आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘थोबाडीत मारले, पण रक्त आले नाही’; हैदराबाद बँकेच्या धोरणावर ग्राहक मंचाचे ताशेरे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- खात्यात पुरेशी रक्कम असतानाही स्टेट बँक ऑफ हैदराबादने धनादेश परत पाठवला. त्याबद्दल बँकेने खातेदारास आठ हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने दिले. शिवाय धनादेश परत पाठवल्याने खातेदाराचे कुठलेही नुकसान झाले नाही, असे मत बँकेने व्यक्त केले होते. त्यांचे हे मत म्हणजे ‘थोबाडीत मारले, पण रक्त आले नाही’ असे म्हणण्यासारखे असल्याचे निरीक्षण मंचने नोंदवले.

सुयोग कॉलनी पदमपुरा येथील प्रकाश देशपांडे यांच्या बँक खात्यावर 45 हजार 950 रुपये होते. खातेदाराने पत्नीच्या नावाने 13 जुलै 2012 रोजी 42 हजारांचा धनादेश दिला. खात्यावर पुरेशी रक्कम असताना बँकेने ‘चेक इज आऊट ऑफ अँलॉटेड रेंज’ असा शेरा मारून धनादेश परत केला. बँकेने खातेदाराच्या खात्यातून 18 एप्रिल 2011 ते 31 जुलै 2011 या काळात सहा वेळेस 50 रुपयांप्रमाणे 600 रुपये परस्पर वसूल केले. तसेच मागणी केलेली नसताना बँकेने खातेदारास चेक बुक पोस्टामार्फत पाठवले. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचचे अध्यक्ष के. एन. तुंगार, सदस्य एस. एस. बारलिंगे व के. आर. ठोले यांनी सुनावणीत पाच हजार रुपये नुकसान भरपाई व दाव्याच्या तक्रार खर्चापोटी तीन हजार रुपये 30 दिवसांत देण्याचे आदेश दिले. कमीत कमी रक्कम शिल्लक न ठेवल्याबद्दल दंडापोटी बँकेने कपात केलेल्या 300 रुपयांवर दहा टक्के व्याज देण्याचे आदेश देण्यात आले. या प्रकरणात खातेदारांनी आपली बाजू स्वत: मांडली तर बँकेच्या वतीने अँड. आर. डी. देशपांडे यांनी बाजू मांडली.