आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बँक दरोडेखोर सुरेश उमकचे औरंगाबादेत होते ‘रेस्ट झोन’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - नागपुरात अटक केलेला बँक दरोडेखोर सुरेश उमकचे देवळाई परिसरात आलिशान रो- हाऊस असल्याचे स्पष्ट झाले. त्याचा तो ‘रेस्ट झोन’ म्हणून वापर करत होता. मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वेरूळजवळील शाखेत त्याने दरोडा टाकला होता.

ग्रामीण पोलिसांत हा गुन्हा नोंदलेला आहे. देवळाई येथील लक्ष्मी विहार सोसायटीत त्याने नुकतेच रो-हाऊस घेतले होते. तेथे तो चित्रा नावाच्या मुलीसोबत राहत होता. कुणालाही संशय येऊ नये म्हणून त्याने सागर देशमुख नावाच्या व्यक्तीसोबत तिच्या विवाहाचा बनाव केल्याचे पोलिसांनी सांगितले. राज्यात इतर ठिकाणी दरोडे टाकल्यानंतर लक्ष्मी विहार सोसायटीतील रो- हाऊसमध्ये तो मुक्काम ठोकायचा.

सभ्य असल्याचे सोंग घेणार्‍या या भामट्याकडे निरनिराळ्या लक्झरी गाड्या होत्या. वेरूळजवळील एडीसीसी बँकेच्या शाखेत मार्चमध्ये त्याने दरोडा टाकला
होता. त्याशिवाय अजिंठा गावाशेजारीही
त्याने बँक लुटली. दोन्ही प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. पुणे जिल्ह्यातील शिरूर ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक क्षीरसागर यांच्या नेतृत्वातील पथकाने पंधरा दिवसांपूर्वी सुरेशसाठी देवळाईत ‘ट्रॅप’ लावला होता. मात्र, बाहेरून लॉक लावून राहणार्‍या सुरेशला याचा सुगावा लागल्यामुळे त्याने घरातील सोने घेऊन पोबारा केला. सातारा पोलिस ठाण्यातील एका कर्मचार्‍याच्या मदतीने ही मोहीम फत्ते
होणार होती.
दरम्यान, चित्राला चार महिन्यांचे एक लहान बाळ असून ती मोर्शी तालुक्यातील आहे. ‘दिव्य मराठी’ च्या टीमने देवळाई परिसरातील घर शोधून काढले, मात्र त्याचे बिंग फुटण्यापूर्वीच तिने येथून पळ काढल्याची माहिती पुढे आली आहे.


बैल चोरीपासून सुरुवात
48 वर्षीय सुरेशने तारुण्यात असताना बैल चोरीपासून सुरुवात केली. नंतर तो हळूहळू घरफोडीकडे वळला. भरपूर ऐवज लुटल्यानंतर त्याने बँकांकडे मोर्चा वळवला होता. लुटलेल्या सोन्यापैकी जवळपास 500 ग्रॅम सोने त्याने येथीलच ‘मणिपुरम गोल्ड’ येथे ठेवल्याचे पुणे पोलिसांनी सांगितले आहे.

गर्भश्रीमंत असल्याचा बनाव
देवळाई परिसरात राहत असताना सुरेश उमक हा आपण गर्भश्रीमंत असल्याचा बनाव करायचा. सोन्याच्या चेन, अंगठ्या, ब्रासलेट नियमितपणे वापरायचा. तसेच उंची वेशभूषेसह विविध प्रकारच्या गाड्यांचाही तो वापर करायचा.