी आहेत...