आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BAMU's Ex Controller Of Examinations Valmik Saravade Resigned

कुलगुरूंची सडेतोड भूमिका; दबावाला भीक नाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी परीक्षा नियंत्रक डॉ. वाल्मीक सरवदेंवर ओढवलेल्या गच्छंतीमुळे वातावरण तापण्याची शक्यता आहे. कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे राजीनामा स्वीकारणार नाहीत, अशी डॉ. सरवदेंना अपेक्षा होती. मात्र, सोमवारी (८ जून) दुपारी कुलगुरूंनी ‘मराठी’चे प्राध्यापक डॉ. प्रल्हाद लुलेकर यांच्याकडे कार्यभार देऊन टाकला. ही प्रक्रिया सुरू असताना डॉ. सरवदे समर्थकांचे शिष्टमंडळ कुलगुरूंच्या प्रतीक्षालयात बसून होते. ‘यापुढे दबावाला भीक घालणार नाही, अनैतिक-बेकायदा कामांसाठी संघटनांचा वापर झालाच तर पोलिसांच्या हवाली करू,' असा सज्जड दमही कुलगुरूंनी भरला.
जून रोजी सकाळी डॉ. सरवदे यांनी राज्यपालांची भेट घेतली. त्यानंतर राजभवनातील उच्च शिक्षण विभागाचे सचिव विकासचंद्र रस्तोगी यांनी कुलगुरूंना दूरध्वनी करून डॉ. सरवदे परवानगीशिवाय राज्यपालांची भेट कशी काय घेऊ शकतात, असा सवाल केला. त्यामुळे कुलगुरूंनी डॉ. सरवदे यांना परतीच्या विमानाने विद्यापीठात येण्यास सांगितले. मग गुरुवारीच कुलगुरूंनी त्यांना स्पष्टीकरण मागितले. डॉ. सरवदे यांनी मात्र स्पष्टीकरणाच्या भानगडीत पडण्याऐवजी चार ओळींचा राजीनामा दिला.
आठ दिवस आधीच प्रभारी कुलसचिव डॉ. गणेश मंझा यांनीही कुलगुरूंकडे राजीनामा सूपूर्द केला होता, त्यांचा राजीनामा मात्र नामंजूर करून काम करण्यास सांगितले होते. कुलगुरू आपलीही मनधरणी करतील अन् राजीनामा फेटाळतील, अशी डॉ. सरवदेंना अपेक्षा होती. पण सोमवारी राजीनामा मंजूर केला. कुलगुरू आणि डॉ. सरवदे या दोघांचाही राज्यपाल भेटीच्या प्रकरणामुळे ‘इगो हर्ट’ झाल्याचे घडल्या प्रकरणावरून स्पष्ट होते. कुलगुरूंनी आगामी काळात संघटनांच्या रोषाला सामोरे जावे लागणार आहे.
कुलगुरूंची सडेतोड भूमिका
चोपडे म्हणाले, "कुलगुरूंच्या अधीनस्थ अधिकाऱ्यांनी परवानगीशिवाय राज्यपालांना भेटणे गैर तर आहेच, शिवाय नैतिकतेला धरून नाही. वैयक्तिक कामे मंत्रालयात असू शकतात; पण राजभवनात कसले वैयक्तिक काम असते..?' असा प्रतिसवाल कुलगुरूंनी उपस्थित केला. "मी राजीनामा मागितला नव्हता. त्यांनी स्वत:च दिला, मी फक्त मंजूर केला. आता संघटनांचा त्रास होईल याची मला जाणीव आहे. पण पुढील काळात आपण दबाव झुगारून काम करून दाखवू. अनैतिक मार्गाचा कुणीही अवलंब केला तर त्यांना पोलिसांच्या हवाली करू. कुलगुरूंना खूप अधिकार असतात. मी सोज्वळ आहे याचा अर्थ असा नाही की कारवाई करणार नाही. उपद्रवी मूल्यांच्या संघटनांचा बीमोड करणार. चांगल्या कामांसाठी संघटनांचे स्वागत आहे, मात्र चुकीची कामे संघटनांच्या आडून रेटता येणार नाहीत,’ असेही त्यांनी ठणकावून सांगितले.